प्राणेनांभांसि भूयः पिबति पुनरसावन्नमश्र्नाति तत्र
तत्पाकं जाठरोऽग्निस्तदुपहितबलो द्राक् शनैर्वा करोति ।
व्यानः सर्वांगनाडीष्वथ नयति रसं प्राणसंतर्पणार्थ
निःसारं पूतिगंधं त्यजति बहिरयं देहतोऽपानंसंज्ञः ॥८८॥
अन्वयार्थ-‘असौ प्राणेन अंभांसि भूयः पिबति पुनः अन्नं च अश्र्नाति-’ हा आत्मा प्राणद्वारा वारंवार पाणी पितो व पुनः अन्न खातो.‘तत्र तदुपहितबलः जाठरः अग्निः द्राक् शनैः वा तत्पाकं करोति-’ अन्नादि भक्षण केल्यावर प्राणांच्या साह्यानें (श्वासद्वारा)बलयुक्त झालेला जठराग्नि शीघ्र किंवा हळू हळू त्या अन्नादिकांचें पचन करितो. ‘अथ व्यानः प्राणसंतर्पणार्थं सर्वांगनाडीषु रसं नयति । अयं अपानसंज्ञः निःसारं पूतिगंधं बहिः त्यजति- ’व्यान प्राणांना तृप्त करण्याकरितां शरीरांतील सर्व नाड्यांमध्यें (त्यांतील) रस नेतो;(आणि) हा अपाननांवाचा वायु (अन्नोदकांचा) निःसार व घाण भाग मूत्र व विष्ठारूपानें शरीरांतून बाहेर टाकितो. या श्लोकांत क्रमानें प्राण, व्यान व अपान हे तीन वायू शरीरांत काय करितात हें सांगितलें आहे. आत्मा प्राणाच्या योगानें अन्न खातो व उदक पितो. म्ह० क्षुधा व तृषा प्राणाचे धर्म असून त्यांच्या शांतीकरितां भक्षणादि क्रिया तोच करितो. पण त्यांपासून भोक्त्याला दुःख व तृप्ति होते. हे भोग त्याला प्राणाच्या द्वाराच प्राप्त होतात, असें सुचविण्याकरितां प्रथम चरणांत ‘आत्मा प्राणद्वारा खातो’ इत्यादि ह्मटलें आहे. प्राण श्वासोच्छ्वास करून जठराग्नीला प्रदीप्त करितो. तो जशी जलद किंवा मंद श्वसनक्रिया करील तसा तो अग्नि खाल्लेल्या अन्नादिकांचें शीघ्र किंवा हळू हळू पचन करितो. नंतर त्या पक्क अन्नोदकांतील सार व्यान सर्व शरीरांतील सर्व नाड्यांना पोंचवितो, व त्यामुळें प्राणांची तृप्ति होऊन त्यांना पुनः सतत क्रिया करण्याचें सामर्थ्य येतें. येथें प्राणशब्दानें इंद्रियेंहि घ्यावी. कारण त्यांनाहि आपापलें कर्म करण्याची शक्ति या सारभूत अन्नारसामुळेंच येते. ह्याप्रमाणें पक्व अन्नोदकांतील सार व्यानानें घेतलें असतां यांचा अवशिष्ट राहिलेला निःसार घाण भाग अपान वायु मूत्र व विष्ठा या रूपानें देहाबाहेर टाकिर्तो] ८८