विश्वं नेति प्रमाणाद्विगलितजगदाकारभानस्त्यजेद्वै
पीत्वा यद्वत्फलांभस्त्यजति च सुतरां तत्फलं सौरभाढ्यम् ।
सभ्यक् सच्चिद्घनैकामृतसुखकवलास्वादपूर्णो हृदासौ
ज्ञात्वा निःसारमेवं जगदखिलमिदं स्वप्रभःशांतचित्तः ॥९८॥
अन्वयार्थ-‘यद्वत् फलाम्भः सुतरां पीत्वा तत् फलं सौरभाढ्यं वैत्यजति-’ ज्याप्रमाणें आम्रादि फलांतील रस निःशेष पिऊन-चोखून तें फल उत्तम वासानें युक्त असलें तरी (प्राणी) टाकितो, ‘(तद्वत्) असौ विश्वं न इति प्रमाणात् विगलितजगदाकारभानः-’ त्याचप्रमाणें ‘विश्व नाही’ ह्या प्रमाणवाक्याच्या योगानें ज्याचें जगद्रूपी भान नष्ट झालें आहे, ‘हृदासम्यक् चिद्वनैकामृतसुखकवलास्वादपूर्णः च (सन्)-’ व जो सूक्ष्म दृष्टीनें चैतन्यपूर्ण, एक व नाशरहित अशा सुखाचा अनुभव घेऊन नित्यतृप्त झाला आहे, ‘शांतिचित्तः स्वप्रभः एवं अखिलं इदं जगत् निःसारं ज्ञात्वा त्यजेत्-’ अशा त्या शांतचित्त व स्वयंज्योति ज्ञानी पुरुषानें ह्याप्रमाणें सर्व जगत् निःसार आहे असें जाणून टाकावें. ज्ञानी पुरुष संसार करीत असल्यासारखा जरी दिसतो तरी त्याचा तो त्याग करितो. ह्मणजे त्यांत आसक्त होत नाहीं, असें येथें दृष्टान्त देऊन सांगतात-हा ज्ञानी ‘जगत् नाही’ ‘अन्य कांहीं नाहीं’ असें प्रतिपादन करणार्या स्वतःप्रमाण श्रुतिवाक्यांच्या दृढानुसंधानानें निःशंक होतो. त्यामुळें
जगदाकाराप्रमाणें सर्वांच्या अंतःकरणांत असणारें जें जगद्रूप भान तें त्याच्या ठिकाणी नसतें, तर तें कारणासह नष्ट होतें. सर्वहि दृश्य पदार्थांचें परीक्षण करून प्रत्येक पदार्थाला उद्देशून ‘हें नव्हे’ असा सर्वांचा बाध केल्यामुळें अवशिष्ट रहाणारा जो चैतन्यपूर्ण, स्वगतादिभेदरहित, व नाशहीन आनंद त्याचा तो ग्रास करितो. त्या परमानंदाचा यथेच्छ अनुभव घेतो. मनुष्य अन्नाचे ग्रास जसे हातानें तोंडांत घालितो, तसाच हा त्या पूर्ण आनंदरूप अन्नाचे वैदिक सांख्य व योग ह्या हस्तांनीं अंतःकरणाच्या विद्यारूप मुखामध्यें ग्रास घेतो. जिह्णेनें कांहीं काल रसास्वाद घेतला असतां जसा प्राणी तृप्त होतो, तसा त्या आनंदानुभवानें हा ज्ञानी नित्यतृप्त होतो; व हें सर्व जगत् असार आहे म्ह० यांत सत्त्व किंवा सुख नाहीं, असा त्याचा निश्चय होतो; आणि असा निश्चय झाला असतां चित्तविक्षेपाचें कारण नष्ट झाल्यामुळें त्याचें अंतःकरण शांत होतें. त्यामुळें भाजलेल्या बीजाप्रमाणें तें चित्त संसारोत्पत्तीच्या निरुपयोगी झालें असतां ज्ञान्यानें ह्या जगाचा त्याग करावा. याविषयीं एक लौकिक दृष्टान्त देतात. जसा व्यावहारिक पुरुष आंबा, नारिंग इत्यादि फलांतील सर्व रस पिऊन अवशिष्ट राहिलेला नीरस भाग सुवासिक असला तरी, त्याला त्याची गरज नसल्यामुळें टाकून देतो, तसाच मुमुक्षूनें ज्ञानानंतर हा संसार टाकावा] ९८