श्रातं स्वांत सबाह्यव्यवहृतिभिरिदं ताः समाकृष्य
सर्वास्तत्तत्संस्कारयुक्तं ह्युपरमति परावृत्तमिच्छन्निदानम् ।
स्वाप्नान्संस्कारजातप्रजनितविषयान् स्वाप्नदेहेऽनुभृतान्
प्रोत्स्यांतःप्रत्यगात्मप्रवणभिदमगादभूरिविश्राममस्मिन् ॥७५॥
अन्वयार्थ-‘सबाह्यव्यवहृतिभिः श्रान्तं निदानं इच्छत् (च) परावृत्तं इदं स्वान्तं ताः सर्वाः समाकृष्य तत्तत्संस्कारयुक्तं हि उपरमति-’ सर्व स्थूलसूक्ष्म व्यवहार करून थकलेलें (व त्यामुळें) स्वतःच्या
कारणामध्यें (लीन होण्याची इच्छा करून परतलेलें हें मन ते सर्व व्यवहार बंद करून त्यांच्या संस्कारांसह शांत होतें. ‘स्वप्नदेहे अनुभूतान् स्वाप्नान् संस्कारजातप्रजनितविषयान् प्रोत्स्य-’ (नंतर) स्वप्नदेहामध्यें अनुभविलेले, बीजभूत संस्कारापासून उत्पन्न झालेले स्वाप्न (खोटे) विषय टाकून ‘इदं अन्तः प्रत्यगात्मप्रवणं अस्मिन् भूरि विश्रामं अगात्-’ हें प्रत्यगात्म्याकडे अंतर्मुखझालेलें (वळलेलें) मन परमात्म्यामध्यें अत्यंत विश्रान्ति घेतें. आतां येथून पुढें जगन्मित्यात्वप्रकरण सुरू झालें. प्रपंच मिथ्या आहे असें प्रतिपादन करीत असतां स्वप्नांतील प्रपंचासारखाच तो आहे, हें दाखविण्याकरितां प्रथमतः स्वप्नाच्या स्वरूपाचें वर्णन करितात. स्त्री, पुत्र, सेवक इत्यादिकांच्या पोषणाकरितां अनेक स्थूल व्यवहार करून थकलेलें व अत्यन्त आनंदस्वरूप अशा आपल्या कारणामध्यें जाऊन विश्रांति घेण्याची इच्छा करून अन्तर्मुख झालेलें मन सर्व व्यापार बंद करून शांत होतें. ह्या अवस्थेलाच सुषुप्ति असें ह्मणतात. श्लोकांत ‘इदंताः’ असें पद आहे त्याचा ‘इदं’ व ‘ताः’ (व्यवहृतीः) असा पदच्छेद करावा किंवा ‘इदंताः’ (म्ह० ‘हे’ असे प्रत्यक्षत्वानें भासणारे विषय) असें एकच पद घ्यावें. ह्याप्रमाणें बाह्य व्यवहार जरी मनानें टाकले तरी त्यांच्या दृढ चिंतनानें झालेले संस्कार त्याच्या बरोबरच असतात. त्यामुळें शरीर निश्चेष्ट असतांनाच त्या विषयांचें स्मरण होतें. या स्मरणरूप अवस्थेलाच ‘स्वप्न’ असें ह्मणतात. त्या स्मरणारूढ झालेल्या संस्कारापासून उत्पन्न होणार्या स्वप्नांतील सूक्ष्म विषयांनाहि टाकून परमात्म्याशीं संयुक्त होण्याच्या इच्छेनें परतलेलें मन ह्या हृदयस्थ साक्षीमध्यें विश्रान्ति घेतें. जसा कोणी राजा एखाद्या मोठ्या पुरुषाचें दर्शन घेण्याकरितां गेला असतां सैन्यादि इतर सर्व अनुयायांना द्वाराबाहेर ठेवून प्रधानादि दोघातिघांसह आंत जातो; व पुढें गेल्यावर त्यांनाहि शेवटच्या द्वारापाशीं सोडून स्वतः एकटाच दर्शनाकरितां आंत शिरतो; त्याप्रमाणेंच हें मन आत्मदर्शनाला निघालें असतां करितें. ह्या श्लोकांत मनाला प्रथमतः निद्रावस्थाच प्राप्त होते व ‘स्वप्न’ ही अवस्था मध्येंच केव्हांतरी कर्मयोगानें प्राप्त होणारी आहे, असें सुचविलें आहे.] ७५