श्री रामाचीं पदें - ३१ ते ४०
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद ३१ वें -
ब्रह्मादी त्रिभुवनपति राम ध्याति । सदैव नाम गाति आनंद अति जयां विसर न घेति जाणोनियां निज हित गति ॥धृ०॥
ब्रह्मर्षि देवर्षिह स्मरति हृदा । प्रहर्षित बुद्धि राघवी सदा । होउनिया चढे जेथें अक्षय स्वरूपींरति । रमुनि जें सुख निजें आकळिजे ॥ब्रह्मा०॥१॥
उन्मत्त न चित्त विषयिं करा । न सत्य असत्य मीपण हरा । आपण पहावा राम अनुभवें त्रिजगतीं । नदरि जेविं वरिजे उद्धरिजे ॥ब्र०॥२॥
विष्णुगुरु हारि संसृति भया । कृष्ण जगन्नाथ आठवि तया । जद्वय दाविला जेणें आत्माराम सर्वांभुतीं । वर दिजे निरसिजें अघ बीजें ॥ब्रह्मा०॥३॥
पद ३२ वें -
जगज्जीवन रामीं रमारे । शरण जाउनिं दृढ धरुनि गुरुचरण ॥धृ०॥
नर जन्माचें सार्थक साचें । जरि करि विवरण आत्मत्वाचें । तरि हे नौका होय भवतरण ॥रा०॥१॥
विषयासक्ति त्यजुनि विरक्ति । योगें करितां नवविध भक्ति । सहज मुक्तिसुख हरि जनन मरण ॥रा०॥२॥
वैष्णव गुरुवर अद्वय सुखकर । कृष्ण जगन्नाथ राघव तत्पर । नित्य निरंतर अज्ञान हरण ॥रा०॥३॥
पद ३३ वें -
विषय न विष कधिं प्यावें । राम नाम अमृत प्यावें ॥धृ०॥
चिद्भ्रमराज गुरुचरणांबुज । ब्रह्मानंद सहज होय स्वभावें ॥वि०॥१॥
धनसुत दारा दुःख पसरा । देह मी जडभारा या विसरावें ॥वि०॥२॥
एकचि आपण मिथ्या दुजेपण । ऐसी सद्गुरुखुण जाणुनि रहावें ॥वि०॥३॥
विष्णुचरण रत कृष्ण जगन्नाथ । विनवित निजहित हे परिसावें ॥वि०॥४॥
पद ३४ वें -
वरिला तो मी श्रीराम या देहीं एकांति ॥वरि०॥यादे०॥सद्गुरु वचनाधारें आत्म विचारें ॥व०॥धृ०॥
जो निज द्रष्टा दृश्य सकळ हें । आंगें नटला परी अंतरिं निष्काम ॥या०॥१॥
लक्ष लक्ष्मण उन्मनि सीता । अनुभव मारुति यांचें जो सुखधाम ॥व०॥२॥
भाव भरत शत्रुघ्न प्रेम । करिं असंग चवरें तन्मय अंतर्याम ॥व०॥३॥
सद्गुरु विष्णु राघवपूर्ण प्रकाश । चित्सुख कृष्ण हृदय आराम ॥व०॥४॥
पद ३५ वें -
रात्रदिन राम गाऊंरे । पुत्र कलत्र सुख भ्रम पुरे पुरे ॥धृ०॥
छत्र सुखासनीं माझा । स्वामी अयोध्येचा राजा । शोभे आजानुबाहु रे ॥रा०॥१॥
वामांकिं जानकि नार । संमुख मारुति विर । दिसे सुंदर पाहुं रे ॥ग०॥२॥
राम विष्णुपदीं चित्त । ठेवी कृष्ण जगन्नाथ । सुख अद्वैत लाहुं रे ॥रा०॥३॥
पद ३६ वें -
राम जडला न सोडी । घडि घडि ओढी काय सांगुं तुज गोडी ॥धृ०॥
नुरवितो दृष्य गुण । दावितो मुळिंचि खुण आपणा जोडी ॥रा०॥१॥
जेथें धांवे तेथें मन । रामचि होय चिद्धन । बाई द्वैत भान मोडी ॥रा०॥२॥
राम विष्णु गुरुप्रीती । कृष्ण जगन्नाथीं अति । हरि देह मति खोडी ॥रा०॥३॥
पद ३७ वें -
वाज नसुनि जन लाज त्यजुनि रघुराज सदैव भजावारे ॥धृ०॥
दृष्य विलक्षण राम सुलक्षण । न क्षण एक त्यजावरे ॥वा०॥१॥
नाशिवंत जाण देह न मी ह्मण । साक्षी आपण उमजारे ॥वा०॥२॥
विष्णु चरणिं रत । कृष्ण जगन्नाथ । काळ न विषयांत जावा रे ॥वा०॥३॥
पद ३८ वें -
संत साधुंचा समुह आला रामाला राज्याभिषेक झाला ॥धृ०॥
मूर्ति रत्न जडितासनि शोभे कीर्ति त्रिभुवनाला ॥रा०॥१॥
अमर पुष्प वर्षाव करिति बहु पावुनि हर्षाला ॥रा०॥२॥
विधि शिव इंद्रादिक सुर हृषिगण स्तवुनि नमिति ज्याला ॥रा०॥३॥
शूरचि तो राक्षस कोटींसह वधुनि रावणाला ॥रा०॥४॥
चरणिं उभा बलभीम मारुती लंपट प्रेमाला ॥रा०॥५॥
दक्षिण लक्ष्मण बंधु विराजे सीता वामांकाला ॥रा०॥६॥
होउनि अति आनंद नाचती भक्त मानसाला ॥रा०॥७॥
अयोध्या नगरावासि नारीनर येति दर्शनाला ॥रा०॥८॥
सुग्रिवांगद नळनीळ बिभीशण चित्त वल्लभाला ॥रा०॥९॥
पट्टाभिषेक राम विलोकुनि आनंद प्रजांला ॥रा०॥१०॥
जय जय रघुवीर समर्थ सकळ गर्जति नामाला ॥रा०॥११॥
भरत शत्रुघ्न चवरें ढाळिती संतोष मनाला ॥रा०॥१२॥
छत्र सुखासनि विष्णु राम कृष्ण जगन्नाथाला ॥रा०॥१३॥
पद ३९ वें -
छत्र सुखासनि दाशरथी श्रीराम नृपति बैसला ॥धृ०॥
दक्षिण भागीं लक्ष्मण साजे । वामांकीं जानकी विराजे । धन्य धन्य नर जन्म आमुचा सुदिन आजिचा भला हो ॥छ०॥१॥
हर्षुनि सुमन वर्षति सुखर । जय जयकारें गर्जति रघुविर धनुर्बाणधर मदन मनोहर दिव्य मूर्ति शोभला हो ॥छ०॥२॥
सुग्रीवांगद नळनीळादिक । सन्मुख नाचति राम उपासक वानरेंद्र बलभीम मारुती दास चरणिं लागला हो ॥छ०॥३॥
अलभ्य लाभचि हा आह्मांला । अमृत सिद्धियोग घडुनि आला । संत साधु सत्पुरुष सज्जनीं ब्रह्मानंद दाटला हो ॥छ०॥४॥
वैष्नव सद्गुरु दीन दयाघन । प्रिय भजकाला दे निज दर्शन । कृष्ण जगन्नाथाचा सच्चित्सुख आत्मा प्रगटला हो ॥छ०॥५॥
पद ४० वें -
छत्र सुखासनि राजाराम राजिवलोचन जानकिजीवन आजि पाहिला हो ॥धृ०॥
कोटि विद्युत्प्रकाशाचा मस्तकिं मुगुट ज्याचा । संत साधु जनीं गुण गाइला हो ॥छ०॥१॥
रावणादि राक्षसांला । वधुनि अयोध्ये आला । देव ऋशहि श्रम ज्याणें साहिला हो ॥छ०॥२॥
चरणिं मारुति उभा । मुखीं मंद हांस्य शोभा । आवडुनि दास्य भावें राहिला हो ॥छ०॥३॥
उत्साह नवरवासी । लोकां आनंद मानसिं । दाटला कौसल्यादिक आईंला हो ॥छ०॥४॥
नारद तुंबरादिक । गाति नाचति सन्मुख । बंधु भरतानें ज्यासि वाहिला हो ॥छ०॥५॥
नीलोत्पल दलश्याम । त्रिभुवन साक्षीराम । लक्षुनि विषय काम दाहिला हो ॥छ०॥६॥
वैष्णव सद्गुरु भला । सच्चित्सुख प्रगटला । कृष्ण जगन्नाथें चित्तिं वाहिला हो ॥छ०॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP