यः प्रैत्यात्मानभिज्ञः श्रुतिविदपि तथा कर्मकृत्कर्मणोऽस्य नाशः
स्यादल्पभोगात्पुनरवतरणे दुःखभोगो महीयान् ।
आत्माभिज्ञस्य लिप्सोरपि भवति महाञ्शाश्वतः सिद्धिभोगो
त्द्यात्मा तस्मादुपास्यः खलु तदीधिगमे सर्वसौख्यान्यलिप्सोः ॥८६॥
अन्वयार्थ-‘यः श्रुतिविद् अपि तथा कर्मकृत् आत्मानाभिज्ञः सन् प्रैति अस्य कर्मणः अल्पभोगात् नाशः स्यात्-’ जो वेदवेत्ता व तसेंच कर्मठ पुरुषहि आत्म्याविषयीं अज्ञ राहूनच परलोकीं जातो त्याच्या कर्माचा (स्वर्गांत) कांहीं काल भोग मिळाला असतां नाश होतो; ‘(अस्य) पुनः अवतरणे महीयान् दुःखभोगः (भवति)-’ व त्याला पुनः या लोकीं जन्म घेतांना अत्यंत दुःख होतें. ‘आत्माभिज्ञस्य लिप्सोः अपि महान् शाश्वतः सिद्धिभोगः भवति-’ आत्मज्ञानी असून जो कर्मफलाची इच्छा करितो त्यालाहि श्रेष्ठ व नित्य असे अणिमादि सिद्धींचे भोग मिळतात. ‘अलिप्सोः तदधिगमे खलु सर्वसौख्यानि भवन्ति-’ फलाच्या इच्छेनें कर्में न करणार्या पुरुषाला आत्मज्ञान झालें असतां खरोखर सर्व सुखें प्राप्त होतात. ‘तस्मात् आत्मा हि उपास्यः-’ म्हणून आत्म्याचीच उपासना करणें योग्य आहे. ज्ञानरहित कर्म व ज्ञानसहित कर्म यांची फलव्यवस्था दाखवून सर्व सुखांच्या प्राप्तीकरितां आत्मज्ञान करून घेणेंच योग्य आहे, असें येथें सांगतात-एखादा पुरुष मोठा वेदवेत्ता व मोठा कर्मठहि असून आत्मज्ञानी नसला तर त्याला स्वर्गलोकीं गेल्यावर कांही काल भोग भोगिल्यानें कर्मक्षय झाला असतां पुनः या लोकीं येऊन जन्म घ्यावा लागतो. पण त्यावेळीं त्याला अत्यन्त दुःख होतें. भगवानांनीं ‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति’ ह्मे त्या विशाल स्वर्गलोकचे भोग भोगल्यानें कर्में नष्ट झालीं असतां ते मृत्युलोकीं पुनः जन्म घेतात; असें सांगितलें आहे. कर्मक्षयामुळें स्वर्गलोकांतून भ्रष्ट होऊन मर्त्यलोकीं जन्म घेतांना प्राण्यांना अत्यंत दुःख होतें. कारण देहधारण व देहविसर्जन अतिकष्टकर आहे. शिवाय व्यवहारांत सुद्धां उच्च स्थितींतल्या पुरुषाला अवनति (हीनावस्था प्राप्त) झाली असतां किती दुःख होतें, हें सर्वांना ठाऊक आहेच. आत्मज्ञानी असून जो कर्मफलाची इच्छा करितो त्याला स्वर्गाहून श्रेष्ठ व पुष्कळ काल रहाणार्या अणिमादि अष्ट सिद्धि प्राप्त होतात. ‘अथ यो हवा अस्मात् कामयत तत्तत्सृजते ’ ही श्रुति या श्लोकोक्त प्रतिपादनाला आधार आहे]८६