वृक्षच्छेदे कुठारः प्रभवति यदपि प्राणिनोद्यस्तथापि प्रायोऽन्नं
तृप्तिहेतुस्तदपि निगदितं कारणं भोक्त्यत्नः ।
प्राचीन कर्म तद्वद्विषमसमफलप्राप्तिहेतुस्तथापि स्वातंत्र्यं
नश्वरेऽस्मिन्न हि खलु घटते प्रेरकोऽस्यांतरात्मा ॥८४॥
अन्वयार्थ-‘यदपि वृक्षच्छेदे कुठारः प्रभवति तथापि प्राणिनोद्यः-’ कुऱ्हाड जरी वृक्ष तोडण्यास समर्थ आहे तरी प्राणी तिला प्रेरणा करील तेव्हांच ती तें कार्य करिते. ‘प्रायः अन्नं तृप्तिहेतुः तदपि
भोक्तृयत्नः कारणं निगदितम्-’ क्षुधाशान्तीला जरी अन्नच कारण आहे तरी त्याला भोक्त्याचा प्रयत्नहि कारण असतो, असें सांगितलें आहे. ‘तद्वत् प्राचीनं कर्म विषमसमफलप्राप्तिहेतुः-’ तसेंच प्राक्तन कर्मच जरी बर्यावाईट फलप्राप्तीला कारण आहे ‘तथापि नश्वरे अस्मिन् स्वातंत्र्यं न हि खलु घटते-’ तरी त्या विनाशी कर्माच्या ठिकाणीं स्वतंत्रता संभवत नाहीं. (तें स्वतःच फल देण्यास समर्थ नाहीं.) ‘(अतः) अस्य प्रेरकः अन्तरात्मा-’ ह्मणून त्याचा प्रेरक अन्तरात्मा आहे. पूर्व श्लोकांत जरी कर्माची प्रसंशा केलेली आहे तरी केवळ कर्म अचेतन असल्यामुळें फल देण्यास असमर्थ असतें. ह्मणून सचेतन ईश्वर जेव्हां त्याला प्रेरित करील तेव्हांच तें फलाला कारण होतें, असें दृष्टान्त देऊन येथें सिद्ध करितात-वृक्ष तोडण्यास कुऱ्हाडच पाहिजे. तिच्यावांचून वृक्षच्छेद कधीहि होणार नाहीं; हें खरें. पण ती जड असल्यामुळें प्राण्याच्या साहाय्यावांचून तिला ती क्रिया करितां येत नाहीं. किंवा अन्नच क्षुधाशांतीला जरी कारण होत असलें तरी ग्रास उचलणें, चर्वण करणें, कोठ्यांत तें जिरविणें इत्यादि क्रिया करण्याकरितां सचेतनाची आवश्यकता असते, हें सर्वांना ठाऊक आहे. तसेंच पूर्वकर्म जरी सम किंवा विषम फल देण्यास कारण आहे. तरी तें दृष्टान्तस्थ कुऱ्हाडीप्रमाणें किंवा अन्नाप्रमाणें अचेतन आहे. शिवाय कर्म तत्क्षणींच नाश पावते असतें, हेंहि प्रत्यक्षसिद्ध आहे. अर्थात् त्यांना फलोन्मुख होण्याविषयीं प्रेरणा करणार्या आत्म्याचें साहाय्य लागतें. या सर्वांचें तात्पर्य असें प्राणी जीं बरींवाईट कर्में करितो तीं तत्क्षणींच नष्ट होतात; पण त्यांचे धर्माधर्मरूप संस्कार आत्म्यामध्यें असतात. पुढें फलभोगाची वेळ आली असतां त्यांना तो कर्मसाक्षी प्रेरणा करितो; व अविद्येमुळें देहाच्या ठिकाणीं आत्माभिमान ठेवणारा जीव त्यांचा भोग घेतो. श्रुतिस्मृतींतूनहि असेंच प्रतिपादन केलेलें आहे] ८४