सर्वानुन्मूल्य कामान् हृदि कृतनिलयान्क्षिप्तशकूनिवोचैच्च
जीर्यद्देहाभिमानस्त्यजति चपलतामात्मदत्तावधानः ।
यात्युर्ध्वस्थानमुच्चैः कृतसुकृतभरो नाडिकाभिर्विचित्रं
नीलश्वेतारुणाभिःस्रवदमृतभरं गृह्यमाणत्मसौख्यः ॥४३॥
अन्वयार्थ-‘उच्चैः क्षिप्तशंकुन् इव हृदि कृतनिलयान् सर्वान् कामान् उन्मूल्य जीर्यदेहाभिमानः आत्मदत्तावधानः (च) सन् चपलतां त्यजति-’ जोरानें ठोकलेल्या खिळ्याप्रमाणें हृदयामध्यें घर करून राहिलेल्या सर्वही इच्छांना काढून टाकून ज्यानें देहाभिमान सोडला आहे व ज्याने आत्मानुसंधान ठेविलें आहे असा पुरुष मनाची चपलता टाकितो; ‘(तथाभूतः सन्) कृतसुकृतभरः गृह्यमाणात्मसौख्यः नीलश्वेतारुणामिः नाडिकाभिः विचित्रं स्रवदमृतभरं उच्चैः ऊर्ध्वस्थानं याति-’ व याप्रमाणें वृत्तिरहित होऊन ज्यानें पुष्कळ पुण्य केलें आहे व जो आत्मसौख्याचा अनुभव घेत आहे, असा जीवन्मुक्त, नील, श्वेत व अरुण अशा नाड्यांनी विचित्र व ज्यांच्यापासून अमृतस्त्राव होत असतो अशा सर्वोत्कृष्ट ब्रह्मस्थानाला जातो. पूर्व श्लोकांत सांगितेल्या दोन मुक्तींपैकीं जीवन्मुक्ति कोणती हें सांगतात-ज्याप्रमाणें तीक्ष्ण अग्राचा खिळा जोरानें भूमीमध्यें ठोकला असतां तो पुष्कळ खोल जाऊन तेथें घर करून बसतो, त्याप्रमाणें अनेक कल्पपर्यंत संस्काररूपानें (बीजरूपानें) हृदयामध्यें दृढ होऊन राहिलेल्या सर्व मनोरथांना समूळ काढून टाकून जो मुमुक्षु देहाविषयीं निरभिमान झाला आहे, व जो आत्म्याच्या ठिकाणीं अंतःकरणाचें अवधान ठेवून राहतो, त्याच्या मनाची विक्षिप्तावस्था (चांचल्य) सर्वथैव नष्ट होतो. मनाची चंचलता गेली असतां प्राण्याच्या हातून राजस व तामस कृत्यें होत नाहींत. त्यामुळें त्याचा पुष्कळ पुण्यसंचय होतो. पण देहसंबंधामुळें किंचित् अभिमान राहिल्यानें मी आत्मानुभवी आहें, असें त्याला वाटत असतें. सारांश आत्मानुभवी जीवन्मुक्त पुरुष निळ्या पांढर्या व आरक्त नाड्यांनी विचित्र, व कुंडलिनीचा भेद झाल्यामुळें ज्याच्यापासून अमृताचा स्राव होत असतो अशा सर्व श्रेष्ठ ब्रह्मरंध्राला सुषुप्तनाडीच्या द्वारा जातो. या प्रतिपादनाला ‘‘यदा सर्वे प्रमुच्यन्ते’’ इत्यादि बृहदारण्यकांतील चार कंडिका आधार आहेत. त्यांचें तात्पर्य-ह्या मुमुक्षु पुरुषाच्या अंतःकरणांतील सर्व वासना नष्ट झाल्या असतां तत्क्षणींच तो (मरणधर्मवान्) अमृत (मरणधर्मरहित) होतो; व त्याला या देहांतच ब्रह्मानुभव येतो याज्ञवल्क्य जनकाला ह्मणाले-‘‘हे राजा, जशी सर्पाची जीर्ण त्वचा (कात) सर्पाच्या बिळांत सर्पाप्रमाणेंच पडलेली असते व ती निश्चेष्ट असली तरी दुरून पाहणाराला सर्पासारखीच भासते, पण सर्पाच्या दंशदि क्रिया मात्र करीत नाहीं; तसाच हा जीवन्मुक्त पुरुष शरीरांत राहूनहि कांहीं क्रिया करीत नाहीं व स्थूल-सूक्ष्म देहांविषयीं अभिमानरहित होऊन रहातो. त्याच्याकडे पाहणारांना तो इतरांप्रमाणेंच व्यवहारी आहे असें वाटतें, पण वस्तुतः तो तसा नसतो’’ गुरूपदेशद्वारा प्राप्त झालेल्या उत्तम व सुषुम्नाडीरूप असल्यामुळें अति सूक्ष्म, अशा मार्गाचें मी अनुष्ठान केलें. कारण ह्या मार्गाच्या अवलंबनानें धीर ब्रह्मज्ञानी पुरुष संसारापासून मुक्त होऊन ब्रह्मरन्ध्रनांवाच्या उत्तम पदाला जातात ३. शुक्ल, नील इत्यादि अनेक रंगांच्या नाड्यांनीं ते स्थान विचित्र झालें आहे. ह्या सुषुम्ना मार्गाचेंच अनुष्ठान ब्रह्मदेवानें मजकडून करविलें; पुण्यचरणीं आणि विराड्रूप झालेला ब्रह्मज्ञानी त्याच मार्गानें जातो.] ४३.