मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री नारसिंहाचीं पदें

श्री नारसिंहाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
भय काय आतां मज नरहरी भेटला ॥धृ०॥
पूर्ण ज्योती चिन्मय जो कां । मिथ्या जग नटला ॥भ०॥१॥
हरला जो हृदयांतिल संषय । प्रेमा मनीं झटला ॥भ०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । धन्य दिवस वाटला ॥भ०॥३॥

पद २ रें -
जन सर्व या हो भेटूं नरहरिला ॥धृ०॥
मिथ्या हें जग जाणुनि ज्याला । संतीं दृढ धरिला ॥ज०॥१॥
आत्मज्ञान सुखें भक्तांचा जेणें भ्रम हरिला ॥ज०॥२॥
चिन्मात्रास जगन्नाथात्मज । कृष्णें आदरिला ॥जन सर्व या हो भेटूं नरहरिला॥३॥

पद ३ रें -
जय नमोस्तुते श्री नरसिंह संसार जलिधि हा फार कठिण विनवूं किती तारिं सदय हृदय ॥ज०॥धृ०॥
नष्ट दुष्ट किति कष्टवितो मज, स्पष्ट सांगतों जिव दमला । साच मननिं पाहतां तूंचि जननि जनक, लक्ष्मीपते हरिं हरिं भवभय ॥ज०॥१॥
प्रल्हादास्तव हिरण्यकशिपु वधि, शरण्य आपण जनिं ठाउक । चहुं कडुनि कडकडुनि स्तंभीं प्रगटे, सुर कांपति करि भक्तांसि अभय ॥ज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ नृहरि, तव दास पहा निज पदीं रमला । मनिं घसर होउनि कधिं विसर न पडुं, सत्संगति वाटे जिवाहुनि प्रिय ॥ज०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP