मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ८१

शतश्लोकी - श्लोक ८१

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


यो यो दृग्गोचरोऽर्थो भवति स स तदा तद्रतात्मस्वरूपाविज्ञानोत्पद्यमानः
स्फुरति ननु यथा शुक्तिकाज्ञानहेतुः ।
रौप्याभासो मृषैव स्फुरति च किरणाज्ञानतोंऽभो भुजंगो
रज्ज्वज्ञानान्निमेषं सुखभयकृदतो दृष्टसृष्टं किलेदम् ॥८१॥

अन्वयार्थ-‘ननु यथा शुक्तिकाज्ञानहेतुः रौप्याभासः किरणाज्ञानतः अम्भः रज्ज्वज्ञानात् भुजंगः निमेषं सुखभयकृत् मृषैव स्फुरति-’खरोखर ज्याप्रमाणें शिंपीच्या अज्ञानानें रुप्याचा भास, किराणांच्या अज्ञानापासून मृगजळ, रज्जूच्या अज्ञानामुळें भुजंग इत्यादि क्षणिक सुख व भय देणारे खोटेच पदार्थ भासतात; ‘तथा यः यः दृग्गोचरः अर्थः भवति सः सः तदा तद्रतात्मस्वरूपाविज्ञानोत्पद्यमानः स्फुरति-’ त्याचप्रमाणें जो जो इंद्रियगोचर पदार्थ असतो तो तो त्याकाळीं त्या पदार्थांत असणार्‍या आत्मस्वरूपाच्या अज्ञानानें उत्पन्न होऊनच भासतो. ‘अतः किल इदं दृष्टसृष्टम्’ म्हणून खचित हें सर्व केवल दर्शनकालींच उत्पन्न होतें. या श्लोकांत आत्म्याच्या अज्ञानानेंच सर्व पदार्थ भासतात असें दृष्टान्त देऊन सिद्ध करितात.शिंपीच्या तुकड्याचें ज्ञान न झाल्यामुळें तें रुप आहे असा भ्रम होतो, किंवा सूर्यकिरणाचें ज्ञान न झाल्यानें मारवाडांतील भूमीवर जलाचा भास होतो, अथवा दोरीचें ज्ञान न झाल्यानें तो सर्प आहे असें वाटतें; पण तें वाटणें खरे नसतें असा ज्याप्रमाणें नेहमीं व्यवहारात अनुभव येतो, त्याचप्रमाणें जाग्रदवस्थेमध्यें जे जे मनुष्य, पशु, पक्षि, कीटक, वृक्ष, पाषाण इत्यादि पदार्थ दिसतात ते ते सर्वहि त्यांत गूढ असणार्‍या आत्म्याचें ज्ञान न झाल्यामुळें दिसतात. म्ह०  आत्म्याच्या अज्ञानानेंच त्यांची उत्पत्ति होते. कारण सुषुप्तीमध्यें अंतःकरणवृत्ति आत्मरूप झाल्यामुळें कोणताच पदार्थ दिसत नाहीं. पण ‘अहो हा संसार जर खरोखरच भ्रामक आहे तर त्यापासून सुखदुःखादिकांची प्राप्ति कशी होते?’ अशी शंका घेऊं नये. कारण दरिद्री पुरुष रस्त्यांत पडलेल्या शिंपीच्या तुकड्यास तें रुपें आहे असें समजून मोठ्या आनंदानें घेऊं लागतो. तृषित पुरुष मृगजलाकडे पाहून आनंदित होतो व रज्जुसर्पाला पाहून भीतीनें तो दुःखी होतो ह्या गोष्टी सर्वानुभूत आहेत. सारांश जगांतील भ्रामक पदार्थांपासून क्षणिक सुख किंवा दुःख होणें अशक्य नाहीं. म्हणून हें जगत् आपण पाहतों तेव्हांच उत्पन्न होतें व त्याच्या उत्पत्तीला आत्म्याचें अज्ञान हेंच एक कारण आहे. वस्तुतः असें आहे तरी त्याकडे एकसारखें पाहण्याची प्राण्यांना संवय लागल्यामुळें हेंच सत्यासारखें वाटून सत्य जी आत्मवस्तु ती असत्य वाटते. जोरानें फिरविलेलें कोलित जसें वर्तुलाकार भासते तसेंच हें जगत्हि दृढ वासनेमुळें सत्य वाटतें.] ८१


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP