एको भानुस्तदर्थप्रतिफलनवशाद्यस्त्वनेकोदकांतर्नानात्वं
यात्युपाधिस्थितिगतिसमतां चापि तद्वत्परात्मा ।
भूतेषूच्चावचेषु प्रतिफलित इवाभाति तावत्स्वभावावच्छिन्नो यः
परंतु स्फुटमनुपहतो भाति तावत्स्वभावैः ॥५२॥
अन्वयार्थ-‘यः तु एकः भानुः अनेकोदकांतर् तदर्थप्रतिफलनवशात् नानात्वं याति-’ जो एकच सूर्य अनेक उदकपूर्णपात्रांमध्यें स्वतः प्रतिबिंबित झाल्यामुळें अनेकत्वानें भासतो; ‘उपाधिस्थितिगतिसमतां च अपि (याति)-’ आणि उपाधि असेपर्यंत असणें, उपाधि नष्ट झाली असतां नष्ट होणें, इत्यादि उपाधिधर्मांशीं साम्य पावतो; ‘तद्वत् परात्मा उच्चावचेषु भूतेषु प्रतिफलित इव आभाति-’ तसेंच, परमात्मा लहान-मोठ्या भूतांमध्यें प्रतिबिंबित झाल्यासारखा भासतो. ‘यः तावत् स्वभावावच्छिन्नः परंतु स्वभावैः तावत् अनुपहतः स्फुटं भाति-’ जो उपाधीच्या स्वभावानें तर युक्त होतो, पण स्वतःच्या स्वभावांनीहि (कधी) हीन होत नाहीं, असें स्पष्ट दिसतें. आतां हीच गोष्ट सूर्याच्या दृष्टांतानें पुनः स्पष्ट करितात-अनेक पात्रांमध्यें पाणी भरून तीं पात्रें उघड्या जाग्यांत ठेविलीं असतां त्या प्रत्येकामध्यें निरनिराळा सूर्य दिसूं लागतो. पात्रांतील उपाधिभूत उदक हालूं लागलें असतां तें प्रतिबिंबहि हालत आहे, असें भासतें व उदक ओतून टाकिलें असतां तें नष्ट झालें, असें वाटतें. परंतु ह्या विक्रियांपैकीं बिंबभूत सूर्याला कोणतीच विक्रिया होत नाहीं; तसेंच सर्वहि लहानमोठ्या शरीरांतील अंतःकरणामध्यें परमात्मा प्रतिबिंबित झाल्यासारखा भासतो, व अनेक अंतःकरणोपाधींमुळें तो जीवरूपानें अनेक असल्यासारखा वाटतो. अंतःकरणरूप उपाधि असेपर्यंत जीवाचें अस्तित्व असतें. अंतःकरण सुखी किंवा दुःखी झालें असतां जीवहि सुखी किंवा दुःखी झाल्यासारखा वाटतो. परंतु ज्याप्रमाणें उदकोपाधीच्या धर्मांनीं सूर्यप्रतिबिंबें युक्त झालीं तरी स्वतःचे प्रकाशत्व टाकीत नाहींत, त्याचप्रमाणें सुखदुःखादि उपाधिधर्मांनीं जीव युक्त झाला तरी स्वतःचे चैतन्यादि स्वभाव टाकित नाहीं] ॥५२॥