तज्ज्ञाः पश्यन्ति बुद्ध्य़ा परमबलवतो मायायाक्तं पतङ
बुद्धावन्तःसमुद्रे प्रतिफलितमरीच्यास्पदं वेधसस्तम् ।
यादृग्यावानुपाधिः प्रतिफलति तथा ब्रह्म तस्मिन्यथास्यं
प्राप्तादर्शानुरूपं प्रतिफलति यथावस्थितं तत्सदैवम् ॥५१॥
अन्वयार्थ-‘तज्ज्ञाः परमबलवतः मायया अक्तं तं पतंगं बुद्धौ समुद्रे अंतः वेधसः प्रतिफलितमरीच्यास्पदं बुद्ध्य़ा पश्यन्ति-’ शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत बलवान् अशा हिरण्यगर्भाच्या मायेनें मोहित झालेला तो पतंग-जीव बुद्धिरूप समुद्रामध्यें प्रतिबिंबित झालेले आत्म्याचे जे किरण तद्रूप आहे, असें निश्चयात्मक अंतःकरणवृत्तीनें पहातात. ‘यथा आस्यं प्राप्तादर्शानुरूपं प्रतिफलति तत् (पुनः) सदा यथावस्थितं-’ जसें मुख समोर आलेल्या आरशाप्रमाणें त्यामध्यें प्रतिबिंबित होतें, व तें स्वतः तर सर्वदा जसेंच्या तसेंच असतें, ‘एवं यादृक् यावान् उपाधिः तथा तस्मिन् ब्रह्म प्रतिफलति-’ तसेंच जेवढ्या प्रमाणाची व जशा प्रकारची उपाधि असेल तसेंच तेथें ब्रह्म प्रतिबिंबित होतें. मिागच्या श्लोकामध्यें प्रतिपादन केलेल्या अर्थाला अनुरूप अशा ऋृग्वेदस्थ ‘‘पतंगमक्तमसुरस्ये इच्छंति वेधसः’’ या श्रुतीचा येथें अनुवाद करितात- बुद्धिरूप समुद्रामध्यें सच्चिदानंदस्वरूप परमात्मा प्रतिबिंबित होतो. परमात्म्याच्या दुर्लंध्य मायेनें मोहित झाल्यानें त्यालाच जीव असें नांव प्राप्त होतें. तो पतंग होय. कारण स्वरूपापासून भ्रष्ट होणें, हा त्याचा स्वभावच आहे. जीव त्या परमात्म्याच्या प्रतिबिंबभूत आहे, असें शास्त्रज्ञ पुरुष निश्चयात्मक बुद्धिवृत्तीनें पहातात. मुखासमोर तांबडा, पिवळा, मलिन किंवा स्वच्छ इत्यादि जशा प्रकारचा आरसा धरावा तसें त्यामध्यें (आरशाच्या रंगाप्रमाणें) मुखाचें प्रतिबिंब पडतें; पण बिंबभूत मुख तर सर्वदा जसेंच्या तसेंच असतें. तसेंच उपाधिभूत अंतःकरण जसें सात्त्विक, राजस किंवा तामस असेल, त्याप्रमाणें ब्रह्म त्यांत प्रतिबिंबित होतें. पण दृष्टांतांतील मुखाप्रमाणें बिंबभूत ब्रह्म त्रिकालींहि अविकारी (स्वस्वरूपानें जशाच्या तसेंच) असतें ॥५१॥