शतश्लोकी - श्लोक २५
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
प्रागासीद्भावरूपं तम इति तमसा गूढमस्मादतर्क्यं
क्षीरान्तर्यद्वदंभो जनिरिहजगतो नामरूपात्मकस्य ।
कामाद्वातुः सिसृक्षोरनुगतजगतः कर्मभिः संप्रवृत्ताद्रेतोरूपैर्मनोभिः
प्रथममनुगतैः संततैः कार्यमाणैः ॥२५॥
अन्वयार्थः-‘प्राक् भावरूपं तम इति असीत्-’ पूर्वीं भावरूप अज्ञान होतें. ‘तमसा गूढं अस्मात् अतर्क्यं (किंवत्) यद्वत् क्षीरान्तर् अम्भः-’ दुधांतील पाण्याप्रमाणें अज्ञानानें हें आच्छादित असल्यामुळें अतर्क्य होतें. ‘अनुगतजगतः रेतोरूपैः मनोभिः प्रथमं अनुगतैः संततैः कार्यमाणैः कर्मभिः संप्रवृत्तात् सिसृक्षोः धातुः कामात् नामरूपात्मकस्य जगतः इह जनिः-’ अनादिकालापासून चालत आलेल्या, तसेंच अनादिकालापासून प्रवृत्त झालेल्या आणि प्रवाहाप्रमाणें सतत चालू असणार्या, बीजभूत सृष्टीच्या कर्मांनीं प्रेरित झाल्यामुळें सृष्टि करण्याची इच्छा करणार्या प्रजापतीच्या
कामनेनें नामरूपांनीं युक्त असलेल्या ह्या जगाची उत्पत्ति (होते.) मागच्या श्लोकामध्यें सृष्टीच्या पूर्वी जगत् नव्हतें असें सांगितलें; आणि आतां हें व्यक्त जगत् कसें उत्पन्न झालें किंवा सृष्ट्युत्पत्तीच्या पूर्वीं हें कोणत्या अवस्थेंत होतें, हें स्पष्ट सांगतात. हें जगत् व्यक्त होण्यापूर्वीं त्याचें उपादानरूप तम या नांवाचें अज्ञान होतें. त्या तमानें हें जगत् आच्छादित झालेलें होतें; व त्यामुळें दुधामध्यें असणार्या उदकाचें जसें ज्ञान होत नाहीं, तसें जगाचें ज्ञान तेव्हां होत नव्हतें. नंतर त्या अज्ञानापासूनच ह्या नामरूपानें व्यक्त होणार्या जगाची उत्पत्ति झाली. ज्याप्रमाणें बीजामध्यें वृक्ष गूढ असतो तरी तो व्यक्त होण्यास भूमि, उदक, बीजारोपण करणारा इत्यादि निमित्त कारणें लागतात, त्याचप्रमाणें हें जगत् तमामध्यें गुप्त असतें व तें व्यक्त होण्यास सृष्टीला उत्पन्न करण्याची इच्छा करणार्या प्रजापतीच्या इच्छेची आवश्यकता असते.अनादिकालापासून प्रवृत्त झालेल्या ह्या जगांतील अनंत प्राण्यांच्या कर्मांनीं प्रजापतीला जगत् उत्पन्न करावें अशी इच्छा होते; आणि तीं कर्में बीजरूप, अनादिकालापासून चालत आलेली, सद्रूप व सतत निष्पन्न होणारीं अशीं असतात. म्हणजे तींच पुनरुत्पत्तीला कारण होतात. हा संसार अनादि असल्यामुळें त्यांतील प्राण्यांची संचित कर्मेंही अनादि आहेत. तीं सद्रूप साक्षी जो आत्मा त्याच्या आश्रयानें असतात म्हणूनच त्यांनाही सद्रूप म्हटलें आहे, प्रवाहरूपानें तीं एकसारखीं प्रत्येक संसारामध्यें प्रवृत्त होतात; प्रत्येक नवीन जन्मामध्यें नवीन कर्मांची त्यांत भर पडते, व ज्ञानावांचून त्यांचा कधींही क्षय होत नाहीं म्हणून त्यांना ‘संततैः’ व ‘कार्यमाणैः’ अशी विशेषणें दिलीं आहेत. हा श्लोक, श्रीमदाचार्यांनीं, ‘तम आसीत्तमसा गूढमग्रे’ ह्या श्रुतीच्या आधारानें लिहिला आहे. ह्या श्रुतीच्या भाष्याचें सर्व तात्पर्य येथें दिल्यास चर्वितचर्वण होईल. कारण त्यांतील बहुतेक भाग वर येऊन गेलाच आहे. यास्तव श्लोकाचा अर्थ विशेष स्पष्ट होण्याकरितां कांहीं भाग येथें घेतला आहे.श्रुतीमध्यें पूर्वीं हें जगत् नव्हतें असें सांगितले आहे. पण यावर तार्किक अशी शंका घेतात कीं पूर्वी जर हें जगत् नव्हतें तर त्याची उत्पत्ति कशी झाली; व उत्पन्न होणार्या ह्या जगाची उत्पत्ति करणारा कोण? कारण, कर्ता हें एक कारक आहे; व कारक हा एक कारणाचाच विषय आहे व कारण तर कार्योत्पत्तीच्या पूर्वीं अवश्य विद्यमान असावेंच लागतें. ह्या शंकेचें निरसन करण्यासाठीं उत्पत्तीच्या पूर्वींही जें जगत् एक विशेष रूपानें असतेंच असें श्रुति सांगते. पूर्वीं ह्मणजे प्रलयकालीं हीं सर्व आकाशादि भूतें व त्यांच्यापासून होणारे पदार्थ यांना तमानें (अंधकारानें) झांकून टाकिलें होतें. जसा रात्रींतील अंधकार सर्व पदार्थांना व्यापून सोडतो, व त्यामुळें त्यांचें ज्ञान होत नाहीं, त्याचप्रमाणें मायासंज्ञक भावरूप अज्ञानानें आत्मतत्त्वाला झांकून टाकिलें. म्हणूनच त्याला ‘तम’ असें म्हणतात. त्याच कारणभूत तमामध्यें हें सर्व जगत् गुप्त असतें. त्या तमापासून ह्या नाम व रूप यांनीं युक्त असलेल्या जगानें व्यक्त होणें हीच याची उत्पत्ति होय; व हें आत्माच्छादक अज्ञानच त्याला उत्पन्न करतें; सृष्टि ‘उत्पन्न (ह्मणजे व्यक्त) करावी’ अशी ईश्वराला इच्छा होते व ह्या इच्छेला अनंत प्राण्यांच्या अनंत वासना हेंच कारण होतें. पूर्व कल्पामध्यें प्राण्यांनीं केलेल्या कर्मांचें फळ त्यांना मिळण्याची वेळ आली कीं कर्माध्यक्ष ईश्वराला सृष्टि उत्पन्न करण्याची इच्छा होते व त्याच्या इच्छाशक्तीनेंच ही सृष्टि व्यक्त होते. ही गोष्ट अनुभवगम्य आहे; यास्तव साधकांनीं अनुभवी पुरुषांपासून ती समजून घ्यावी.] २५.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP