वैराजव्यष्टिरूपं जगदखिलमिदं नामरूपात्मकं ।
स्यात्अन्तःस्थप्राणमुख्यात्प्रचलति च पुनर्वेत्ति सर्वान् ॥
पदार्थान् नायं कर्ता न भोक्ता सवितृवादिति यो ज्ञानविज्ञानपूर्णः
साक्षादित्त्थं विजानन् व्यवहरति परात्मानुसंधानपूर्वम् ॥१३॥
अन्वयार्थ-‘इदं अखिल नामरूपात्मकं जगत् वैराजव्यष्टिरूपं स्यात्-’ हें सर्वही नामरूपात्मक जगत् विराट्स्वरूप परमात्म्याच्या व्यष्टिरूप आहे; ‘पुनश्च अंतःस्थप्राणमुख्यात् प्रचलति-’ आणि पुनः सर्व जगद्यवहार त्यांतील चैतन्यामुळें होतो. ‘ (तथा तस्मादेव) सर्वान् पदार्थान् वेत्ति-’ त्या चैतन्यामुळेंच सर्व पदार्थांचें ज्ञान होतें. ‘सवितृवत् न अयं कर्ता न भोक्ता इति ज्ञानविज्ञानपूर्णः यः भिवर्ति-’ तसेंच सूर्याप्रमाणें हा कर्ता किंवा भोक्ता नव्हे, अशा परोक्ष व अपरोक्ष ज्ञानानें जो पूर्ण असतो. ‘स साक्षात् इत्थं विजानन् आत्मानुसंधानपूर्वं व्यवहरति-’ तो प्रत्यक्ष हें असें आहे असें जाणून आत्मानुसंधानपूर्वक सर्व व्यवहार करितो. ज्यिाची अंतःकरणवृत्ति आत्मरूप झालेली आहे तो पुरुष ज्यावेळीं बाह्यदृष्टि होतो, म्हणजे प्रारब्ध कर्मानुरूप व्यवहार करूं लागतो, त्यावेळीं हें सर्वही नामरूपात्मक विचित्र जगत् स्थूल समष्टिरूप जो विराट् त्या परमात्म्याच्या व्यष्टिरूप आहे म्हणजे त्याची ही एक आकृति आहे,अशी भावना करून जगांतील कोणत्याही प्राण्याची किंवा पदार्थाची निंदा किंवा त्याचा मत्सर न करितां व्यवहार करितो; त्याचप्रमाणें हें सर्वही विराडात्म्याच्या व्यष्टिरूप असलेले जगत् अंतस्थ चिद्रूप मुख्य प्राणाच्या योगानें व्यापार करितें, तसेंच त्या चैतन्यामुळेंच सर्व पदार्थांना जाणतें; असे जाणून त्या परमात्म्याचे ठिकाणीं अनुसंधान ठेवून तो व्यवहार करितो. तसेंच, हा आत्मा सूर्याप्रमाणें सर्वांना चेतना देणारा असला तरी कर्तृत्वाभिमानशून्य असल्यामुळें कर्ता नव्हे, व सर्व पदार्थांचा अनुभव घेत असूनही भोक्तृत्वाभिमानशून्य असल्यामुळे तो भोक्ताही नव्हे, इत्यादि शास्त्रोत्पन्न ज्ञानानें व साक्षात् अनुभवानें जो पुरुष पूर्ण झालेला असतो, तो हें असेंच आहे असें निश्चयानें जाणून, सर्वदा आत्म्याकडेच अनुसंधान ठेवून व्यवहार करितो. १३.