यत्राकाशावकाशः कलयति च कलामात्रतां यत्र कालो
यत्रैवाशावसानं बृहदिह हि विराट्पूर्वमर्वागिवास्ते ।
सूत्रं यत्राविरासीनमहदपि महतस्तद्धि पूर्णाच्च पूर्णं
संपूर्णदर्णवादेरपि भवति यथा पूर्णमेकार्णवांभः ॥५८॥
अन्वयार्थ-‘यथा संपूर्णात् अर्णवादेः अपि एकार्णवांभः पूर्णे भवति-’ ज्याप्रमाणें उदकानें परिपूर्ण असणार्या समुद्रादिकांपेक्षां सातहि समुद्रांचें एकत्र झालेलें पाणी अधिक पूर्ण असतें ‘(तथा) यत्र
आकाशावकाशः यत्र च कालः कलामात्रतां कलयति-’ त्याचप्रमाणें ज्याठिकाणीं आकाश रहातें, जेथें हा अगणित काल एका कलेसारखा भासतो, ‘यत्र एव आशावसानं इह हि बृहत् विराट्पूर्वं अर्वाक् इव आस्ते-’ जेथें दहा दिशांनाहि राहण्यास जागा मिळते, आणि जेथें हें स्थूल विराट्ब्रह्मसुद्धां अर्वाचीन असल्यासारखें असतें, व ‘यत्र महतः अपि महत् सूत्रं अविरासीत् तत् हि पूर्णात् पूर्णं-’ जेथें विराडात्म्यापेक्षां अति मोठा असा सूत्रात्मा प्रकट होतो, तें ब्रह्म निःसंशय पूर्णाहून पूर्ण आहे. आतां ह्या श्लोकामध्यें ‘‘पूर्णमदः पूर्णमिदें अवशिष्यते’’ या श्रुतींत प्रदिपादन केल्याप्रमाणें ब्रह्म पूर्णाहून पूर्ण आहे असें सांगतात-ज्याप्रमाणें उदकानें तुडुंब भरलेल्या एका समुद्रापेक्षां अथवा नदीपेक्षां सप्त समुद्रांचें ऐक्य झालें असतां त्यांचें उदक अधिकपूर्ण असतें, त्याप्रमाणें ज्यामध्यें आकाशालाहि जागा मिळते, जेथें सृष्टीच्या आरंभापासून सृष्टीच्या अंतापर्यंतचा अगणित काल एका क्षणासारखा भासतो, ज्यामध्यें दहाहि दिशांचा अनायासें अंतर्भाव होतो, विराट्संज्ञक स्थूलसमष्टीचा अभिमानी वैश्वानरहि ज्याच्यामुळें अर्वाचीनसा ठरतो, तसेंच ज्या ठिकाणीं ह्या विराडापेक्षांहि मोठा (विराडाचें कारण) हिरण्यगर्भ (सूक्ष्मसमष्टि) व्यक्त झाला, तें शुद्ध ब्रह्म सर्व पूर्णांपेक्षा पूर्ण आहे. आकाशादि कांहीं भूतें सर्वव्यापी असल्यामुळें पूर्ण असतात. पण हें ब्रह्म त्याहूनहि म्हणजे निरतिशय पूर्ण आहे.] ५८.