मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ३५

शतश्लोकी - श्लोक ३५

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


जीवंतं जाग्रतीह स्वजनमथ मृतं स्वप्नकाले निरीक्ष्य
निर्वेदं यात्यकस्मान्मृतममृतममुं वीक्ष्य हर्षं प्रयाति ।
स्मृत्वाप्येतस्य जंतोर्निधनमसुयुतिं भाषते तेन साकं
सत्येवं भाति भूयोल्पकसमयवशात्सत्यता वा मृषात्वम् ॥३५॥

अन्वयार्थ-‘इह जाग्रति जीवंतंस्वजनं अथ स्वप्नकाले मृतं निरीक्ष्य अकस्मात् निर्वेदं याति-’ ह्या जाग्रदवस्थेंत आपल्या एखाद्या जीवंत असलेल्या आप्ताला स्वप्नांत मृत पाहून एकाएकी मनुष्य शोक करूं लागतो, ‘अथवा (जाग्रत्यां) मृतं अभुं अमृतं वीक्ष्य (स्वप्नकाले) हर्षं प्रयाति-’ किंवा तसेंच जाग्रत्कालीं मेलेल्या आप्ताला स्वप्नांत जीवंत पाहून तो हर्ष मानितो. ‘एतस्य जंतोः निधनं स्मृत्वा अपि (अथवा जीवंतः) असुयुतिं स्मृत्वा अपि तेन साकं भाषते (तथा मृतेन दीनालापं करोति)-’ ह्या प्राण्याच्या (स्वप्नांतील) मरणाचें ह्याला जाग्रतींत स्मरण असूनही, त्याच्याशीं बोलतो तसेंच जाग्रतींत मृत झालेल्याला स्वप्नांत जीवंत पाहिल्याचें स्मरण असूनही त्याच्या विषयीं दीनालाप (खेद) करितो. ‘एवं सति भूयोल्पकसमयवशात् सत्यता मृषात्वं वा भाति’ असें असतांही पुष्कळ वेळ भासणें व थोडा वेळ भासणें यांमुळेंच एक अवस्था सत्य व दुसरी खोटी असें भासतें मिागच्या श्लोकांत निर्दिष्ट केलेलीच गोष्ट आणखी एक दृष्टान्त देऊन स्पष्ट करितात- व्यवहारामध्यें एखादा पुरुष आपल्या जिवंत आप्ताला स्वप्नामध्यें मृत पहातो; आणि त्या स्वप्नावस्थेमध्येंच त्या आप्ताविषयीं आक्रोश करितो. तसेंच खरोखर मृत झालेल्या मनुष्याला स्वप्नांत जिवंत पाहून मोठा आनंद मानितो. पहिल्या दोन चरणांत जाग्रदवस्थेंतील विषय स्वप्नांत मिथ्या कसे ठरतात तें दाखविलें आहे. पण यावर कदाचित् कोणी त्या मरणाचें अथवा जिवंतपणाचें स्मरण नसल्यामुळें असें भ्रामक ज्ञान होतें असें ह्मणतील ह्मणून ‘‘स्मृत्वो ’’ इत्यादि पुढील चरणांत सांगतात. जागा झाल्यावर ज्या मनुष्याला स्वप्नामध्यें मृत पाहिलें होतें त्याच्याशीं, त्याच्या मरणाचें स्मरण असूनही, भाषणादि सर्व व्यवहार करितो. ह्मणजे त्याला स्वप्नांतील गोष्टी खोट्या आहेत असें निश्चयानें माहीत असते. तसेंच, खरोखरच मृत झालेल्या मनुष्याला हा स्वप्नांत जीवंत पहातो, व जागा झाल्यावर त्याला त्या स्वप्नाची आठवण असली तरी पूर्वींप्रमाणेंच त्या मृताविषयीं रडत बसतो. ह्याप्रमाणें दोन्ही प्रकारांनीं स्वप्न व जाग्रति मिथ्या आहेत जसा अनुभव येत असूनही स्वप्नांतील विषयांची अगदी थोडा वेळ प्रतीति येत असल्यामुळें ते मिथ्या, व जाग्रदवस्थेंतील विषयांचा बराच वेळापर्यंत अनुभव येतो ह्मणून ते सत्य असे लोक मानितात. कारण एका स्वप्नांत जी वस्तु आपण पाहिली तीच दुसर्‍या स्वप्नांतही पहावयास सापडेल, किंवा तिचें निदान स्मरण होईल, असाही नियम नाहीं, पण जाग्रदवस्थेमध्यें आपण एकदा ज्याचा अनुभव घेतला त्याच विषयाचा पुनः कांहीं काल अनुभव घेतां येतो. किंवा प्रस्तुत देह आणि आत्मा यांचा संबंध असेपर्यंत त्याचें स्मरण तरी असते. ह्मणून स्वप्नाला मिथ्या व जाग्रतीला सत्य असें आह्मी भ्रमानें ह्मणतों. परंतु सूक्ष्म दृष्टीनें विचार करूं लागलें असतां त्या दोन्ही अवस्था मिथ्याच आहेत असें प्रत्ययाला येतें] ३५.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP