मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६७

शतश्लोकी - श्लोक ६७

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


जाग्रत्यामन्तरात्मा विषयसुखकृतेऽनेकयत्नान्विधास्यन्
श्राम्यत्सर्वेंद्रियौघोऽधिगतमपि सुखं विस्मरन्याति निद्राम।
विश्रामाय स्वरूपे त्वतितरसुलभं तेन चातींद्रियं हि
सौख्यं सर्वोत्तम स्यात्परिणतिविरसादिंद्रियोत्थात्सुखाच्च ॥६७॥

अन्वयार्थ-‘जग्रत्या अंतरात्मा विषयसुखकृते अनेकयत्नान् विधास्यन् श्राम्यत्सर्वेंद्रियौघः अधिगतं सुखं अपि विस्मरन् स्वरूपे विश्रामाय निद्रां याति-’ जाग्रत्यवस्थेमध्यें जीव विषयसुखाकरितां अनेक प्रयत्न करितो; पण त्यामुळें त्याचा सर्व इंद्रियसमुदाय श्रान्त झाला असतां (विषयांपासून) प्राप्त झालेल्या सुखाला विसरून श्रमपरिहारर्थ तो स्वात्मस्वरूपांत निद्रित (लीन) होतो. ‘तेन तु परिणतिविरसात् इंद्रियोत्थात् सुखात् च अतीद्रियं हि सौख्यं सर्वोत्तमं अतितरसुलभं च अस्ति-’ यास्तव परिणामीं दुःख देणार्‍या व इंद्रियांच्या योगानें प्राप्त होणार्‍या सुखाहून हें अतींद्रिय सुखच श्रेष्ठ आणि अत्यंत सुलभ आहे. पिरमानंदापुढें हें विषयोपभोगापासून होणारें सुख अति क्षुद्र व तुच्छ आहे; आणि प्राण्यांचा अनुभवहि असाच आहे, असें या श्लोकांत सांगतात-जागृतींत विषयसुखप्राप्त्यर्थ प्राणी अनेक प्रयत्न करीत असतो. ह्या विषयांकरीतां, विद्वान् अति कष्टकर असें देशपर्यटन करितो; एखाद्या दुष्ट धन्याची सेवा करितो; नीचाकडेहि याचना करितो. शूर योद्धा हे विषय भोगावयास सांपडावे ह्मणून समरांगणांत प्राण देण्यासहि तयार होतो; चोर ह्या विषयांस्तव दुसर्‍याचे गळे कापतो. गारुडी इत्यादि कपटपटु लोक ह्या क्षुद्र क्षणभंगुर व अनर्थकर विषयांकरितां लोकांना अनीतीनें, असल्यानें व निर्दयपणानें फसवितात. सारांश ह्याप्रमाणें बहुतेक सर्व प्राणी विषयांकरितां आश्रान्त श्रम करून थकले असतां त्यांचीं इंद्रियें शिथिल ( काम करण्यास असमर्थ) होतात; व असें झालें असतां दैवयोगानें व दीर्घ प्रयत्नानें प्राप्त झालेल्या विषयांनाहि विसरून (त्यांचा अव्हेर करून) श्रमपरिहार्थ ते आपल्या हृदयस्थ आत्मरूपांत प्रविष्ट होऊन कांहीं काल निद्रा घेतात. विषयप्राप्ति न झाल्यामुळें होणार्‍या संतापाची शांति करण्याकरितांहि प्राण्याला निद्रेचाच आश्रय करावा लागतो. अर्थात् परिणामीं दुःख देण्यार्‍या इंद्रियजन्य सुखाहून हें अतींद्रिय (इंद्रियांच्या साहाय्यावांचून होणारें) सुख सर्वोत्कृष्ट आहे व या सुखाच्या प्राप्तीकरितां वैषयिकसुखप्राप्तीसारखे दीर्घ प्रयत्नहि करावयास नकोत, असें प्रत्येक प्राण्याच्या अनुभवानें सिद्ध झालें आहे. सारांश वैषयिक आनंद कष्टसाध्य व कष्टद आहे आणि परमानंद सुखसाध्य व सुखद आहे. तेव्हां आतां यांतील कोणत्या आनंदाचा अवलंब करावा हें ज्याचें त्यानेंच ठरविणें प्रशस्त होय] ६७


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP