मातंगव्याघ्रदस्युद्विदुरगकपीन्कुत्राचित्प्रेयसीभिः
क्रीडन्नास्ते हसन्वा विहरति कुहचिन्मृष्टमश्र्नाति चान्नम् ।
म्लेच्छत्वंप्राप्तवानस्म्यहमितिकुहचिच्छांकितः स्वीयलोकादास्ते
व्याघ्रादिभीत्या प्रचलति कुहचिद्रोदिति ग्रस्यमानः ॥८०॥
अन्वयार्थ-‘मातङ्गव्याघ्रदस्युद्विषदुरगकपीन् (सृजति इति पूर्वेण संबंधः)-’ तसेंच, चाण्डाल, व्याघ्र, चोर, शत्रु, सर्प, कपि इत्यादिकांनाहि उत्पन्न करितो. ‘कुत्रचित् प्रेयसीभिः क्रीडन् हसन् वा आस्ते-’ कोठें आवडत्या स्त्रियांशीं क्रीडा करीत किंवा हंसत असतो. ‘कुहचित् विहरति मृष्टं अन्नं च अश्राति-’ कोठें विहार करितो तर कोठें स्निग्ध अन्न खातो. ‘अहं म्लेच्छत्वं प्राप्तवान् आस्मि इति समजून कोठें स्वतःच्या आप्तादिकांना लाजून (लपून) राहतो.‘व्याघ्रदिभीत्या प्रचलति कुहचित् ग्रस्यमानः रोदिति-’ कोठें व्याघ्रादिकांच्या भीतीनें पळतो तर कोठें ते खात आहेत असें पाहून रडतो. अनेक स्वाप्न भोगांतील कांहींचा येथें स्पष्ट उल्लेख केला आहे. व्याघ्र, सर्प यांसारखा एखादा दुष्ट प्राणी मागें लागला आहे जसें पाहून तो पळूं लागतो, पण पाय अगदी लुले पडून पळतां येत नाहीं, असें पाहून अति दुःखी होतो. इतक्यांत त्यानें येऊन पकडलें आहे व तो आपल्याला खात आहे असें पाहून तो मोठ्यानें आक्रोश करितो. सारांश या अवस्थेंत प्राणी अनेक इष्ट व अनिष्ट भोगांचा उपभोग घेतो. या दोन श्लोकांतील प्रतिपादनाला ‘‘स यत्रायं प्रस्वपितीत्यस्ये अपि भयानि पश्यन्’’ ही बृहदारण्यक श्रुति प्रमाण आहे.] ८०