जीवन्मुक्तिर्मुमुक्षोः प्रथममथ ततो मुक्तिरात्यन्तिकी च
तेऽभ्यासज्ञानयोगाद्गुरुचरणकृपापांगसंगेन लब्धात् ।
अभ्यासोऽपि द्विधा स्यादधिकरणवशाद्दैहिको मानसश्च
शारीरत्वासनाद्यो ह्युंपरतिरपरो ज्ञानयोगः परोक्तः ॥४२॥
अन्वयार्थ-‘अथ मुमुक्षोः प्रथमं जीवन्मुक्तिः ततः आत्यंतिकी च मुक्तिः-’ प्रथमतः मुमुक्षूला जीवन्मुक्ति, आणि नंतर निरतिशय मुक्ति प्राप्त होते; ‘ते गुरुचरणकृपापांगसंगेन लब्धात् अभ्यासज्ञानयोगात्(भवतः)-’ व त्या दोन मुक्ति, गुरुचरणकृपाकटाक्षाच्या योगानें प्राप्त झालेल्या अभ्यासानें व ज्ञानयोगानें प्राप्त होतात. ‘अभ्यासः अपि अधिकरणवशात् दैहिकः मानसः च इति द्विधा स्यात्-’ आधाराच्या योगानें दैहिक व मानसिक असा दोन प्रकारचा अभ्यास आहे. ‘आसनाद्यः शारीरः अपरः हि उपरतिः-’ यम, नियम आसन, इत्यादि शरीराचा, व शांति, प्रपंचोपशम वगैरे हा मनाचा अभ्यास होय. ‘ज्ञानयोगः परोक्तः हि-’ ज्ञानयोग हा सर्वांपेक्षां श्रेष्ठच सांगितला आहे. िआतां दोन प्रकारचा मोक्षोपाय सांगतात. मुमुक्षु पुरुषाला प्रथमतः जीवन्मुक्ति प्राप्त होते. जीवंत असतां मुक्ताप्रमाणें निःसंग असणें हाच जीवन्मोक्ष होय. भगवद्रीतेमध्यें दुसर्या अध्यायाच्या शेवटीं भगवंतांनी अशा जीवन्मुक्त पुरुषाला स्थितप्रज्ञ असें ह्मटलें आहे. प्राक्तन भोग संपल्यावर देहाचा त्याग करून, शुद्धोदक शुद्धोदकांत टाकिलें असतां जसें तें तद्रूप होऊन जातें त्याप्रमाणें, तो मुमुक्षु ब्रह्मरूप होऊन जातो. ह्यालाच निरतिशय मुक्तिअसें म्हणतात; व ह्या दोन्हीही मुक्ति, पूज्य गुरूंच्या कृपाकटाक्षानें प्राप्त झालेला अभ्यास (म्ह० एकच क्रिया पुनः पुनः करणें,) व ज्ञानयोग, या दोन उपायांनीं प्राप्त होतात. तो अभ्यास देहाच्या आश्रयानें व मनाच्या आश्चर्यानें होत असतो. यम, नियम, प्राणामय, प्रत्याहार हा देहाच्या योगानें होणारा अभ्यास, व मनाच्या सर्वही वृत्ति शांत झाल्यामुळें जो सर्व प्रपंचाचा उपशम होत असतो, तो दुसरा मानसिक अभ्यास होय. वस्तुतः आसनादिसिद्धि व प्रपंचाचा उपशम हा अभ्यास नसून, हीं दोन्ही अभ्यासाचीं फलें आहेत; व आसनादिसिद्धि होण्याकरितां योगशास्त्रांत सांगितल्याप्रमाणें पुनः पुनः प्रत्यन करणें हा खरा अभ्यास होय. ज्ञानयोग या द्विविध अभ्यासाहून श्रेष्ठ आहे, असें सांगितलें आहे व तो या अभ्यासाच्या योगानें प्राप्त होतो. ४२.