श्री विरविठ्ठलाचीं पदें
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद १ लें -
नीरद नील विरविठ्ठल स्थिर पाहूं ॥धृ०॥
विषय विषाशा निमुनि पाशा, गुंतुनि यांत न राहुं ॥नी०॥१॥
हें भव वैभव दावि पुनर्भव, गर्भवास किति साहूं ॥नी०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय, भजनें निज सुख लाहूं ॥नी०॥३॥
पद २ रें -
धीर तुझा गंभीर हृदयिं विरविठ्ठल करिं स्थीर विलोकन ॥धृ०॥
नीरदाभ मृग नीर भवांबुधि, तीर आत्म पद नीरज लोचन ॥धी०॥१॥
चीरकाल हे क्षीर धिजापति, मीरवितों निज नाम यशोधन ॥धी०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा निज, स्मरण मला दे प्रिय सुख शोधन ॥धीर तुझा गंभीर हृदयिं विरविठ्ठल करिं स्थीर विलोकन ॥धी०॥३॥
पद ३ रें -
नमन तुज पुंडरीक नयना, पुंड असुर जन धुंडुनि मारिसि पुंडलीक वरद विरविठ्ठल हरि ॥धृ०॥
अखिल कोटि ब्रह्मांड जनक शुक्र, सनकादि योगी ध्याति पदरज अंतरीं ॥न०॥१॥
दिव्य मुकुट शिरिं कुंडल मंडित, श्रवण शोभति माला वैजयंति कंधरी ॥न०॥२॥
यतिवर पंडित भाव अखंडित, जाणुनि प्रगटलासि अभय वरद करिं ॥न०॥३॥
मंद हसित मुख निरखुनि होय सुख, विष्णु कृष्ण जगन्नाथ विसरे क्षणभरी ॥नमन तुज पुंडरीक नयना॥४॥
पद ४ थें -
विनवितों पदांबुजिं शीर ठेवुनि श्री विरविठ्ठल, न उशीर लाविं मज स्थीर दे सुख अनंत अपार ॥धृ०॥
नीरसाद्य मृदुहास्य रुचिर तव, दास्य करिन तूं उपास्य सुरां जरि । वरद करिसि तरि कदा हरिसि, वदति असें मुनि वेद चार ॥वि०॥१॥
क्षणिक विभव रत धणिक बहुत मज, आणिक न तुजहुनि प्रिय दुसरा । कांहिं कणिक भक्षुनि आत्मस्वरूप लक्षिन, हेतु हा वसे पुरे पुरे संसार ॥वि०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मस्तकीं, ठेवीं कृपाकर वरद बरा । निज चरणिं शरण चिंता नसे ज्याचा तुजवरि, भार विनवितों पदांबुजिं शीर ॥वि०॥३॥
पद ५ वें -
कधी भेटसी विरविठ्ठला । निज सदय ऐसी गर्जे वेद वाणी ॥धृ०॥
संसार जनित त्रिविध ताप अनुभवितां देहू कष्टला । दुष्ट दुरात्मे कल्पुनि कपटें नाना गांजिती मला । मोठे कुटील कुमति जाती नरकासि प्राणी ॥क०॥१॥
सच्चित्सुख स्वरूपीं वृत्ती विराया जिव तिष्टला । मुक्ति सुखास्तव भक्ति नवविधा लागला छंद आपला । मज नावडे विषयि जन पातकाची खाणी ॥क०॥२॥
राम नाम स्वहितातें नेणुनि ज्याचा हेतु भ्रष्टला । नष्ट खलांचा संग नको मज देवा प्रार्थितों तुला विष्णु कृष्ण जगन्नाथ जोडितसे पाणी ॥कधी भेटसी विरविठ्ठला॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP