यत्किंचिद्भात्यसत्यं व्यवहृतिविषये रौप्यसर्पांबुमुख्यं
तद्वै सत्याश्रयेणेत्ययमिह नियमः सावधिर्लोकसिद्धः ।
तद्वत्सत्यस्य सत्ये जगदखिलभिदं ब्रह्मणि प्राविरासीन्मिथ्याभूतं
प्रतीतं भवति खलु यतस्तच्च सत्यं वदन्ति ॥५७॥
अन्वयार्थ-‘यत् किंचित् रौप्यसर्पांबुमुख्यं व्यवहृतिविषये असत्यं भाति तत् वै सत्याश्रयेण इति अयं सावधिः नियमः लोकसिद्धः (दृष्टः)-’ व्यवहारांतील दृश्य पदार्थांमध्यें जें कांहीं रूपें, सर्प,
मृगजल इत्यादि असत्य भासतें तें सर्वही सत्याच्या आश्रयानें असतें असा हा अवधियुक्त (साधिष्ठान) नियम लोकसिद्ध आहे ‘तद्धत् सत्यस्य सत्ये ब्रह्मणि इदं अखिलं जगत् प्राविरासीत्-’ त्याचप्रमाणें सत्याचेंहि सत्य असें जें ब्रह्म, ज्याच्या आधारावर हे सर्व जगत् व्यक्त होतें; ‘मिथ्याभूतं च यतः प्रतीतं भवति तत् खलु सत्यं वदन्ति-’ आणि मिथ्याभूत सर्वहि पदार्थांचा ज्याच्या योगानें प्रत्यय येतो, तेंच सत्य असें लोक म्हणतात. यिा श्लोकामध्यें आतां पूर्णब्रह्माचें प्रतिपादन करितात. शिंपीच्या ठिकाणीं रूपें, रज्जूच्या ठिकाणीं सर्प, व मरुभूमीवर मृगजल इत्यादि जेवढे म्हणून पदार्थ भ्रमानें भासतात, तेवढे सर्वहि शुक्ति, रज्जु, भूमि इत्यादि सत्य पदार्थांच्या आश्रयानें भासतात. रौप्यादिक भ्रम, शुक्तिका, रज्जु इत्यादि व्यवहारांतील सत्य पदार्थांच्या आश्रयानें होतात. कारण शुक्ति इत्यादिक अधिष्ठान् नसेल तर ते भ्रम होणेंच संभवनीय नाहीं. सारांश ह्या व्यवहारामध्येंसुद्धा प्रत्येक भ्रम साधिष्ठान असतो म्हo त्याचें अधिष्ठान सत्य असतें; असा हा सावधि नियम सिद्ध झाला. सावधि म्हणजे अवधिसह. हें रजत नसून शुक्तिका आहे असें ज्ञान होईपर्यंत जो अवधि, त्या अवधीनें युक्त असा हा भ्रम असतो. किंवा अवधि म्हणजे सीमा अस अर्थ घेतल्यास, शुक्तिकेसारख्या सत्य वस्तूच्या ज्ञानापर्यंत भ्रमाची मर्यादा असते. म्हणजे सत्य अशा अधिष्ठानाचें ज्ञान होतांच भ्रमाच्या अस्तित्वाचा लोप होतो; तस्मात् असत्य सत्याश्रयानें असतें हा सावधि नियम सर्वलोकसिद्ध आहे. तात्पर्य अधिष्ठानाचें ज्ञान होऊन भ्रमनिरास होईपर्यंत सर्व भास सत्य वाटतात; पण अशा भ्रामक सत्याचेंहि सत्य जें ब्रह्म त्याच्या आश्रयानें हें सर्व जगत् व्यक्त झालें आहे. असें हें सत्यवानें भासणारें जगत् सावधि असल्यामुळें खरें नसून भ्रामक आहे. भ्रमांतील वस्तु ज्याच्या सत्तेमुळें प्रतीतीला येतात तेंच खरोखर सत्य असें शास्त्रज्ञ म्हणतात.] ५७.