दानं ब्रह्मार्पणं यत्कियत इह नृभिः स्यात्क्षमाक्रोधसंज्ञा
श्रद्धास्तिक्यं च सत्यं सदिति परमतः सेतुसंज्ञ चतुष्कम् ।
तत्स्याद्बन्धाय जंतोरिति चतुर इमान् दानपूर्वैश्चतुर्भिस्तीर्त्वा
श्रेयोऽमृतं च श्रयत इह नरः स्वर्गतिं ज्योतिराप्तिम् ॥१९॥
अन्वयार्थ-‘इह नृभिः यत् ब्रह्मार्पणं क्रियते तत् दानं-’ या मृत्युलोकांत मनुष्यें जें ब्रह्मार्पण करितात त्याला दान, ‘या अक्रोधसंज्ञा सा क्षमा-’ अक्रोध ही संज्ञा ज्याला आहे तिला क्षमा, ‘यत् आस्तिक्यं सा श्रद्धाअस्तिक्य म्हणजे विश्वास हीच श्रद्धा, ‘यत् सत् तत् सत्यं इति प्रोक्तं-’ त्याचप्रमाणें सत्संज्ञक जें ब्रह्म त्याला सत्य, असें म्हणतात. (हीं चार मुक्तीचीं साधनें आहेत.) ‘अतःपरं चतुष्कं सेतुसंज्ञं (भवति)-’ ह्यांच्याहून विरूद्ध असलेलीं जीं अदानादिक चार त्यांना सेतु अशी संज्ञा आहे. ‘तत् जंतोः बंधाय स्यात्-’ तीं सर्व प्राण्यांना बंध उत्पन्न करितात. ‘(इति हेतोः) इमान् चतुरः दानपूर्वैः चतुर्भिः तीर्त्वा इह नरः श्रेयः अमृतं स्वर्गतिं ज्योतिराप्तिं च श्रयते-’ यास्तव ह्या चार सेतूंचें दानादि चार साधनांनीं उल्लंघन करून पुरुष मोक्ष, देवत्व, उर्ध्वगति, व सूर्य-चंद्रादि ज्यातींची प्राप्ति करून घेतो. ह्यिाप्रमाणें कामक्रोधादि दैत्यांचा नाश करून देवत्व प्राप्ति करून घ्यावी. ह्याविषयीं सामवेदांतील कल्माषसामाचा अनुवाद करून आचार्य म्हणतात- पुरुष ह्या व्यवहारामध्यें ईश्वराला उद्देशून जो द्रव्याचा व्यय करितात, त्याला दान अशी संज्ञा आहे. तसेंच, दुसर्या प्राण्यांनी आपणाला कितीही त्रास दिला तरी त्यांच्यावर न रागावणें याला क्षमा असेंम्हणतात. तसेंच, श्रुति स्मृति आणि आचार्य यांनी सांगितलेल्या अनुष्ठानाचें अवश्य फळ मिळणार, असा विश्वास ठेवणें याला श्रद्धा असें म्हणतात आणि सत्संज्ञक ब्रह्माला सत्य असें नांव आहे. हीं चार मुक्तीचीं साधनें आहेत. ह्यांच्या विरूद्ध असलेल्या अदान, क्रोध अश्रद्धा आणि असत्य ह्या चतुष्ट्याला सेतु असें नांव आहे. हें सेतुचतुष्टय प्रत्येक प्राण्याला बंध उत्पन्न करितें. ह्या कारणास्तव ह्या चार अदानादिक सेतूंचें दानादिक चार मोक्षसाधनांनी उल्लंघन करून पुरुषार्थप्राप्तीची इच्छा करणारा पुरुष मोक्ष, स्वर्गलोक, देवत्व (उर्ध्वगति) आणि चंद्र-सूर्यादिक ज्योति, यांची प्राप्ति करून घेतो. परमपूज्य श्रीमच्छंकराचार्यांनीं ‘‘हा३उ सेतूंस्तर दुस्तरा३न् दानेनादानं हा३उ’’ इत्यादि सामवेदोक्त श्रुतीला अनुलक्षून हा श्लोक लिहिला आहे. त्या श्रुतीचें सर्वही तात्पर्य या श्लोकांत आलें असल्यामुळें ती श्रुति व भाष्य यांचें तात्पर्य या श्लोकांत आलें असल्यामुळें ती श्रुति व भाष्य यांचें तात्पर्य विस्तारभयास्तव पुनः दिलें नाहीं. ज्याप्रमाणें सेतु पाण्याच्या प्रवाहाला प्रतिबंध करितो, त्याप्रमाणें हे अदानादिक चार सेतु, अखंडैकरसब्रह्मज्ञानाला प्रतिबंध करितात. यास्तव, ह्या दुस्तर सेतूंचें मोठ्या धैर्यानें उल्लंघन करून पुरुषार्थप्राप्ति करून घ्यावी.भगवंतांच्या ‘‘यत्करोषि यदश्र्नासि’’ इत्यादि म्हणजे जें करतोस जें खातोस किवा जेवढी म्हणून क्रिया करितोस तेवढी सर्वही मला अर्पण कर. ह्या वचनाप्रमाणें प्रत्येक पुरुषानें वर्तन केलें असतां अदानादिक सेतूंचें सहजच उल्लंघन होईल] १९.