यावान्पिण्डो गुडस्य स्फुरति मधुरिमैवास्ति सर्वोपि तावान्यावान्कर्पूरपिण्डः
परिणमति सदामोद एवात्र तावान् ।
विश्वं यावाद्विभाति द्रुमनगनगरारामचैत्याभिरामं तावच्चैतन्यमेकं
प्रविकसति यतस्तत्तदात्मावशेषम् ॥६२॥
अन्वयार्थ-‘यावान् गुडस्य पिण्डः स्फुरति तावान् सर्वः अपि मधुरिमा एव अस्ति-’ जेवढा गुळाचा खडा दिसतो तेवढा तो सर्वहि गोडीनें युक्त असतो. ‘(तथा) यावान् कर्पूरपिण्डः अत्र तावान् सदा आमोदः एव परिणमति-’ तसेंच, जेवढा कापराचा खडा असतो तेवढा तो सर्वहि सर्वदा वासानें भरलेला असतो. ‘यावत् द्रुमनगनगरारामचैत्याभिरामं विश्वं विभाति तावत् चैतन्यं एकं प्रविकसति यतः तत् तत् आत्मावशेषम्-’ त्याचप्रमाणें वृक्ष, पर्वत, नगरें, उपवनें, यज्ञभूमि इत्यादिकांनीं रमणीय वाटणारें हें जगत् जेवढें म्हणून प्रत्ययाला येतें तेवढें तें सर्वहि एक चैतन्यच स्फुरत असतें. कारण तें तें सर्वहि पदार्थजात आत्म्याचाच अंश आहे. पुनः अन्य तऱ्हेनें आत्म्याचें सर्वात्मकत्व सिद्ध करितात. जेवढा गुळाचा खडा तेवढी गोडी किंवा जेवढा कापूर तेवढाच परिमल असा व्यवहारांत आपणाला नेहमीं अनुभव येतो. त्याचप्रमाणें वृक्षादि अनेक पदार्थांनीं भरलेलें हें जगत् जेवढें म्हणून प्रत्ययाला येतें तेवढें तें सर्वहि चैतन्यच आहे; अन्य कांहीं नाहीं. कारण जो जो पदार्थ आपण पहावा तो तो सर्वहि आत्म्याचाच शेष आहे. तो परमात्मा आपल्या एका अंशानें सर्व सृष्टीला व्यापितो, व त्याचे तीन अंश केवल अवस्थेंत असतात; असें वेदवचनहि आहें] ६२.