श्रेयः प्रेयश्च लोके द्विविधमभिहितं काम्यमात्यान्तिकं च ।
काम्यं दुःखैकबीजं क्षणलवविरसं तच्चिकीर्षन्ति मन्दाः ॥
ब्रह्मैवत्यन्तिकं यन्निरतिशयसुखस्यास्पदं संश्रयन्ते ।
तत्त्वज्ञास्तच्च काठोपनिषदभिहितं षड्विधायां च वल्ल्याम् ॥११॥
अन्वयार्थ- ‘लोके काम्यं आत्यंतिकं च (इति) श्रेयः प्रेयश्च द्विविधं अभिहितं-’ या जगामध्यें काम्य आणि आत्यंतिक असें श्रेय व प्रेय दोन प्रकारचें सांगितलें आहे. ‘दुःखैकबीजं क्षणलवविरसं काम्यं तत् मंदाः चिकिषर्ति-’ त्यांतील काम्य हें केवळ दुःखालाच कारण होणारें असून त्याचें रमणीयत्व क्षणिक असतें; व मूढ पुरुष तेंच करण्याची इच्छा करितात. ‘ब्रह्मैव आत्यंतिकं-’ ब्रह्म हेंच आत्यंतिकहोय. ‘यत् निरतिशयसुखस्यास्पदं (यच्च) तत्त्वज्ञाः संश्रयंते-’ जें ( हें ब्रह्म) निरतिशय सुखाचें स्थान असून ज्याचा तत्त्वज्ञ पुरुष आश्रय करितात ‘तच्च काठोपनिषदभिहितं (कुत्र इति चेत्) षड्विधायां च वल्ल्याम्’ तें कठोपनिषदामध्यें सांगितलें आहे. (कोठें ह्मणाल तर) षड्वल्लीमध्यें सगितलें आहे. आत्मा सर्वांत अधिक प्रिय आहे ह्याविषयीं काठोपनिषदाचेंही प्रमाण देतात. लोकांमध्यें प्रसिद्ध असलेलें जें श्रेय ह्मणजे पुण्यसाधन, व प्रेय ह्मणजे प्रीतिपात्र, तें काम्य आणि आत्यंतिक असें दोन प्रकारचें आहे. फलाच्या उद्देशानें जें कर्म करतात तें काम्य श्रेय होय; आणि जें मोक्षसाधन तें आत्यंतिक श्रेय होय. त्याचप्रमाणें जायापुत्रादिक हें काम्य प्रेय, व आत्मा (ह्म० हा शरीरोंद्रियसमूह) आत्यंतिक प्रेय होय. यांपैकीं काम्य श्रेय किंवा प्रेय केवळ दुःखालाच कारण होत असतें. असें जर आहे तर लोकांची त्यांत प्रवृत्ति कशी होते? अशी शंका कोणी घेतली म्हणून सांगतात-तें काम्य भ्रमानें शुक्तिकेच्या ठिकाणीं भासणार्या रजताप्रमाणें अगदीं थोडा वेळापर्यंतच मोठें रमणीय दिसत असतें, आणि ह्मणून परिणामाकडे लक्ष्य न देणारे मंदपुरुष त्याचा स्वीकार करितात. त्याचप्रमाणें आत्यंतिक श्रेय किंवा प्रेम जें ब्रह्म तें निरतिशय सुखाचें स्थान आहे; आणि तत्त्वज्ञ पुरुष त्याचाच अंगीकार करितात. हाच सिद्धान्त कठोपनिषदामध्येंही सांगितला आहे. कठशाखा पुष्कळ असल्यामुळें सहा वल्लींनीं युक्त असलेल्या कठोपनिषदांत हें सांगितलें आहे, (काठकोभाष्यार्थ श्लोक २७ पहा.) असें आचार्य सांगतात] ११.