यास्माद्यावत्प्रियं स्यादिह हि विषयतस्तावदास्मिन्प्रियत्वं ।
यावद्दुःखं च यस्माद्भवति खलु ततस्तावदेवाप्रियत्वम् ॥
नैकस्मिन्सर्वकालेस्त्युभयमपि कदाप्यप्रियोऽपि प्रियः
स्यात्प्रेयानप्याप्रियो वा सततमपि यतः प्रेय आत्माख्यवस्तु ॥१०॥
अन्वयार्थ-‘ईह हि यस्मात् विषयतः यावत् प्रियं (भवति) तावत् अस्मिन् प्रियत्वं-’ व्यवहारामध्यें ज्या विषयापासून जेवढें सुख होत असतें, तेवढेंच त्याच्या ठिकाणीं प्रियत्व असतें. ‘यावत् यस्माच्च दुःखं भवति खलु ततः तावत् एव अप्रियत्वं-’ आणि ज्याच्यापासून जेवढें दुःख होतें तेवढेंच त्याच्या ठिकाणीं अप्रियत्व असतें. ‘सर्वकाले’ एकस्मिन् उभयमपि न अस्ति-’ सर्व कालीं एकाच वस्तूच्या ठिकाणीं प्रीति आणि अप्रीति हीं दोन्हीं कधींही रहात नाहींत. ‘कदापि अप्रियोऽपि प्रियः प्रेयान् अपि अप्रियो वा स्यात् यतः (ततः) सततमपि आत्माख्यवस्तु प्रेयः-’ कारण प्रसंगोपात्त अप्रिय वस्तूही प्रिय होते, व प्रिय पदार्थही अप्रिय होतो. असें आहे. त्याअर्थी सतत प्रिय अशी आत्मा हीच एक वस्तु आहे.शिरीरादिक अनात्म वस्तूंच्या ठिकाणचें प्रेम, आत्म्याच्या प्रेमामुळें कसें हें येथें स्पष्ट करून सांगतात-विषयांचा उपभोग घेत असतां ज्या भार्यादि विषयांपासून जोंपर्यंत पुरुषाला सुख होत असतें तोपर्यंतच त्याचें त्या विषयांच्या ठिकाणीं प्रेम असतें. तसेंच, त्याच भार्यादि विषयांपासून जसें जसें दुःख होऊं लागतें तसे तसे ते अप्रिय होऊं लागतात. सारांश प्रियत्व व अप्रियत्व हीं विषयाच्या ठिकाणीं नियत कधींच नसतात. केव्हां केव्हां अप्रिय वस्तूही कांहीं कारणानें प्रिय होते, आणि तसेंच एखादे वेळी अत्यंत प्रिय असलेले भार्यादि विषयही, अप्रिय आचरणादि निमित्तानें आणि शरीरव्यथा इत्यादि कालपरत्वें अप्रिय होतात. पण आत्म्याची गोष्ट तशी नाहीं त्याअर्थीं सर्वदा तीच एक खरी प्रिय वस्तु होय. ह्या श्लोकांतील प्रतिपादनाला आधारभूत अशी बृहदारण्यकामध्यें ‘ न वारे पुत्राणां कामाय पुत्राः प्रियाः०’ इत्यादि श्रुति आहे. (बृह. भाष्यार्थ अ.२ पहा.) त्या श्रुतीवरील आचार्यकृत भाष्याचें तात्पर्य येथें दिलें असतां श्लोकार्थ स्पष्ट होईल म्हणून तें येथें दिलें आहे. याज्ञवल्क्य मैत्रेयीला म्हणतात कीं, हे मैत्रेयी, पुत्रांची इच्छा पूर्ण होण्याकरितां पुरुषाला पुत्र प्रिय होत नसतात, तर आत्म्या (स्वतः) ची इच्छा पूर्ण होण्याकरितां ते प्रिय होतात. प्रथमतः स्वतःचा आत्मा प्रिय असतो म्हणून मग त्याच्याकरितां पुत्र हवेसे वाटतात. आपल्या पुत्राकरितां एक केळें घ्यावें, असें बाजारांत गेलेल्या पुरुषाला वाटतें. ह्या ठिकाणीं पुत्राची प्रीति मुख्य; आणि पुत्राकरितां फलादिकांच्या ठिकाणची प्रीति गौण असते. तसेंच आत्म्याविषयींची प्रीति मुख्य आणि त्याच्याकरितां पुत्रादिकांची प्रीति गौण होय. सारांश आत्मप्रीतीच्या अंगत्वानें बाकी सर्वांचें ठिकाणीं प्रीति असते. त्या त्या पुत्र-वित्तादिकांविषयींच्या एषणा (इच्छा) सोडणें अति कठीण आहे. ही आत्माख्य वस्तु खरोखरच पुत्राहून अति प्रिय आहे. कारण स्वभावतः जरी पुत्र प्रिय वाटत असला तरी आत्म्याशीं त्याची तुलना करून पाहिली असतां आत्माच अधिक प्रिय वाटतो. तसेंच, वित्तादि सर्व विषयाहूंनही आत्मा अधिक प्रिय आहे. ही गोष्ट केवळ शब्दसिद्ध आहे असें नव्हे,तर युक्तितःही ती सिद्ध होते. हा आत्मा सर्वांच्याही अंतर आहे; व पुत्रमित्रादि सर्व विषय बहिर् आहेत. ही एक युक्ति; व दुसरी युक्ति अशी कीं, आत्म्यापेक्षां पुत्रवित्तादि अधिक प्रिय आहेत असें म्हणणार्या पुरुषाला असें विचारावें कीं, तुला अभिमत असलेले हे पुत्रवित्तादिक विषय जर अधिकप्रिय, तर त्यांच्या उत्पत्ति, स्थिति व नाश या तिनही कालांमध्यें त्यांच्यापासून तुला शोक कां होतो ? ज्यांच्यापासून दुःख होतें ते प्रिय, असें ह्मणणें कधीं तरी शहाणपणाचें होईल का? भगवंतांनीं गीतेमध्यें सांगितलें आहे कीं, ‘‘ये हि संस्पर्शजा०....रमते बुधः’’ अर्जुना, जे इंद्रियें व विषय यांच्या संसर्गानें होणारे भोग ते सर्वही दुःखमूलकच आहेत, तसेंच ते उत्पत्तिविनाशशील आहेत आणि म्हणून त्यांच्या ठिकाणीं सुज्ञ पुरुष कधींही रममाण होत नाहीं. सारांश सर्वही विषय दुःखाला कारण होणारे आहेत; ह्मणून सर्वदा सर्वांत अधिक प्रिय असणार्या आत्म्याविषयीं आदरबुद्धि ठेवून पुत्रादि अनात्म्याविषयीं अनादर करावा. याप्रमाणे जो आत्म्याचीच उपासना करितो त्याला विषय प्रिय वाटत नाहींत. ज्याप्रमाणें पुरुष घृताची रुचि समजेपर्यंत तैल भक्षण करीत असतो, त्याप्रमाणेच आत्मानुभव येईपर्यंत हे पुत्रादि प्रिय वाटतात. भगवंतांनींही ‘‘यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाघिकं ततः’’ ज्याची प्राप्ति झाली असतां अन्य कोणताही लाभ त्याहून अधिक प्रिय वटत नाहीं, असें म्हटलें आहे.] १०