आश्र्लिष्यात्मानमात्मा न किमपि सहसैवांतरं वेद बाह्यं
यद्वत्कामी विदेशात्सदनमुपगतो गाढमाश्र्लिष्य कान्ताम् ।
यात्यस्तं तत्र लोकव्यवहृतिरखिला पुण्यपापानुबन्धः
शोको मोहो भयं वा समविषममिदं न स्मरत्येव किंचित् ॥६९॥
अन्वयार्थ-‘यद्वत् विदेशात् सदनं उपगतः कामी कान्तां गाढं आश्र्लिष्य किमपि बाह्यं आन्तरं वा न वेद-’ ज्याप्रमाणें परदेशांतून घरीं आलेला विषयी पुरुष स्त्रीला अलिंगून सुख घेतो व त्यापुढें आं-(गृहां-)तील व बाहेरील दुसरें कांहींएक जाणत नाहीं., तद्वत् आत्मा आत्मानं सहसा एव आश्र्लिष्य (न वेद)-’ त्याचप्रमाणें जीव परमात्म्याला एकाएकीं आलिंगितो आणि (त्यामुळें) आं-(देहां-)तील व बाहेरील ज्ञान त्याला होत नाही. ‘तत्र अखिला लोकव्यवहृतिः अस्तं याति-’ त्या अवस्थेमध्यें सर्वहि लोकव्यवहार नष्ट होतो. ‘(तथा) पुण्यपापानुबन्धः शोकः मोहः भयं इदं समविषमं वा किंचित् न स्मरति एव-’ (तसेंच) पुण्यपापव्यवहार, शोक, मोह, भय किंवा अन्य (दुसर्या) सर्व समाविषम भावना यांतील कांहीएक त्याला आठवत नाहीं. येथें निद्रेची पूर्ण गाढावस्था सांगितली आहे. एखादा कामी पुरुष पुष्कळ दिवसांनीं परदेशांतून घरी परत आला असतां स्वस्त्रीला दृढालिंगन देऊन फार सुखी होतो व त्याला त्या सुखापुढें अंतर्बहिर् कोणत्याच सुखाचें भान रहात नाहीं. तसेंच जीव परमात्म्याशीं निद्रावस्थेंत एकरूप होतो; व त्या सुखापुढें स्वप्नांतील सूक्ष्म किंवा जाग्रतींतील स्थूल सुख त्याला मुळींच भासत नाहीं. कारण सर्व अतंःकरणवृत्तींचा त्या अवस्थेंत लय झालेला असतो. त्यामुळेंच ह्या सर्व लोकव्यवहाराचाहि त्या अवस्थेंत लय झालेला असतो. त्यामुळेंच ह्या सर्व लोकव्यवहाराचाहि तेथें अस्त होतो. तसेंच पुण्यपापादिसंबंध व शोकादिक यांपैकीहि त्याला तेथें कांहीं एक स्मरत नाहीं. ‘तद्वा अस्यै तदात्मिको ’ इत्यादि श्रुति या श्लोकोक्त प्रतिपादनाला प्रमाण आहे.] ६९.