मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
४१ ते ५०

अभंग - ४१ ते ५०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


४१
माझ्या जिवीच्या जिवलगा । येरे धांवत लगबगा ॥१॥
जीव पावला हा कंठीं । आत्म दर्शन इच्छेनें काळकंठीं ॥२॥
निमिष लव पळ घडि दिवस जाय । तो मज तुजविण युग सम होय ॥३॥
माझे अपराथ घालुनि पोटीं । देरे झडकरिं रामा भेटी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे पाय वंदिन माथा ॥५॥

४२
तुझा माझा हरिल वियोग । ऐसा होईल कधिं आत्मयोग ॥१॥
आपुली वाट पाहुनि आहे सीतापती । कधीं करिसी स्थिर माझी मती ॥२॥
आज किंवा ऊद्यां येसी । ऐसी जीवा या असोसी ॥३॥
दर्शन इछा न भागली । माझी फुकट वयसा गेली ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । कळविलि माझी सर्व गाथा ॥५॥

४३
पुरे पुरे केला हट । आतां धांउनि ये झटपट ॥१॥
मज तुजविण कंठवेना । तुज असती भक्त नाना ॥२॥
बहुत बायकांचा पती । स्त्रिवियोग दुःख नेणे त्याची मती ॥३॥
तैसें तुज झालें देवा । मज विसरसि रे राघवा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सांगु कोणा माझी कथा ॥५॥

४४
प्रभो जानकीच्या नाथा । मज दाखविं आत्म पथा ॥१॥
दयासिंधू तूं साचार । मज कळवीं आत्म विचार ॥२॥
तरिच माझें जन्म नराचें । होय नातरि पशु वानरांचें ॥३॥
वानर उपमा मज न साजे । आत्म भक्त मारुति गाजे ॥४॥
अंगद सुग्रिवादि नळनीळ । भक्त समूहचि वानर दळ ॥५॥
पशुहुनि मी अज्ञान जड । शुद्ध जातीनें दगड ॥६॥
तारिसि नाम बळें पाषाण । त्याहुनि वाटे मी मज ऊणा ॥७॥
ऐसी अंतरिंची हरि माझी लाज । साधुनि आत्म दर्शन काज ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । निकट असुनि न भेटसी हृदयस्था ॥९॥

४५
कोण कोणाचीं संसारीं । मिथ्या पुत्र कलत्रादि हीं सारीं ॥१॥
एक आपण तारक मज साचा । साक्षी आनंदघन जीवाचा ॥२॥
जें दिसतें तें सर्व खोटें । आपण माझें भाग्य मोठें ॥३॥
ऐसें आठउनि डोळ्यां वाटे । भळ भळ अश्रु धारा सुटे ॥४॥
आपणाविणा रहावेना सर्वथा । भेटी देरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

४६
काय माझे दोष पहासी । ऐकुनि बोल उगीच रहासी ॥१॥
करिं अपराधांची क्षमा । पदर पसरितों तुज रामा ॥२॥
माझ्या जिवाच्या विश्रामा । दाविं आपणातें सुख धामा ॥३॥
माझें मीपण जाळुनि टाकीं । भेट आपण येका येकीं ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सच्चित्सुख ये आपण स्वता ॥५॥

४७
ग्रासुनि माझा अहंकार । कळविं आपणचि सुख सार ॥१॥
तरि या जन्माचें सार्थक । आपण भेटला जरि देव एक ॥२॥
वृत्ती उठती त्या निवारीं । सच्चित्सुखमय आत्मविचारीं ॥३॥
स्थीर करीं माझ्या मना । दुरउनि मज विषय कामना ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । करिं माझी सार्थकता ॥५॥

४८
रात्र सरली दिवस आला । दिवससरतां रात्रि भाग झाला ॥१॥
दिवे लाउनि जागोजागीं । पुढें जेवणाची लगबगी ॥२॥
बरी करूनियां खटपट । यथा सांग भरिलें पोट ॥३॥
पुढें मारुनि पोट सुस्ती । शयनीं घोरत पडावें निद्रिस्थी ॥४॥
निद्रा सरतां जागा होउनि ओरडला । म्हणे कोंबडा आरवला ॥५॥
अरे उठारे सकळ । होत आला प्रातः काळ ॥६॥
पुढें जेवण्याचि तयारी । बाइकांसी दटवण भारीं ॥७॥
नाना जिनसी मिष्ट सांबारीं । भुर्के मारुनि आयुष्य सारी ॥८॥
मुर्ख ते वय गेलें सीता कांता । येउनि तारिं विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥९॥

४९
तुज कळविलें वृत्तांता । जें तूं करिसी तें करीं आतां ॥१॥
माझा धरूनियां कळवळा । येसि निश्चय हा घननीळा ॥२॥
तुज नमितों मी साष्टांग । सोडीं आला जरि तुज माझा राग ॥३॥
माझे गुण दोष मज आठवती । करिं मज पावन सीतापती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । डोळे भरी तुज पाहीन येतां ॥५॥

५०
आतां शरण मी कोणा जाऊं । तुजवीण प्रभू कैसा राहुं ॥१॥
जिविं लागली तळमळ । परि तुज न येची कळवळ ॥२॥
आपण सर्वांसी आरंभ । भेटि देरे न करीं विलंब ॥३॥
वाट लक्षुनि आपुली आहें । कृपा दृष्टी येउनि पाहें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुजठावी अंतर्व्यथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP