रज्ज्वज्ञानाद्भ जंगस्तदुपरि सहसा भाति मंदान्धकारे
स्वात्माज्ञानत्तथासौ भृशमसुखमभूदात्मनो जीवभावः ।
आप्तोक्त्याहिभ्रमांते स च खलु विदिता रज्जुरेका तथाहं
कूटस्थो नैव जीवो निजगुरुवचसा साक्षीभूतः शिवोऽहम् ॥९४॥
अन्वयार्थ-‘(यथा) मंदान्धकारे रज्ज्वज्ञानात् तदुपरि सहसा भुजंगः भाति’ ज्याप्रमाणें मंद अंधकारामध्यें दोरीचें ज्ञान न झाल्यामुळें तिच्या ठिकाणीं सर्प भासतो, ‘तथा स्वात्मज्ञानात् असौ आत्मनः जीवभावः भृशं असुखं (भाति-)’ तसाच स्वात्म्याच्या अज्ञानानें आत्म्याच्या जीवभाव अत्यंत दुःखरूप भासतो. ‘(यथा) आप्तोक्त्या अहिभ्रमान्ते सः च खलु विदिता रज्जुः एव एका अभूत्-’ आप्ताच्या सांगण्यावरून सर्पभ्रम निवृत्त झाला असतां तो ज्ञात झालेली ती एक रज्जूच जसा होतो, ‘तथा निजगुरवचसा (जीवत्वभ्रमान्ते) अहं जीवः न एव अस्मि-’ तसाच आपल्या गुरूंच्या वचनानें जीवभ्रम नष्ट झाला असतां मी जीव नव्हेंच तर ‘अहं साक्षीभूतः कूटस्थः शिवः अस्मि-’ मी सर्वसाक्षी, निर्विकार व कल्याणरूप आहें.असा बोध होतो. आतां येथें त्या जीवन्मुक्ताचें स्वरूप सांगतात व साधकानें गुरूंवर विश्वास ठेवून, त्यांनीं सांगितलेल्या वचनानुरूप तर्क करून, युक्तीनें स्वतःच्या जीवत्वाचा बाध करून आत्मानुसंधान कसे करावें, हेंहि सांगतात. जसें-अति अंधकारहि नाहीं व अति प्रकाशहि नाहीं अशा वेळीं रस्त्यांत पडलेल्या दोरीचें यथार्थ ज्ञान न झाल्यानें म्ह० तिच्या स्वरूपाच्या अज्ञानानें पहाणाराला तो मोठा सर्प आहे असें एकाएकीं वाटतें, तसेंच स्वतःच्या आत्म्याचें यथार्थ स्वरूप न समजल्यानें म्हणजे आत्म्याचें आत्मरूप यथार्थ ज्ञान न झाल्यामुळें त्याच्याच जागीं हा सर्व प्राकृतांच्या प्रत्ययाला येणारा आत्मसंबंधी अत्यंत दुःखरूप जीवभाव भासतो. सर्पभ्रमाला रज्जूचें ज्ञान न होणें हें कारण असून तीच जशी त्याला आधार असते तसेंच जीवभ्रमाला आत्म्याचें अज्ञान कारण व तोच आधार आहे. पण ज्याच्यावर आपला विश्वास असतो अशा एखाद्या पुरुषानें ‘अरे तो सर्प नव्हे, दोरी आहे’ असें सांगितलें असतां व त्याप्रमाणें आपणाला अनुभव आला असतां जसा भ्रम नष्ट होतो व पूर्वी भासलेला सर्पच केवल एक दोरी होऊन राहतो म्ह० दोरीचें ज्ञान झाल्यानें तद्विषयक अज्ञान व अज्ञानकार्य नष्ट होतें व रज्जुरूपानें ज्ञात झालेली एकटी रज्जूच अवशिष्ट राहते, त्याप्रमाणें स्वगूरूंच्या (आत्मज्ञानोपदेशकांच्या) वचनानें ह्मे त्यांनी सांगितलेल्या ‘तत्त्वमासि’ इत्यादि वाक्याच्या अर्थद्वारा व युक्तीनें जीवत्वभ्रम नष्ट झाला असतां, सुख, दुःख, जन्म, मरण, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादि धर्मांनीं युक्त होणारा जीव मी नव्हें तर मी जीवादिकांचा साक्षात् अनुभव घेणारा आहे. त्यामुळेंच आत्मज्ञानी मला साक्षी ह्मणतात, पण वस्तुतः मी निर्विकार व कल्याणरूप आहें असें जीवन्मुक्त पुरुषानें सर्वदा आत्मानुसंधान ठेवावें.सारांश सर्पभ्रम जसा आप्तोपदेशानें नष्ट होतो, तसाच जीवत्वभ्रमहि गुरूपदेश, शास्त्रवचन, तदनुसार तर्क व स्वतःचा अनुभव यांच्या योगानें निःशेष घालवून सर्वदा आत्मस्वरूपचिंतनांत अवशिष्ट आयुष्य घालवावें.