यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य
हेतोर्देहेता तदुत्था स्वविषयममता चेति दुःखास्पदे द्वे ।
जानन्रोगाभिघाताद्यनुभवति यतोऽनित्यदेहात्मबुद्धिर्भार्या
पुत्रार्थनाशेविपदमथपरामेति नारातिनाशे ॥१५॥
अन्वयार्थ-‘त्रिजगति यःकश्चित् सौख्यहेतोः यतते नैव दुःखस्य हेतोः-’ या त्रैलोक्यामध्यें कोणीही पुरुष सौख्याकरितां यत्न करीत असतो; दुःखाकरितां नव्हे. (एवं सति) देहे अहंता तदुत्था स्वविषयममता च इति द्वे दुःखास्पदे भवतः-’ तरी देहाचे ठिकाणीं असलेली अहंता, व तिच्यामुळें देहाच्या हितासाठी उत्पन्न होणारी विषयममता हीं दोन दुःखस्थानें आहेत. ‘यतः अनित्यदेहात्मबुद्धिः (ततः एवं) जानन् (अपि) रोगाभिघातादि अनुभवति-’ पण मनुष्य अनित्य देहाचे ठिकाणी आत्मबुद्धि ठेवीत असल्यामुळें असें जाणत असूनही सर्वदा रोगादिकांचे आघातःक्लेश अनुभवितो; ‘(तथा) भार्यापुत्रार्थनाशे अथ परां विपदं एति-’ भार्यापुत्रादि विषय नष्ट झाले असतांही तो मोठ्या विपत्तीमध्यें पडतो. परंतु ‘अरातिनाशे (विपदं) न (एति)’ पण शत्रूचा नाश झाला असतां त्याला दुःख होत नाहीं. ‘ह्यिo पंधराव्या श्लोकामध्यें द्विविध वैराग्यापैकीं ज्ञानाला कारण होणार्या वैराग्याचा उपदेशरूपानें निर्देश करितात. या त्रिभुवनांत कोणीही जरी झाला तरी तो स्वतःला सुख व्हावें या हेतुनेंच यत्न करीत असतो; दुःख व्हावें म्हणून कधींही कोणी प्रयत्न करीत नाही. पण ह्याप्रमाणें सुखाकरितांच प्रयत्न करीत असतांही देहाच्या ठिकाणीं असलेली अहंता आणि त्या देहाचें हित व्हावें म्हणून उत्पन्न झालेली विषयममता हीं दोन दुःखोत्पत्तीचीं स्थानें आहेत; आणि हें जाणत असूनही अनित्य देह हाच मी असा निश्चय ठेवणार्या प्राकृत पुरुषाला ज्वरादि रोगांपासून असह्य पीडा सहन कराव्या लागतात. म्हणजे देहाचे ठिकाणीं अहंता ठेवल्यानेंच केवळ त्याला हें दुःख अनुभवावें लागतें. तसेंच, भार्यापुत्रादिविषयांच्या ठिकाणीं ममता ठेविल्यानें त्यांचा नाश झाला असतांही या पुरुषाला अत्यंत यातना सहन कराव्या लागतात. पण ज्याप्रमाणें शत्रूच्या ठिकाणीं ममता नसल्यामुळें त्याच्या नाशानें कोणीही पुरुष दुःखी होणार नाहीं. सारांश ज्या ठिकाणीं अहंता किवा ममता त्या ठिकाणीं दुःख असें ह्यांचें साहचर्य धूर व अग्नि यांच्या साहचर्याप्रमाणें सिद्ध झालें] १५.