तद्बह्मैवाहमस्मीत्यनुभव उदितो यस्य कस्यापि चेद्वै
पुंसः श्रीसद्रुरूणामतुलितकरुणापूर्णपीयूषदृष्ट्या ।
जीवन्मुक्तः स एव भ्रमविधुरमना निर्गतेऽनाद्युपाधौ
नित्यानंदैकधाम प्रविशति परमं नष्टसंदेहवृत्तिः ॥९१॥
अन्वयार्थ-‘यस्य कस्य अपि पुंसः श्रीसद्रुरूणां अतुलितकरुणापूर्णापूर्णपीयूषदृष्ट्या तद्बह्म एव अहं अस्मि इति अनुभवः उदितः चेत्-’ कोणाहि एखाद्या पुरुषाला श्रीसद्रूरूंच्या अप्रतिम करुणेनें पूर्ण अशा अमृत दृष्टीनें ‘तें ब्रह्मच मी आहे’ असा अनुभव जर आला तर ‘भ्रमविधुरमनाः (अत एव) नष्टसंदेहवृत्तिः सन् जीवन्मुक्तः (भवति)-’ त्याचें मन भ्रमरहित होतें, त्यामुळेंच त्याचे सर्व संशय नष्ट होतात व तो जीवन्मुक्त होतो, ‘स एव अनाद्युपाधौ निर्गते सति परमं नित्यानंदैकधाम प्रविशति-’ त्याची अनादि उपाधि नष्ट झाली असतां श्रेष्ठ व नित्य आनंद हेंच ज्याचें रूप आहे अशा आत्म्यामध्यें तो प्रवेश करितो. मागच्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें प्रकाशरूप आत्म्याचा अनुभव आला असतां जीवन्मुक्ति हें फल मिळतें असें येथें सांगतात-कोणाहि अधिकारी पुरुषाला श्रीगुरूच्या निरुपम करुणेनें भरल्यामुळें अमृततुल्य (मरणाची निवृत्ति करणार्या) दृष्टीनें प्राप्त झालेल्या ब्रह्मविद्येच्या योगानें ‘मी ब्रह्म आहें’ असा अनुभव आला असतां( म्ह० गुरूंनीं सांगितलेल्या लक्षणाचें, देश, काल, वस्तु, इत्यादिकांनीं होणार्या परिच्छेदानें रहित व महावाक्यस्थ ‘तत्’ पदाचें लक्ष्य ब्रह्मच मी -त्वंपदलक्ष्य कूटस्थ आहें, त्याहून भिन्न नाहीं, असा निश्चयात्मक साक्षात्कार झाला असतां) तेव्हांच त्या पुरुषाचें मन विपरीत ज्ञानरहित होतें. (म्ह० प्रारब्धाप्रमाणें जीवन्मुक्त्यवस्थेंमध्यें व्यवहार करण्यास योग्य असें तें होतें.) अंतःकरण भ्रमशून्य झाल्यामुळेंच त्याच्या संशययुक्त वृत्ति नाहींशा होतात. असें झालें असतां पुरुष (साधक) जीवन्मुक्त होतो. ‘स एव’ या पदांनीं त्या जीवन्मुक्तालाच विदेहमुक्ति हें फल मिळतें, असें सांगतात. तो जीवन्मुक्तच प्रारब्ध कर्माचा क्षय झाला असतां व मायारूपी उपाधि समूळ नष्ट झाली असतां, पुनर्जन्माचें बीज अशी जीं संचितादि कर्में तीं पूर्वीं आत्मज्ञानकालींच नष्ट झाल्यामुळें, कार्यकारणभावशून्य (म्ह० निरुपाधिक) व निरतिशय आनंदरूप अशा मुख्य गृहामध्यें (स्वरूपांत-तेजामध्यें) प्रवेश करितो. धाम म्ह० तेज किंवा गृह असें स्वतःचें रूप. सर्व सूर्यादि तेजांना प्रकाशित करितें म्हणून तेज व आब्रह्मस्तंभपर्यंत सर्वांचें ते वसतिस्थान असल्यामुळें गृह होय. अशा त्या तेजांत किंवा गृहांत (म्ह० स्वतःच्या रूपांत) तो लीन (तद्रूप) होतो. ह्या श्लोकाच्या प्रथम चरणांत ‘यस्य कस्यापि’ हीं पदें योजून व्यवहारसिद्ध मनुष्य, पशु इत्यादि जाति, ब्राह्मणादि वर्ण, ब्रह्मचर्यादि आश्रम, बाल्यादि वयोवस्था, स्त्री, पुरुष, उच्च, नीच इत्यादि भेद शास्त्रीय ज्ञानाला प्रतिबंध करीत नाहींत असें सुचविलें आहे. लोक भ्रमानें काहींना अधिकार आहे व कांहींना नाहीं असें मानतात. पण अमुक अमुक लक्षणांनीं युक्त असलेला कोणींहि पुरुष मोक्षाचा अधिकारी आहे, असें प्रतिपादन करणार्या वाक्यांनीं त्याचें निराकरण केलें आहे. ‘पुंसः’ असें पद श्लोकांत योजून मोक्षाचें मुख्य साधन जें तत्त्वज्ञान तें प्राप्त होण्याकरितां गुरुशुश्रूषा व तद्द्वारा श्रवणादिसाधनें यांचें अनुष्ठान मुमुक्षूनें होण्याकरितां गुरुशुश्रूषा व तद्द्वारा श्रवणादिसाधननें यांचें अनुष्ठान मुमुक्षूनें प्रयत्नपूर्वक करावें, असें सुचविलें आहे. श्रीसद्रुरूणां-म्ह० मुक्ति व श्री (संपत्ति) यांसहवर्तमान असणारे व तद्रूप ब्रह्माचा ज्यांना साक्षाकार झाला आहे, अशा उपदेशक गूरूंचा. आत्मज्ञानी गुरु श्रीयुक्त असतात,याविषयीं ‘भद्रैषं लक्ष्मी निहिताधिवाचि’ ‘अस्ति ब्रह्मेति चेद्वेदे’ इत्यादि अनेक श्रुति प्रमाण आहे] ९१