दृष्टः साक्षादिदानीमिह खलु जगतामीश्वरः संविदात्मा
विज्ञानस्थाणुरेको गगनवदभितः सर्वभूतान्तरात्मा ।
दृष्टं ब्रह्मातिरिक्तं सकलमिदमसद्रूपमाभासमात्रं
शुद्धं ब्रह्माहमस्मीत्यविरतमधुनात्रैव तिष्ठेदनीहः ॥६४॥
अन्वयार्थ- ‘इह खलु संविदात्मा विज्ञानस्थाणुः एकः गगनवदभितः सर्वभूतान्तरात्मा जगतां ईश्वरः इदानीं साक्षात् दृष्ट-’ खरोखर ह्याच देहामध्यें, ज्ञानरूप, अनुभवाचा जणुं स्तंभ, एक,
आकाशासारखा व्यापी व सर्वभूतांचा अंतरात्मा असा जगाचा नियन्ता मीं आतां साक्षात् पाहिला. ‘ब्रह्मातिरिक्तं इदं सकलं असद्रूपं आभासमात्रं दृष्टं-’ तसेंच ब्रह्माहून निराळें असें हें सर्व जगत् शून्यरूप व केवल भास आहे असेंहि पाहिले; व ‘अहं शुद्धं ब्रह्म अस्मि इति अधुना अनीहः अत्र एव अविरतं तिष्ठेत्-’ मीच शुद्धब्रह्म आहें, म्हणून आतां कोणतीहि क्रिया न करितां सर्वदा याच स्थितीमध्यें असावें. येथपर्यंत निरूपण केलेल्या सिद्धान्ताचें आतां फल सांगतात-आत्मज्ञानाच्या उपयांचें पूर्णपणें अनुष्ठान केल्यामुळें चित्तशुद्धि होऊन ह्याच देहामध्यें असतांना मला जगन्नियंत्याचा अनुभव आला. तत्त्वभूत ब्रह्माहून अन्य पदार्थजात मिथ्या आहे, व त्याचा जो प्रत्यय येत असतो तो केवल भास आहे, अशीहि माझी खात्री झाली, व जें शुद्ध ब्रह्म तें मीच आहें असा निःसंशय अनुभव आला; म्हणून आतां यापुढें मी निष्क्रिय होऊन मरेपर्यंत असाच या देहांत राहणार. सारांश या सिद्धस्थितींतच मीं (साधकानें) सर्वदा रहावें एवढीच मी इच्छा करितों. या ठिकाणीं या ग्रंथांतील विज्ञानकोश प्रकरण समाप्त झाले ॥६४॥