मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
स्वमत मत निवारण

स्वमत मत निवारण

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ श्रीगणेशायनमः ॥ अथ स्वमत स्थापनपूर्वक अन्य मत निवारण प्रारंभः ॥
स्थूळ आणि लिंगाचा । साक्षी झालों साचा । परी मी तो कोण कैंचा । शोध घेतां न लागे ॥१॥
तरी आतां माझी दशा । कैशी होईल कळे कशी । माझी शुद्धी सांगे ऐसा । भेटों गुरु देवा गा ॥२॥
गुरु केले बहु परी । माझी शुद्धी परोपरी । सांगताती खरी वैखरी । परी मी मज न कळे ॥३॥
बहु गोसावी धुंडिले । बहूतांसी संवादिलें । जे जे म्हणती आम्ही भले । परी मज न माने ॥४॥
साधनाची परि नाळिका । एकाहूनि एकाधिका । लोकां ज्ञान सांगे निका । परि मज न माने ॥५॥
काशीपासूनि रामेश्वर । वरी धुंडिले मी सारे । परी करीं माझा कर । धरी ऐसा न मिळे ॥६॥
प्रस्थान त्रय पंचदशी । योगी वितरागी संन्यासी । भगवद्गीता ग्रंथासी । यथासांग सांगती ॥७॥
स्थूळ लिंगाचें साक्षित्व । विराट सूत्रात्मा कळत । तोचि आत्मा ऐक्य तत्व । म्हणूनि स्वस्थ राहिलों ॥८॥
परी त्यांत आत्मज्ञान । नाहीं ऐसें झालें भान । निरतिशय समाधान । साक्षीत्वांत न होय ॥९॥
साक्षीत्वांत बारा वरुषें । निकट केला मी अभ्यास । घरदार सांडूनी आस । सत्संगती म्या केली ॥१०॥
श्रवण मनन निजध्यास । साधु सेवा श्रवण ध्यास । एकांतादि अभ्यास । करितां हाडें राहिली ॥११॥
परि मज माझी शुद्धी । नाहीं लागली त्रिशुद्धी । नंतर जाहला जो विधी । तोचि सांग वैष्णव ॥१२॥
जन्मांतरीं ऋणी देव । ऋण फेडावया माव । कपट रूपें मानव । होऊनि भेटे सद्गुरु ॥१३॥
दर्शन होतां शक्तिपात । नेत्रांतूनि केला त्यांत । महिने तिनी मी निवांत । निर्विकल्पीं पडिलों ॥१४॥
तुर्यावस्थेंत मी आलों । सद्गुरुनीं उपदेशिलों । मग मी चरणीं लागलों । हंसशाखा दीधली ॥१५॥
इष्टत्वाचा जो अभ्यास । करूनि शब्दानुविद्धास । पात्र ऐसा परिक्षेस । उतरलों गुरूंचा ॥१६॥
मग गुरुनीं सांगितलें । आपणा जाणा तूं वहिलें । मग मीं धरिलीं पाउलें । पूर्ण झालों ह्मणूनी ॥१७॥
गुरु ह्मणती पूर्णत्वाला । जाणिलें कैसें सांग मला । मग मी सांगितलें त्यांला । सर्वसाक्षी मी असें ॥१८॥
जागृतींत मी स्वप्नांत । सुषुप्तींत मी सर्वगत । चैतन्य साक्षी मी कूटस्थ । अंतर्बाह्य व्याप्त मी ॥१९॥
मुंगीपासूनि ब्रह्मांडांत । स्थावर जंगम जगतांत । मीचि बोलत चालत । ज्ञानाज्ञानी मी झालों ॥२०॥
ऐसें ऐकूनि सद्गुरू । हासिन्नले परिचारू । ब्रह्मादिका हा अंतरू । शक्रादिका हाच मी ॥२१॥
सनकादिकीं केला प्रश्न । ब्रह्मा झाला संशय खिन्न । हंसावतार होऊन । संशयछिन्न झाले ते ॥२२॥
ज्ञान गर्वाचा जो ताठा । येवूनि धिःकारिला होता । व्यासो नारायण पिता । कथा काय इतरांची ॥२३॥
सविकल्प दृष्यानुविद्ध । समाधी वेदांतीं प्रसिद्ध । तो तुज घडला शिष्या सिद्ध । पिंडीं आणि ब्रह्मांडीं ॥२४॥
तुझा कांहीं मी उतराई । होऊं शिष्या सांग कई । इतुक्या योग्यतेचा आई । बाप नाहीं प्रायशः ॥२५॥
दृष्यानुविद्धांत गुंतले । कृतकृत्य वैष्णव झाले । परी ते जाणावे वेडे खुळे । गेली नाहीं विस्मृती ॥२६॥
कारण देहाचा विचार । ऐका सांगतों मी सार । कारणांत जो जागर । द्रष्टासाक्षी म्हणे तो ॥२७॥
जैसा स्वप्नांत जागता । स्वप्न व्यवहार करितां । त्यासी जैसा मी निस्था । ऐसें भान असेना ॥२८॥
जागृतींत ऐसा जागा । तैसा स्वप्नीं मानी जागा । व्यवहार सर्व उगा । तैसा द्रष्टा साक्षी तो ॥२९॥
जागृतींत मी अज्ञानी । ऐसें भान नाहीं जनीं । तैसा द्रष्टा साक्षी ज्ञानीं । ह्मणूनी मानी आपणा ॥३०॥
स्वप्नीं वाघ लागे पाठीं । नाना व्यथा उद्भवती । बेडी खोडाही घालिती । जागा होतां मिथ्या तें ॥३१॥
जागा जैसा ह्मणे जागा । स्वप्न व्यथा गेली ना गा । इष्टा तैसा मानीं भगा । आत्म ज्ञान ऐश्वर्या ॥३२॥
आतां असो हा पाल्हाळ । दीप प्रकाश बहूळ । आधार असे त्याचा खोल । तैसा द्वैता साक्षी तो ॥३३॥
लोकां सांगे ब्रह्मज्ञान । अंतर्बाह्य परिपूर्ण । त्याच्या अंतरींची खूण । अनुभवी जाणती ॥३४॥
सुखाकारणें तळमळी । जैसी जिवनावीण मासोळी । श्वान हाडातें चिघळी । रक्त पीतो दाढेचें ॥३५॥
क्षुधा असतां ह्मणे धाला । पोटीं जठराग्नीं पेटला । आंगीं मिरवे टिळे माळा । क्षुधा गेल्या सारिखा ॥३६॥
ऐसी परी दृष्टत्वाची । दशा सांगितली साची । मती काय वैष्णवांची । श्रोतीं क्षमा करावी ॥३७॥
आपणासी पाहूं गेला । जीव भ्रमें भांबावला । ह्मणे आतां मी मजला । कैसा आहे न कळे ॥३८॥
दृश्य सांडूनि राहणें । सद्गुरु शिष्यासी तो म्हणे । दृश्य सांडूनि असणें । दृष्टांतेंसी सांगावें ॥३९॥
ऐसें सद्गुरुनीं विनविलें । सावध होऊनी बोलिले । तेंचि ऐकावें हो भलें । एकाग्र चित्तें करोनी ॥४०॥
प्रतीपचंद्रमाची रेखा । शुक्लपक्षी सूक्ष्म देखा । त्याची पहावया कोका । लोक ज्ञाता पाहिजे ॥४१॥
तैसी सद्गुरु अपेक्षा । आत्म प्राप्ती लागीं देखा । जेथें तेथें गुरु एका । एकाहूनी अधिक ॥४२॥
असद्गुरु मध्यम गुरु । तिजा जाणावा सद्गुरु । तिन्ही गुरुंचा प्रकारु । विषद करूनी सांगतों ॥४३॥
जारण मारण उपदेशी । असद्गुरु नांव त्यासी । वेद विधान मंत्रासी । उपदेशी तो मध्यम ॥४४॥
करूनि आत्मत्व प्रकाश । महावाक्याचा उपदेश । साधन क्रम सावकाश । यथायोग्य श्रवण ॥४५॥
मंदाधिकारी मध्यमाधिकारी । उत्तमाधिकारी तिन्ही परी । त्याही ऐकाव्या चतुरीं । शिष्यामधें परोपरी, यथा योग्य उपदेशी ॥४६॥
साधनाच्या तिनी परी । त्याही ऐकाव्या चतुरी । तिनी समाधी शरीरीं । तिनी जाण ब्रह्मांडी ॥४७॥
सविकल्प निर्विकल्प । सविकल्पीं दोनी कल्प । निर्विकल्प समाधी स्वल्प । निवांत जैसा दीप तो ॥४८॥
एक एक समाधीस । सावूनि गुरुमुखें श्रवणास । करूनि तत्पर सेवेस । अत्यादरें असावें ॥४९॥
श्रवण मनन निजध्यास । आत्मसाक्षात्कारास । वेळ नाहीं वैष्णवास । शरण गेलें पाहिजे ॥५०॥
इति श्रीलघुआत्ममथने गुरु शिष्य कथने अन्य मत निवारण नाम त्रितियपद समाप्तः ॥ श्रीरामचंद्रार्पंणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP