दृश्यं यद्रूपमेतद्भवति च विशदं नीलपीताद्यनेकं
सर्वस्यैतस्य दृग्वे स्फुरदनुभवता लोचनं चैकरूपम् ।
तद्दृश्यं मानसं दृक् परिणतविषयाकारधीवृत्तयोऽपि
दृश्या दृग्रूप एव प्रभुरिह स तथा दृश्यते नैव साक्षी ॥९३॥
अन्वयार्थ-‘दृश्यं यत् एतत् नीलपीताद्यनेकं च रूपं विशदं भवति-’दृश्य (नेत्राचा विषय) असें हें जें निळे, पिवळें इत्यादि अनेक प्रकारचें रूप स्पष्ट भासतें ‘सर्वस्य एतस्य दृक् वै स्फुरदनुभवता तच्च लोचनं एकरूपम्-’ त्या सर्वांचें दर्शनसाधन प्रतीतीला येणारा अनुभवपणाच आहे. तोच नेत्र आहे व तो एकरूपाचाच असतो.‘तत् दृश्यं मानसं दृक् (तस्य धीः दृक्) परिणतविषयाकारधीवृत्तयः अपि दृश्याः-’ पण तोहि दृश्य (अनुभवविषय) आहे. त्याचें दर्शनसाधन मन आहे. मनाचा प्रत्यय बुद्धीला येतो. विषयाप्रमाणें परिणाम पावलेल्या (त्याच्यासारख्या आकाराच्या) बुद्धिवृत्तीसुद्धां दृश्य आहेत. ‘(किंतु) इह प्रभुः साक्षी दृग्रूपः एव-’ (पण) या सर्व जडसमूहांत सर्वांचा नियामक व साक्षी जसा जो आत्मा तोच ज्ञानरूप आहे. ‘स तथा नैव दृश्यते-’ व विषयांप्रमाणें त्याचा अनुभव कोणालाच येत नाहीं. पिूर्व श्लोकांत जीवन्मुक्त पुरुष आत्मानुसंधान कसें ठेवितो तें सांगितलें आतां येथें तेंच पुनः निराळ्या प्रकारानें सांगतात- हें प्रत्यक्ष अनुभवाला येणारें रूप निळें, काळें, पांढरें, पिंवळें, इत्यादि अनेक प्रकारांनीं भासत असल्यामुळें दृश्य (अनुभवाला योग्य) आहे. ह्या प्रतीत होणार्या सर्व रूपांचें ग्रहण करणारी व जीच्यामध्यें अनुभवरूप स्फुरणें भासतात अशी दृष्टिच नेत्र होत. कारण ते नेत्र रूपदर्शनाचें साधन आहेत. पण त्यांची प्रतीति एकरूपानेंच येते म्ह० रूपामध्यें जसे नीलादि अनेक भेद दिसतात तसे नेत्रांत कोठेंच दिसत नाहींत.ते नेत्रहि दृश्य आहेत; कारण नेत्रांचा मनाला अनुभव येतो. त्या मनाला निश्चयरूप अंतःकरण (बुद्धि) पाहते (विषय करिते.) ती बुद्धिहि दृश्य आहे. कारण विषयरूप झालेल्या अंतःकरणवृत्तींचाहि भोक्त्याला अनुभव येत असतो. ह्मणून भोक्त्याच्या अनुभवाला येणारें हें सर्व पदार्थजात जड व विकारी असल्यामुळें आत्म्याहून पृथक् आहे, असा निश्चय करावा; व ह्या सर्व जड पदार्थांत गूढ राहून सर्वांचाहि अनुभव घेणारा प्रभु व सर्वांच्या निकट राहून त्यांना साक्षात् पाहणारा साक्षी आत्माच ज्ञानरूप आहे. सर्व पदार्थांना जरी हा आपल्या ज्ञानसामर्थ्यानेंं प्रकाशित (व्यवहारयोग्य) करितो व सर्वांचा अनुभव घेतो, तरी याला प्रकाशित करणारा व याचा अनुभव घेणारा दुसरा कोणीहि नाहीं. तात्पर्य विषयांचा अनुभव नेत्रादि इंद्रियें, नेत्रांचा मन, मनाचा बुद्धि व बुद्धीचा आत्मा अनुभव घेतो; पण त्याचा अनुभव घेणारा दुसरा कोणीहि प्रतीत होत नाहीं. ह्मणून हाच स्वप्रकाश, स्वयंज्योति, अनुभवरूप, व ज्ञान (ज्ञेय नव्हे) आहे. सारांश व्यवहारांत आम्ही सर्व प्राकृत लोक बुद्धिस्थ संस्कारांनाच ‘ज्ञान’ ह्मणून म्हणतों. पण तें खरें ज्ञान नसून ज्ञेय आहे. कारण त्याचाहि अनुभव दुसरा कोणी घेत असतोच; पण आम्हां विषयी जनांना तें समजत नाहीं.] ९३