नो देहो नेंद्रियाणि क्षरमतिचपलं नो मनो नैव बुद्धिः
प्राणो नैवाहमस्मीत्याखिलजडमिदं वस्तुजातं कथं स्याम् ।
नाहंकारो न दारागृहसुतसुजनक्षेत्रवित्तादि दूरं
साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिलजगदधिष्ठानभूतः शिवोऽहम् ॥९२॥
अन्वयार्थ-‘अहं देहः नो इंद्रियाणि न क्षर अतिचपलं मनः च नो बुद्धिः न एव प्राणः न एव अस्मि-’ मी देह नव्हे, इंद्रियें नव्हे, क्षयि व अत्यंत चपल मन नव्हे, बुद्धीहि नव्हे, प्राणहि नव्हे, ‘इति अखिलजडं वस्तुजातं कथं स्याम्-’ मग मी हें सर्व जड वस्तुजात कसें असेंन? ‘अहंकारः न दारागृहसुतसुजनक्षेत्रवित्तादि दूरं न (अस्मि)-’ मी अहंकार नव्हे; (देहापासून) दूर असणारी स्त्री, गृह, पुत्र, बांधव, शेत, द्रव्य, इत्यादीहि मी नव्हे ‘साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिलजगदधिष्ठानभूतः शिवः अहं अस्मि-’ तर मी साक्षी ज्ञानरूप, सर्वानतर्यामी व सर्व जगाला आधार देणारा शिव आहे. आतां येथें त्याच ज्ञान्याच्या प्रारब्ध कर्माचा क्षय होईतों, व्यवहाराला प्रतिबंध न होतां जीवन्मुक्तीचें सुखहि त्याला घेतां यावें, म्हणून देहादि सर्वांविषयीं सर्वदा दृढ असत्त्वभावना ठेवून स्वतःच्या आत्मस्वरूपाकडे त्यानें अनुसंधान ठेवावें, असें सांगतात-पंचीकृत पंचभूतांचें कार्य व अन्नाचा विकार असा हा स्थूल देह मी नव्हें. कारण मी सच्चिद्रूप आहे व देह क्षय पावणारा व प्रतिक्षणीं निरनिराळ्या रूपाचा होणारा म्ह० विकारी आहे; पण आत्मा सद्रूप असल्यामुळें स्थिर व चिद्रूप आहे, असा सूक्ष्मदृष्टि पुरुषाला अनुभव येतो. अर्थात् त्या उभयतांमध्यें असें मोठेंच अंतर असल्यामुळें मी देह नव्हे, तसेंच मी (आत्मा) क्रियेची व ज्ञानाचीं साधनें जी इंद्रियें तींहि नव्हे तीं परस्पर पृथक् असल्यामुळें असत्त्वरूप आहेत, हें उघडच आहे. शिवाय विषयांच्या असत्त्वानेंच त्यांचें असत्त्व प्रतीतीला येत असल्यामुळें व तीं चंचल असल्यामुळें मी नव्हे, इंद्रियें आत्मा नव्हे असें सिद्ध करण्याकरितां पूर्व विशेषणें येथेंहि घ्यावी. मी संशयात्मकमन नव्हें; काम, क्रोध इत्यादि वृत्तींनीं युक्त असल्यामुळें मन विकारी आहे, असें सिद्ध होतें व तें असद्रूप असल्यामुळें वस्तुतः नाहींच. पण मी मनोविकारांची उत्पत्ति व नाश यांना प्रकाशित करितों व सच्चिद्रूपानें प्रकाशमान आहें म्हणून मी मन नव्हें. निश्चयात्मक अंतःकरणवृत्तीहि मी नव्हें, कारण ती बुद्धि जाग्रदादि अवस्थांमध्यें उत्पन्न होते व सुषुप्तींत लय पावते; व मी आत्मा तर तिन्ही अवस्था व जाग्रत्-स्वप्नांतील बुद्धि यांचा साक्षी व सद्रूप आहे; म्हणून मी बुद्धि नव्हें. शिवाय शरीरांतील प्राणपानादि पांच वृत्तींचा प्राणवायु मी नव्हें. हें सर्वहि देहादि जड ( चैतन्यशून्य) पदार्थजात माझें प्रकाश्य (मजकडून प्रकाशित-ज्ञात-होणारें, माझ्यामुळें अस्तित्वांत येणारें) आहे; व मी विकृतिशून्य सच्चिदानंदरूप आहें. तेव्हां आम्हां उभयतांचें ऐक्य कसें होणार? त्यामुळेंच मी अहंकारहि नव्हें. कारण अहंकाराला विषय होणारे सर्व पदार्थ दृश्य, जड, निस्तत्त्वरूप व विकारी असल्यामुळें अहंकारहि निस्तत्त्वादि धर्मयुक्तच आहे. अर्थात् माझ्यापेक्षां पृथक् आहे. अगदीं निकट असणारा देह व देहधर्मसुद्धां जर मी नव्हे तर स्त्री, गृह, पुत्र, आप्त, इष्ट बांधव, क्षेत्र (शेत), द्रव्य इत्यादि मजपासून धडधडीत निराळे असणारे पदार्थ मी कसा असेन? मी ह्या देहादि जड पदार्थांना साक्षात् प्रकाशित करितों (जाणतों) ह्मणून मी साक्षी आहें. ज्ञानरूप असल्यामुळें मी चित् (चैतन्य), बुद्ध्य़ादि सर्वांच्याहि आंत असून स्वयंज्योति असल्यामुळें मी आत्मा, व ज्याच्या वाचून सर्गभ्रमाला अधिष्ठान होणार्या शबल ब्रह्माचीहि सिद्धि होत नाहीं तो गौणरीतीनें सर्व जगाचें अधिष्ठान होणारा मी (आत्मा) कल्याणरूप आहे]९२