शतश्लोकी - श्लोक ३६
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
स्वप्नस्त्रीसंगसौख्यादपि भृशमसतो या च रेतश्च्युतिः
स्यात्सादृश्यात्तद्वदेतत्स्फुरति जगदसत्कारणं सत्यकल्पम् ।
स्वप्ने सत्यः पुमान्स्याद्युवतिरिह मृषैवानयोः संयुतिश्च प्रातः
शुक्रेण वस्त्रोपहतिरिति यतः कल्पनामूलमेतत् ॥३६॥
अन्वयार्थ- ‘भृशं च असतः अपि स्वाप्नस्त्रीसंगसौख्यात् या रेतश्च्युतिःस्यात्-’ अगदी खोट्या अशा स्वप्नांतील स्त्रीसंगसौख्यापासूनसुद्धां रेतस्खलन होतें. ‘तद्वत असत्कारणं एतत् जगत् सादृश्यात् सत्यकल्पं स्फुरति-’ त्याचप्रमाणें ज्याचें कारण खोटें आहे, असें हें जगत् वरील दृष्टांताप्रमाणेंच असल्यामुळें खरें असल्यासारखें भासतें. ‘स्वप्ने पुमान् सत्यः स्यात् इह युवतिः अनयोः संयुतिः च मृषा एव-’ स्वप्नामध्यें पुरुष (भोक्ता) मात्र खरा असतो. स्त्री व त्या स्त्रीपुरुषांचा संग हीं दोन्हीं खोटींच असतात;(परंतु) ‘प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिः (प्रत्यक्षसिद्धा) इति यतः (तस्मात्), एतत् कल्पनामूलं-’ परंतु प्रातःकालीं शुक्राच्या योगानें वस्त्र मलिन झालेलें आपण प्रत्यक्ष पाहतों. ज्याअर्थीं असें आहे त्याअर्थी हें सर्व कल्पनामूल आहे. िआतां ह्या श्लोकांत, ह्या विश्वाचें उपादान कारण जरी असत् आहे तरी तें व्यावहारिक सत्य कसें, हें दृष्टानतानें स्पष्ट करितात. स्वप्नांतील स्त्रीसंग खोटा असतो. परंतु त्याचा परिणाम मात्र सत्यत्वानें अनुभवाला येतो. त्याचप्रमाणें हें जगत् व्यावहारिक सत्य असल्यामुळें त्याचें कारण जरी असत् आहे तरी तें सत्य असल्यासारखें भासतें. येथें असत् म्हणजे सदसद्विलक्षण अविद्या; आणि सत् म्हणजे अनुभवाला योग्य अशी सर्व व्यक्त सृष्टि असा अर्थ करावा. जगत् सत्य असल्यासारखें भासतें असें म्हटलें आहे; केवळ ‘सत्य आहे’ असें म्हटलेलें नाहीं. कारण सुषुप्ति-(निद्रा-) अवस्थेमध्यें त्याचा अस्त होत असतो; म्हणून तें परमार्थ सत्य नव्हे. तर तें व्यावहारिक सत्य आहे. पुढील श्लोकार्धांत दृष्टान्ताप्रमाणेंच दार्ष्टंतिक (जगत्) आहे असें सिद्ध करितात. स्वप्नामध्यें पुरुष सत्य असून स्त्री व संभोग हीं खोटीं असतात; व प्रातःकालीं जागृत झाल्यावर त्याला शुक्रलिप्त वस्त्र प्रत्यक्ष दिसतें. तसेंच आत्मा सत्य असून स्त्रीस्थानीय माया असत्य आहे व त्या दोघांचा संबंध आरोपित असल्यामुळें खोटा आहे आणि त्यापासून उत्पन्न होणारें जगत् व्यावहारिक सत्य आहे. सारांश हें सर्वही काल्पनिक आहे. यांत पारमार्थिक सत्यत्वाचा गंधही नाहीं] ३६.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP