शतश्लोकी - श्लोक ३०
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
एको निष्कंप आत्मा प्रचलति मनसा धावमानेन तस्मिस्तिष्ठन्नग्रेऽथ
पश्चान्न हि तमनुगतं जानते चक्षुराद्याः ।
यद्वत्पाथस्तरंगैः प्रचलति परितो धावमानैस्तदंतः-
प्राक्पश्चादस्ति तेषां पवनसमुदितैस्तैः प्रशांतैर्यथावत् ॥३०॥
अन्वयार्थ-‘यद्वत् पाथः पवनसमुदितैः परितः धावमानैः तरंगैः प्रचलति तेषां अंतः प्राक्पश्चात् (च) तत् अस्ति तैः प्रशांतैः यथावत्-’ ज्याप्रमाणें उदक, वायूमुळें उत्पन्न होणार्या व चोहोंकडे धांवणार्या तरंगाच्या योगानें हालतें, पण त्या तरंगांमध्यें, त्यांच्या अलीकडे व पलीकडे तेंच असतें आणि तरंग शांत झाले असतांही तें पूर्वींप्रमाणें होतें. ‘एक निष्कंपः आत्मा धावमानेन मनसा (सह) प्रचलति (तथा) तस्मिन् (अपि) तिष्ठन् सन् अथ अग्रे पश्चात् च (वर्तते) तं अनुगतं चक्षुराद्याः न हि जानते-’ त्याचप्रमाणें एक व चलनरहित असा हा आत्मा धांवणार्या मनासहवर्तमान जातो; तसेंच तो त्या मनामध्यें असून त्याच्यापुढें व मागेंही असतो. ह्याप्रमाणें तो आत्मा मनाच्या अगदी बरोबर असतो तरी चक्षुरादिक वृत्ति त्याला जाणत नाहींत. चिलनादिक धर्म मनाचे आहेत, आत्म्याचे नव्हेत असें ह्या श्लोकांत सांगितलें आहे. निष्क्रिय व एक असा हा आत्मा धांवणार्या मनासह धांवत असल्यासारखा वाटतो. त्याचप्रमाणें तो मनामध्यें स्वतःच्या प्रतिबिंबरूपानें रहात असून त्याच्या मागें व पुढें किंवा उत्पत्तीच्या पूर्वी न नाशानंतरही असतो. ह्याप्रमाणें जरी तो मनाला कधीं सोडीत नाहीं तरी, चक्षुरादिक इंद्रियें त्याला जाणत नाहींत. कारण तो बाह्य व अंतर, अशा दोन्ही इंद्रियांहून अतीत आहे. म्हणजे इंद्रियादिकांना त्याचें ज्ञान होणें शक्य नाहीं. ‘‘यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षु सि पश्यति’’ म्हणजे नेत्रानें ज्याचें दर्शन घेता येत नाहीं परंतु नेत्रामध्यें पहाण्याची शक्ति ज्याच्यामुळें आहे; इत्यादि अनेक श्रुति याला प्रमाण आहेत. वस्तुतः तो निष्क्रिय आहे तरी मनामुळें तोच चलनादिक क्रिया करीत आहे असें वाटतें. हीच गोष्ट उदकाचा दृष्टांत देऊन स्पष्ट करितात. वायुमुळें उत्पन्न होणार्या तरंगांच्या योगानें उदकच सर्वत्र धांवत आहे असें वाटतें; व त्या धांवणार्या तरंगांमध्ये, त्यांच्या उत्पत्तीपूर्वी न नाशानंतर (किंवा पुढें-मागें) उदकावांचून विचारवानाला अन्य काहींच दिसत नाहीं; आणि तरंग शांत झाले असतांही तें स्वतःच्या रूपानेंच पूर्वीप्रमाणें असतें. तसेंच मायामय इंद्रियादिकांच्या योगानें आत्मा व्यवहार करीत असल्यासारखा वाटतो; पण तरंगाप्रमाणें इंद्रियादिक शांत झाले असतां तो पूर्ववत् शांतरूप होतो] ३०.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP