दृश्यन्ते दारुनार्यो युगपदगणिताः स्तंभसूत्रप्रयुक्ताः
संगीतं दर्शयंत्यो व्यवहृतिमपरां लोकसिद्धां च सर्वाम् ।
सर्वत्रानुप्रविष्टादभिनवविभवाद्यावदर्थानुबंधा-
त्तद्वत्सूत्रात्मसंज्ञाव्द्यवहरति जगद्भर्भुवःस्वर्महान्तम् ॥५५॥
अन्वयार्थ-‘युगपत् अगणिताः स्तंभसूत्रप्रयुक्ताः दारुनार्यः संगीतं अपरां लोकसिद्धां सर्वां व्यवहृतिं च दर्शयंत्यः दृश्यन्ते-’ एकाच कालीं कलासूत्रानें प्रेरित होणार्या लांकडाच्या असंख्य बाहुल्या
नृत्य-गायनादिक व सर्व लौकिक व्यवहार करून दाखवितात, असें दिसतें. ‘तद्वत् सर्वत्रानुप्रविष्टात् अभिनवविभवात् यावदर्थानुबंधात् सूत्रात्मसंज्ञात् भूर्भुवःस्वर्महान्तं जगत् व्यवहरति-’ त्याचप्रमाणें सर्वव्यापीं, अतर्क्य सामर्थ्यवान् व कर्मानुरूप फल देणारा जो सूत्रात्मसंज्ञक परमात्मा त्याच्याकडून प्रेरित होऊन भूर्भूवःस्वर् व महर्लोकापर्यंत सर्व जगत् व्यवहार करितें. आतां ह्या सर्व श्लोकामध्यें सूत्ररूप सर्वव्यापि परब्रह्माचा निर्देश करितात-कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांत एकाच कालीं अनेक बाहुल्यांना सूत्रधार पडद्यामध्यें बसून बारीक तारांच्या योगानें नाचवितो; व त्यांच्याकडून मल्लयुद्ध, शिकार, इत्यादि लौकिक व्यवहारहि करवितो. तो सूत्रधार बाहुल्यांपासून पडद्यांतील खांबापर्यंत शिल्पकारानें जोडलेल्या तारांच्या द्वारा हे व्यवहार करितो. त्याचप्रमाणें सर्वहि कार्यांमध्यें ओतप्रोत भरून राहणार्या विश्वव्यापी, अतर्क्य सामर्थ्यवान्, कर्मानुरूप फल देणार्या व फलाकरितां देशकालानुरूप व्यवहार करविणार्या सूत्रात्म्याकडून प्रेरित होऊन भूर्लोकापासून महर्लोकापर्यंत सर्व विश्वांतील प्राणी व्यवहार करितात. तात्पर्य ‘ईश्वरप्रेरणेवांचून वृक्षाचें पानहि हालत नाहीं’ अशी जी लौकिक ह्मण आहे ती अगदी यथार्थ आहे. ‘‘वायुर्वै गौतम यत्सुत्रें संदृब्धानि भवंति’’ ही बृहदारण्य श्रुति ह्या श्लोकांतील प्रतिपादनाला प्रमाण आहे.५५