शतश्लोकी - श्लोक २४
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
बंधो जन्मात्ययात्मा यदि न पुनरभूत्तर्हि मोक्षोऽपि
नासीद्यद्वद्रत्रिर्दिनं वा न भवति तरणौ किंतु दृग्दोष एषः ।
अप्राणं शुद्धमेकं सममभवदथ तन्मायया कर्तृसंज्ञं
तस्मादन्यच्च नासीत्परिवृतमजया जीवभूतं तदेव ॥२४॥
अन्वयार्थ-‘यद्वत रात्रिः दिनं वा तरणौ न भवति किंतु एषः दृग्दोषः-’ ज्याप्रमाणें रात्र किंवा दिवस सूर्याच्या स्वरूपांत होत नसून तो केवळ दृष्टीचा दोष आहे; ‘तद्वत् जन्मात्ययात्मा बन्धः यदि न अभूत् तर्हि मोक्षः अपि पुनः नासीत्-’ त्याचप्रमाणें जन्ममरणरूप बन्ध जर नसला तर पुनः मोक्षही नाहीं. ‘अप्राणं शुद्धं एकं समभवत्-’ सृष्टीपूर्वी प्राणरहित, शुद्ध व एक असें तत्त्व होतें. ‘अथ मायया तत् कर्तृसंज्ञ’ पुढें मायेनें तेंच कर्ता झालें; ‘च तस्मात् अन्यत् न आसीत्-’ व त्याहून अन्य असें दुसरें कांहीं नव्हतें. ‘तत् एव अजया परिवृतं जीवभूतं (अभूत्)’ तेंच कर्तृसंज्ञक तत्त्व मायेनें वेष्टित झाल्यानें जीव झालें. खिरोखर पाहतां ब्रह्मरूप जीवांना बंधही नाहीं व मोक्षही नाहीं. ते केवळ अज्ञानामुळें आत्म्याचे ठिकाणीं कल्पित आहेत, असें ह्या श्लोकांत सांगितलें आहे. ‘बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न तत्त्वतः-’ बद्ध व मुक्त ह्या संज्ञा मला सत्त्वादि गुणतः गुणद्वारा (किंवा गौण वृत्तीनें) प्राप्त होतात, त्या खर्या नव्हेत.’ ह्या वचनाप्रमाणें जन्ममरणरूप बंध जेव्हां नव्हता तेव्हां मोक्षही नव्हता. कारण बंधामुळें मोक्ष होतो. कोणीच जर बद्ध नाहीं तर मुक्त कोण होणार? सृष्टीच्या पूर्वी एकच वस्तु असल्यामुळें व त्याहून अन्य कांहींच नसल्यामुळें बद्ध किंवा मुक्त (मोकळा) तरी कोण होणार? हीच गोष्ट सूर्याचा दृष्टान्त देऊन जास्त स्पष्ट करितात. सूर्याच्या ठिकाणी रात्र व दिवस नसतात त्यांचा सूर्याशीं कांहीं संबंध नसतो. पण लोकांना सूर्याचें दर्शन जेव्हां होतें त्यावेळीं आतां दिवस आहे, व तो दिसेनासा झाला कीं आतां रात्र आहे असें ते म्हणतात. तात्पर्य रात्र किंवा दिवस हे धर्म सूर्याचे नसतांना लोकांच्या नेत्रदोषानें ते त्याचे आहेत असें भासतें. तसेंच, बंध व मोक्ष हे आत्मरूप शुद्ध ब्रह्माला नसून ते त्यालाच आहेत असें अविद्यादोषानें वाटतें. शुद्ध ब्रह्माचा प्राणांशीं संबंध नसतो म्हणजे तें क्रियाशक्तिरहित आहे, म्हणूनच त्याला प्राणरहित, शुद्ध व एक अशीं विशेषणें दिलीं. आहेत. असें तें अद्धितीय ब्रह्मच स्वाज्ञानसंज्ञक मायेनें हिरण्यगर्भनामक जगत्कर्ता होतें. तात्पर्य पूर्वी त्याहून अन्य कांहीं नव्हतें; आणि तेंच जन्मरहित मायेनें आच्छादित झालें असतां जीव झालें. सारांश जीवही वस्तुतः त्या शुद्ध तत्त्वाहून पृथक् नाहीं. केवळ आत्म्याच्या अज्ञानानें जीव, ईश्वर, जगत् व सर्व पदार्थ यांचा अनुभव येत असतो; पण तो वस्तुभूत (खरा) नव्हे, प्रतिभासिक आहे. खरें तत्त्व एक व अद्वितीय असें असून तेंच सत्य (त्रिकालाबाधित) आहे.
Last Updated : November 11, 2016
TOP