कंचित्कालं स्थितः कौ पुनरिह भजते नैव देहादिसंघं
यावत्प्रारब्धभोगं कथमपि स सुखं चेष्टते संगबुद्ध्य़ा ।
निर्द्वंद्वो नित्यशुद्धो विगलितममताहंकृतिर्नित्यतृप्तो
ब्रह्मानंदस्वरूपः स्थिरममिरचलो निर्गताशेषमोहः ॥९६॥
अन्वयार्थ-‘कंचित्कालं कौ स्थितः इह पुनः देहादिसंघं न एव भजते-’ (तो) कांहीं कालपर्यंत पृथ्वीवर राहिला तरी पुनः येथें देहादिसमूहावर आस्था ठेवीत नाहीं. ‘यावत्प्रारब्धभोगं कथमपि असंगबुद्ध्य़ा सः निद्वरंद्वः नित्यशुद्धः विगलितममताहंकृतिः नित्यतृप्तः ब्रह्मानंदस्वरूपः स्थिरमतिः अचलः निर्गताशेषमोहः सन् सुखं चेष्टते-’ तर प्रारब्धकर्मभोग संपेपर्यंत कसा तरी निःसंग ब्रह्मच आत्मा आहे, अशा ज्ञानानें सुखदुःखादि द्वंदरहित, सर्वदा शुद्ध, ज्याची अहंता व ममता नष्ट झाली आहे, ज्याची बुद्धि स्थिर आहे, जो अचल आहे व ज्याचा सर्व मोह नष्ट झाला आहे, असा तो जीवन्मुक्त पुरुष मोठ्या आनंदानें व्यवहार करितो. आतां या श्लोकांत आचार्य, पूर्वीं सांगितल्याप्रमाणें ज्याला अनुभव आला आहे असा जीवन्मुक्त जगांत कसा व्यवहार करितो तें सांगतात-कांहीं कालपर्यंत (ह्मे प्रारब्ध कर्माचा क्षय होईतों) तो ब्रह्मवेत्ता पुरुष या पृथ्वीमध्यें रहात असल्यासारखा वाटतो. कु ह्मे पृथ्वी असा जरी रूढ अर्थ आहे तरी या ठिकाणीं कु. ह्मे अंतःकरण असा अर्थ करणें योग्य आहे. कारण ब्रह्मदेव, वसिष्ठ इत्यादि आत्मज्ञानी सिद्ध, अन्य लोकांमध्यें रहातात असें पुष्कळ ठिकाणीं सांगितलेलें आहे. म्हणून ‘कु’ या शब्दाचा क्षेत्र (अंतःकरण) असा व्यापक अर्थ करावा. सारांश अंतःकरणांत तो पुरुष रहात असल्यासारखा वाटतो खरा, पण तो तेथें राहूनहि स्थूल देह, स्त्री, पुत्र, मित्र इत्यादि विषयसमूहाचे ठिकाणीं आस्था ठेवीत नाहीं. कारण देहादि सर्व पदार्थ निस्तत्त्व आहेत, अशी त्याची दृढ समजूत झालेली असते व त्यामुळें ते सत्य आहेत किंवा आत्म्याचा व त्यांचा कांहीं संबंध आहे असें तो मुळींच मानीत नाहीं. तो या स्थूलसूक्ष्म देहामध्यें प्रारब्ध कर्माचा क्षय होई तों कसा तरी रहातो. ब्रह्मवेत्ता स्वतः ईश्वर असल्यामुळें तो वस्तुतः माया व प्राक्तन यांच्या अधीन झालेला नसतो. पण त्यांच्या अधीन झाल्यावांचून कर्तृत्व, भोक्तृत्व, सिद्ध होत नाहीं. म्हणून तो प्रारब्धकर्मक्षयापर्यंत देहांत यदृच्छेनें रहातो.तात्पर्य भोक्तृत्वादिकांची अन्य तऱ्हेनें उपपत्तिच लागत नसल्यामुळें व देवादिकांच्या ठिकाणींहि कर्तृत्वादि दिसत असल्यामुळें ब्रह्मवेत्त्याचा व्यवहारहि अनिर्वचनीय आहे असेंच म्हटलें पाहिजे; आणि हें सुचविण्याकरितांच ‘कथमपि’ असें श्लोकांत म्हटलें आहे. तो जीवन्मुक्त ‘माझा आत्मा कोठेंहि आसक्त न होणारा आहे’ अशा सतत भावनेनें मोठ्या आनंदानें व्यवहार करीत रहातो. कारण त्याचे आत्मविषयक सर्व संशय नष्ट झालेले असतात. त्याला असंगबोध कसा होतो व त्याचा परिणाम त्याच्यावर कसा घडतो हें पुढच्या अर्धांतील विशेषणांनीं स्पष्ट करितात. ‘निर्द्वंद्व’ ह्मे तो नित्य शुद्ध असल्यामुळें सुखदुःख, शीतोष्ण, इत्यादि द्वंद्वरहित होतो. ‘नित्यशुद्ध-’ जीव पापपुण्यवान् असल्यामुळें त्याला सर्वदा शुद्ध रहातां येत नाहीं, तर पापामुळें तो बहुतेक सर्वदा अशुद्धच असतो आणि पुण्यामुळें केव्हां शुद्ध होतो. पण आत्मज्ञानी पुरुष ब्रह्मच होत असल्यामुळें त्रिकालींहि पापपुण्यहीन असतो. म्हणून तो नित्य शुद्ध होय. तो नित्यशुद्ध असतो म्हणूनच त्याचा देहेंद्रियादिकांविषयीं अहंकार व देहाहून पृथक् असणार्या पुत्रादिकांविषयीं ममता हीं नष्ट होतात. अहंममभाव नष्ट झाल्यामुळें तो सर्वदा तृप्त असतो. त्याच्या तृप्तीला कधींच प्रतिबंध होत नाहीं. कारण तो अपरिमित आनंदरूप होतो. त्याची बुद्धि ब्रह्माच्या ठिकाणीं स्थिर होते; व तो स्वतः ब्रह्मरूप होत असल्यामुळें अचल होतो. कारण त्याचा मोह मूल अविद्यारूप कारणांसह नष्ट झालेला असतो. तात्पर्य जीवन्मुक्त व्यवहार करीत असल्यासारखा जो सर्वांना प्रत्यय येतो तो मायिक आहे, खरा नव्हे. कारण तो पुरुष मायामय देहादिकांनीं जरी व्यवहार करीत असला तरी अंतःकरणांत आत्मस्वरूपाविषयीं सर्वदा सावधान असतो.] ९६