मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
३१ ते ४०

अभंग - ३१ ते ४०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


३१
सच्चिदानंदा जगदीशा । मज फिरवुं नको दशदीशा ॥१॥
एक आपण आहे बरा खरा । दृढनिश्चय याचा करा ॥२॥
सर्व साक्षी तूं समजसी । रामराया निजमानसीं ॥३॥
आतां उशीर लाऊं नका । स्वामी जानकी नायका ॥४॥
येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा । देरे दर्शन मज समर्था ॥५॥

३२
धन्य आपुली करणी । पापी उद्धरिसी स्मरणीं ॥१॥
ऐसें आइकों पूराणीं । नव्हे लटकी व्यास वाणी ॥२॥
ऐसा निश्चय माझा चित्ता । तरि मज कळवीं आपुला पत्ता ॥३॥
कां रे तळमळविसि तूं मातें । असुनी अखंड आमुचें नातें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि एक प्रति पाळिता ॥५॥

३३
आजि वाढवेळ तुज झाला । येतां मार्गीं कोण आड आला ॥१॥
आडविला काय वाटे । माझें कर्मची उफराटें ॥२॥
जळों वाटे माझी काया । तुझा वियोग न साहे रामराया ॥३॥
जीव जाउं पाहे माझा । काय पहासी श्री रघुराजा ॥४॥
दर्शन देरे लवकरिं आतां । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

३४
ऐसा कोण तरी ऊपाय । जेणें दाविसि तूं निजपाय ॥१॥
मज कळवीं श्रीरघुनाथा । तुझ्या चरणीं ठेविन माथा ॥२॥
जीव जाहला बेजार । पुरे पुरे प्रभु हा संसार ॥३॥
माझ्या ग्रासूनी मी पणा । उदय रुपा दावी आपणा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझ्या अज्ञान व्यथा ॥५॥

३५
माझ्या बोलण्याच्या रागा । धरुनी न येसी तूं कां गा ॥१॥
मी हा अपराधी मोठा साचा । साक्षी माझ्या तूं मानसाचा ॥२॥
परि या सर्वांसी तूं मूळ । मज लावावया खूळ ॥३॥
जरि मज भेटला तूं असता । तरि हा प्रसंगाचि आला नसता ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटि दे रे मज येउनि स्वतां ॥५॥

३६
कोण आड आले तुज । येथें येतां सांगे मज ॥१॥
माझ्या जिवींच्या जीवना रामा । त्यांची लपवुं नको रे नामा ॥२॥
हां केली आठवण त्वां रामें । साहा शत्रूचीं हीं कामें ॥३॥
करिं त्याचा बंदोबस्त । रावणादि त्वां वधिले मस्त ॥४॥
मारुनि दुष्टां त्यां समस्तां । दर्शन देरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

३७
जरि त्वां धरिला माझा राग । येउनि आपुल्या मुखें सांग ॥१॥
ह्मणसि जरि आलों तुजपाशीं । तरि तूं पापी मुक्त होसी ॥२॥
तरि काय होइल वाईट । कार्य साधेल आमुचें नीट ॥३॥
मी पतीत तूं पावन । जमेल अर्थानुसंधान ॥४॥
सोडीं संषयरे समर्था । येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

३८
भलि आठवण झाली मज । भय वाटे एकचि तूज ॥१॥
किं हा मागेल वैकुंठ । संषय न धरिं मी न शुंठ ॥२॥
सच्चिदानंदा श्रीरामा । वैकुंठाहुनि आत्म प्रेमा ॥३॥
तुझें वैकुंठ तुला असों । सच्चित्सुखमय आपण दीसों ॥४॥
करिं इतुका उपकार आतां । ये किं विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

३९
किति किति तुज आळविलें । अजुनि आपुलें येणें न झालें ॥१॥
काय खोटा मी दैवाचा । लाभ जरि ना तुझा राघवाचा ॥२॥
जळों जळों हें माझें जीणें । वाटे सर्वांहुनि जें ऊणें ॥३॥
धांव धांव जानकि कांता । भेट देईं मज एकांता ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझी तळमळ व्यथा ॥५॥

४०
नको लावूं रे ऊशीर । तूं मज प्राण सखा रघुवीर ॥१॥
तूंचि मज एक माता पिता । जरि सोडिसि कोणि नाहीं त्राता ॥२॥
छळ मांडु नको रे माझा । साधीं आत्म दर्शन काजा ॥३॥
करुनी कृपा दृष्टी रामा । ये रे धांवुनि निज सुख धामा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझी तळमल व्यथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP