कश्चित्कीटः कथंचित्पटुमतिरभितः कंटकानां कुटीरम् ।
कुर्वंस्तेनैव साकं व्यवहृतिविधये चेष्टते यावदायुः ॥
तद्वज्जीवोऽपि नानाचरितसमुदितैः कर्मभिः स्थूलदेहम् !
निर्मायात्रैव तिष्ठान्ननुदिममुना साकमभ्योति भूमौ ॥६॥
अन्वयार्थ-‘कश्चित् पटुमतिः कीटः कथांचित् अभितः कंटकांनां कुटीरं कुर्वन् तैनैव साकं व्यवहृतिविधये यावदायुः चेष्टते-’कोणी एक बुद्धिमान् कीटक मोठ्या प्रयत्नानें आपल्या सभोंवती कांट्यांचें घर करून त्या सहवर्तमानच व्यवहार होण्याकरितां सर्व आयुष्यभर क्रिया करीत असतो. तद्वत् जीवोऽपिनानाचरितसमुदितैः कर्मभिः स्थूलदेहं निर्माय अत्रैव तिष्ठन् अमुना साकं अनुदिनं भूमौ अभ्येति-’ त्याचप्रमाणें हा प्राणीसुद्धा नानाप्रकारच्या आचरणांनी उत्पन्न झालेल्या कर्मोनीं स्थूलदेह निर्माण करून त्यामध्येंच राहून, त्यासहवर्तमान प्रतिदिवशीं पृथ्वीवर संचार करितो. [आतां देह आणि आत्मा यांचें साहचर्य दृष्टान्तानें दृढ करितात. ज्याप्रमाणें एक बुद्धिमान् किडा आपल्या कफापासून उत्पन्न केलेल्या धाग्यांनीं आपल्याभोवतीं मोठ्या प्रयत्नानें कांट्यांचें घर करून खान-पानादिक व्यवहार करण्यारिकतां सर्व जन्मभर त्या घरट्यासहवर्तमानच इकडे तिकडे फिरत असतो; त्याचप्रमाणें प्राणी अनेक जन्मांमध्यें अनेक आचरणें केल्यानें त्यांपासून होणार्या प्रारब्ध कर्मानें स्थूल देह तयार करून व त्या देहामध्येंच राहून त्याच्याच सहवर्तमान प्रतिदिनीं पृथ्वीवर पर्यटन करीत असतो. ह्मणजे जन्मभर त्या स्थूलदेहाला न सोडितां सर्व स्थूल व्यवहार करितो. तात्पर्य असें कीं, त्या कांट्यांच्या घराप्रमाणेंच असणारा हा अचेतन देह स्वतः कोणतीही चेष्टा करीत नाहीं. कारण आत्म्याचा वियोग झाला असतां काष्ठासारखें मरून पडणारें शरीर कोणतीच चेष्टा करीत नाहीं, हें प्रत्यक्षसिद्ध आहे. त्याअर्थी ह्या जड देहाकडून अनेक क्रिया करविणारा कोणी तरी चालक हा असलाच पाहिजे, व तो चालक जीवच होय. जसें-रथ जड असल्यामुळें स्वतः त्याला चलनादिक कोणतीच क्रिया करितां येत नाहीं. पण अश्व जोडला कीं तोच वेगानें चालूं लागतो. बरें, रथ नसून केवल अश्वच असला तरीही रथक्रिया होत नाही. त्याच न्यायानें कोणी चालक नसेल तर देहाची चेष्टाही होणार नाहीं. तात्पर्य ह्या दोघांचें नित्य साहचर्य आहे.] ६