मायाध्यासाश्रयेण प्रविततमखिलं यन्मया तेन
मत्स्थान्येतान्येतेषु नाहं यदपि हि रजतं भाति शुक्तौ
न रौप्ये शुत्त्यंशस्तेन भूतान्यपि
मयि निवसंतीति विष्वग्विनेता प्राहास्माद्दृश्यजातं
सकलमपि मृषैवेंद्रजालोपमेयम् ॥८२॥
अन्वयार्थ-‘यत् मायाध्यासाश्रयेण मया अखिलं प्रविततम्-’
ज्याअर्थी (जगाच्या) खोट्या आरोपाला आश्रय होणार्या मीं हें सर्व जगत् पसरिलें आहे ‘तेन मत्स्थानि एतानि अहं एतेषु न-’ त्याअर्थी हीं सर्व भूतें माझ्या आश्रयानें रहातात. मी मात्र त्यांच्यामध्यें नाहीं. ‘हि यदपि शुक्तौ रजतं भाति (परंतु) रौप्ये शुक्त्यंशः न (भाति)-’ कारण जरी शुक्तीच्या ठिकाणीं रूपें भासतें तरी त्या रुप्यांत शुक्तीचा अंश मुळींच दिसत नाहीं. ‘तेन भूतानि अपि मयि निवसन्ति इति विष्वग्विनेता प्राह-’ म्हणूनच भूतें माझ्यामध्यें असतात पण मी त्यांच्यात नसतों असें विश्वोपदेशक भगवान् सांगतात.‘अस्मात् सकलं अपि दृश्यजातं इंद्रजालोपमेयं मृषा एव-’ यास्तव हें सर्वहि दृश्यजात गारुडाप्रमाणें खोटेंच आहे. पूर्व प्रतिपादित अर्थाचेंच भगवद्वाक्य या श्लोकांत आचार्य सुचवितात. गौडबंगालासारखा जो हा जगद्भम प्रत्ययाला येत आहे त्याला आधार मीच आहे. अर्थात् मीच ही सर्व नामरूपात्मक सृष्टि सर्वतः पसरिली आहे; आणि त्यामुळेंच हीं सर्व भूतें माझ्या आश्रयानें असल्यासारखीं वाटतात. पण मी असंग (कोठेंहि आसक्त न होणारा) असल्यामुळें त्यांच्यामध्यें नसतो. ‘कारण कार्याला व्यापून असतें, असा जगांत अनुभव असतांना मी त्यांत नसतों असें भगवान् कसें म्हणतात?’ -अशी शंका कोणी विचारतील ह्मणून आचार्य ‘यदपि हि रजतं’ इत्यादि ग्रंथानें उत्तर देतात- जरी शिंपीच्या ठिकाणी रुपें भासतें तरी त्या भासणार्या रुप्याच्या ठिकाणीं शिंपीचा किंचित्हि अंश भासत नसतो आणि जर कदाचित् शिंपेचा अंश भासूं लागला तर मग तेथें रुप्याचा भ्रमच होणार नाहीं.तस्मात् मी अधिष्ठाता असल्यामुळें ती सर्व भूतें माझ्यामध्येंच आहेत; पण मी त्यांच्यामध्यें नाहीं. म्ह० त्यांच्या अस्तित्वाला माझी जशी गरज असते तशी मला त्यांची कधीच गरज लागत नाहीं. मीं तिन्ही काळीं स्वतःच्या सत्तारूपानें असतों. पण तीं भूतें केवळ मध्यावस्थेंत (वर्तमानकालीं) मात्र माझ्या सत्तेनें सत्तावान् होतात.असेंच यादवेंद्र गोपालकृष्णांनीं ‘मया ततमिदं सर्वंे’ इत्यादि गीतोक्तश्लोकांत स्पष्टपणें सांगितलें आहे. (गी. भा. पृ. ६८५ ) यावरून हें सर्वहि दृश्यजात गारुडासारखें खोटें (कांहीं काळ भासणारें) आहे असें अनुमान करितां येतें]८२