श्री जगदंबेचीं पदें
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद १ लें -
जगदंबा मूळ माया हे भक्तांसाठीं अवतरली ॥धृ०॥
भोग सुखें जग हें नाचाया । जे नटली विषयां पांचा या । त्रिगुणात्मक जीवां वांचाया । सुविचारें उद्धराया, उपनिशदेंशास्त्रें विस्तरली ॥ज०॥१॥
जे सदसत् कर्मातें फळवी । सुख विषयांतिल दुःखचि कळवी । सत्संगें आत्मपदीं वळवी । अद्वय आनंद व्हाया, विश्वीं विश्वात्मत्वें भरली ॥ज०॥२॥
स्वानुभवें सेवुनि दिनराती । महिमा सज्जन वदती गाती । कृष्ण जगन्नाथा वरदांतीं । आठवितां विष्णु पाया, जन्म मरण भ्रांती निस्तरली ॥ज०॥३॥
पद २ रें -
आली उदयासि ईश्वर माया, हे निज सुख द्याया, नटली हें विश्व त्रिगुणमय काया, जीवासि रमाया । विषय भोग सुख सोंग वाटउनि, अखंड ब्रह्मानंदचि व्हाया ॥आ०॥१॥
ऐसा महिमा सद्भक्त महंतां, आवडला संतां, भजती स्वानुभवें त्यजुनि अहंता, प्राण्या गुणवंता । पदोपदीं जे सदोदित विषय मदोन्मत्त दैत्यांसि वधाया ॥आ०॥२॥
केला उपकारचि हा मज वाटे, आनंद दाटे, हरिले संसार दुःखमय कांटे, अद्वैत वाटे । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणें आत्मत्वांत मिळाया ॥आ०॥३॥
पद ३ रें -
महाकाली महा सरस्वति महालक्ष्मी जगदंबा । महा आवडी पहावया ज्या सहाय भक्त कदंबा ॥म०॥धृ०॥
अघटित घटना शक्ति प्रगटल्या सच्चित्सुखा स्वयंभा । बाह्याभ्यंतर व्यापक लख लख प्रकाश विपुल नितंबा ॥म०॥१॥
वानिति गुण सन्मान पुरःसर सुरवर अंबाबाई । उदोउदो हा शब्द करुनियां नाचति ठाईं ठाईं ॥म०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथासि कळविति मिथ्या माया । शांत वृत्ति एकांत स्थितीनें आप्त सुखांत रमाया ॥म०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP