जातं मय्येव सर्वं पुनरपि मयि तत्संस्थितं चैव विश्वं
सर्वं मय्येव याति प्रविलयमिति तद्बह्म चैवाहमस्मि ।
यस्य स्मृत्या च यज्ञाद्याखिलशुभविधौ सुप्रयातीह कार्यं
न्यूनं संपूर्णतां वै तमहमतिमुदैवाच्युतं सन्नतोऽस्मि ॥१०१॥
अन्वयार्थ-‘सर्वं मयि एव जातं पुनः अपि च तत् विश्वं मयि संस्थितं-’ सर्व द्वैतजात माझ्या ठिकाणींच उत्पन्न झालें आहे आणि पुनः तें विश्व माझ्यामध्येंच स्थित आहे. ‘तत् सर्वं मयि एव प्रलयं याति-’ तें सर्व माझ्यामध्येंच लीन होतें; ‘इति च ब्रह्म एव अहं अस्मि-’ यास्तव तें ब्रह्मच मी आहें. ‘च यस्य स्मृत्या यज्ञाद्यखिलशुभविधौ न्यूनं कार्यं वै संपूर्णतां सुप्रयाति-’ शिवाय ज्याच्या स्मरणानें यज्ञादि सर्व कृत्यांत न्यून कर्महि निश्चयानें संपूर्ण होतें, ‘तं अच्युतं एव अहं अतिमुदा सन्नतोऽस्मि-’ त्या अच्युताला-(स्वात्म्याला-)च मोठ्या आनंदानें मी सांष्टांग प्रमाण करितों. आतां ह्या शेवटच्या उपसंहारात्मक श्लोकांत भगवान् आचार्य ‘सर्वांच्या उत्पत्तिस्थितिलयाचा आधार ब्रह्म आहे’ असें स्वतःच्या आत्म्यामध्यें ब्रह्माचें अनुसंधान करावें ह्मे माझा आत्माच सर्वाधार ब्रह्म आहे अशी सर्वदा चित्ताची भावना ठेवावी, व स्वात्मज्ञान झालें असतांच सर्व कर्में समाप्त होतात, असें येथें स्पष्टपणें सांगून स्वात्म्याला नमस्कार करितात-हें सर्व द्वैतजात ब्रह्मरूप कूटस्थ जो मी आत्मा त्या माझ्यामध्यें (माझ्या आधारानें) उत्पन्न झालें आहे ह्मे ब्रम्ह व आत्मा एक आहेत असें मला ज्ञान झालें आहे. ‘एव-’ शब्दानें येथें ब्रह्मीभूत आत्म्याहून सृष्टीला अन्य कोणीहि आधार नाही, असें सुचविलें आहे. या ठिकाणीं उत्पन्न होणें ह्मे नामरूपानें व्यक्त होणें असा अर्थ आहे. उत्पत्तीनंतरहि हें सर्व जगत् माझ्या (शबल-कारण-ब्रह्माच्या) आधारानें असतें आणि निद्रा व प्रलयकालींहि तें माझ्या मध्येंच लीन होतें.प्रलयकालीं तें पुनरुत्पत्तीला कारण होणार्या संस्कारांसह लीन होत असल्यामुळें त्याला प्रविलय व मुक्तिकालीं आत्मज्ञानानें कारणासह द्वैताचा नाश होत असल्यामुळें त्याला मोक्ष असें म्हणतात. ‘‘यतो वा इमाने तद्बह्मेति’’ या तैत्तिरीयश्रुतिप्रतिपादितलक्षणयुक्त ब्रह्म, सृष्टीला तीन्ही कालीं कारण होत असल्यामुळें तें तिचें उपादान कारण होय. तसेंच देश, काल, वस्तु इत्यादिकांच्या योगानें ज्याला किंचित्हि गौणत्व येत नाहीं असें तें ब्रह्मच मी (महावाक्यस्थ ‘अहं’ पदाचा लक्ष्यार्थ) आहे, म्हणून ज्या ब्रह्मरूप प्रत्यगात्म्याचें स्मरण केल्यानें यज्ञादि सर्व शुभविधींत एखादें कर्म (मंत्रतंत्रादिकांनीं) न्यून असलें तरी निःसंशय पूर्ण होतें (इष्टफल देण्यास समर्थ होतें),त्या स्वभावापासून कधींच च्युत न होणार्या ब्रह्मरूप आत्म्याला मी (ब्रह्मज्ञानी) मोठ्या आनंदानें साष्टांग नमस्कार करितों ह्मे आठ अंगांच्या आठ प्रकृतींसह त्यांत लीन होतो] १०१
ह्याप्रमाणें श्रीमच्छंकराचार्यकृत शतश्लोकीचें आचार्यभक्त विष्णुशर्माकृत मराठी सान्वयार्थ-विवरण समाप्त झालें.