स्वीकुर्वन् व्याघ्रवेषं स्वजठरभृतये भीषयन्यश्व मुग्धान् ।
मत्वा व्याघ्रोऽहमित्थं सनरपशुमुखान् बाधते किंनु सत्त्वान्
मत्वा स्त्रीवेषधारी स्त्र्यहमिति कुरुते किं नटो भर्तुरिच्छां ।
तद्वच्छरीर आत्मा पृथगनुभवतो देहतो यः स साक्षी ॥७॥
अन्वयार्थ-‘यः (कश्चित् पुरुषः) स्वजठरभृतये व्याघ्रवेषं स्वीकुर्वन् मुग्धान् भीषयन् (आस्ते सः) अहं व्याघ्रः इत्थं मत्वा सनरपशुमुखान् सत्त्वान् बाधते किंनु?-’ जो (कोणी एखादा पुरुष) आपलें उदर भरण्याकरितां वाघाचा वेष घेऊन अज्ञ बालकांना भिववीत असतो, तो मी व्याघ्र आहें असें मानून मनुष्य, पशु इत्यादिकांसहवर्तमान इतर प्राण्यांना पीडा करितो काय? ‘तथा स्त्रीवेषधारी नटः अहं स्त्री इति मत्वा भर्तुरिच्छां कुरुते किं?-’ किंवा स्त्रीवेष घेतलेला नट मी ‘स्त्री’ आहें असें मानून पतीची इच्छा करितो काय? ‘तद्वत् शारीरः आत्मा देहतः यः अनुभवतः पृथक् अस्ति सः साक्षी-’ त्याप्रमाणेंच शरीराभिमानी आत्मा कीं जो अनुभवानें देहाहून निराळाच आहे, तो साक्षी (ह्मणजे पहाणारा-अर्थात देहाचा व त्याचा कांही संबंध नाहीं. याप्रमाणें जीवाला देह जरी प्राप्त असला तरी तो पारमार्थिक(सत्य) नव्हे, तर अविद्येनें कल्पित असल्यामुळें कृत्रिम आहे. म्हणून देहाला अनुसरून आत्म्याचें वागणें कधीही योग्य होणार नाहीं; असें येथें दृष्टांतानें आचार्य निश्चित करतात-एखादा पुरुष भिक्षा मागून पोट भरण्याकरितां वाघाचा वेष घेतो आणि त्या वेषानें अज्ञ बालकादिकांना भिववीत रस्त्यांतून फिरत असतो. पण तो, माझ्या वेषानुरूप मी खरोखरच व्याघ्र आहें असें समजून प्राणिमात्रांची खर्या वाघाप्रमाणें हिंसा करितो काय? छेः कधींच नाहीं. तर तो माझा हा व्याघ्रवेष माझ्या खर्या स्वरूपाहून निराळा आहे असें जाणून आपल्या वेषाला शोभेल असें (वाघासारख्या उड्या मारणें, ओरडणें, हातरवारे करणें इत्यादि) कर्म करीत असतो. हीच गोष्ट आणखी एका दृष्टान्तानें आचार्य स्पष्ट करितात- स्त्रीचा वेष घेणारा नट विषयेच्छा परिपूर्ण करून घेण्याकरितां भर्त्याची इच्छा कधीं तरी करतो का? कधींच नाहीं.तर तो आपल्या स्त्रीवेषाला अनुरूप असे नेत्रविलास, हस्तपादादिकांचें विन्यास इत्यादि हावभाव करून अन्य पुरुषांना मात्र लोभ उत्पन्न करितो. परंतु स्वतः मी स्त्री आहें असें समजून पुरुषसंभोगेच्छा कधींच करीत नाही. त्याचप्रमाणें शरीरानें युक्त असणारा आत्मा देहाहून पृथक् आहे असा ज्याअर्थी अनुभव येतो त्याअर्थी तो देहादिकांच्या क्रियांचा साक्षी आहे. ज्याप्रमाणें व्याघ्रवेषधारी पुरुष आपण व्याघ्र किंवा स्त्री नसून केवळ त्यांचे वेष घेणारे आहों असें पक्के समजून स्ववेषानुरूप चेष्टा करीत असतात त्याचप्रमाणें शरीरोपाधिक आत्मा, अनुभवानें मी शरीराहून पृथक् आहें असें समजल्यानंतर देहवेषानुरूप चेष्टा करीत असूनही स्वतःच्या साक्षिरूपाला विसरत नाहीं. देह पारमार्थिक नाहीं, म्हणून प्राकृत पुरुषाप्रमाणें तदनुरूप चेष्टा न करितां स्वस्वरूपाचें नेहमीं भान ठेवून व्यवहार करीत असावें] ७.