मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
प्रस्थानकाळी आज्ञा मागणी

श्रीदत्त भजन गाथा - प्रस्थानकाळी आज्ञा मागणी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


प्रस्थानकाळींची वेला हे वर्तत । म्हणोनी मागत आज्ञेलागी ॥१॥
तरी द्यावी आज्ञा सिद्धता कराया । आम्हां गुरुराया निजकृपे ॥२॥
विजयार्थ जाणे येथोनी आम्हांला । उपासना धर्माला वाढवाया ॥३॥
साप्रदाय दृढमूल बनवाया । विस्तृत कराया जनलोकी ॥४॥
येथोनियां जाणे निश्चय जो झाला । प्रस्थानकाळाला नेमियेले ॥५॥
तोच काल आतां असे प्राप्त झाला । तरी आम्हां आज्ञेला करा आतां ॥६॥
पीठ हालवाया वाहनी बैसावया । आम्हां गुरुराया आज्ञा द्यावी ॥७॥
प्रस्थाना उचित ऐशी जी सिद्धता । तीच भगवंता करायासी ॥८॥
आज्ञा द्यावी आतां चरण नमितो । प्रसाद मागतो कृपावंत ॥९॥
आशीर्वाद द्यावा नाथा विजयाचा । वर मंगलाचा द्यावा आम्हां ॥१०॥
वाहनी तुम्हांसी नाथा बैसविणे । मार्ग आक्रमिणे आतां नाथा ॥११॥
तरी हालवाया आपुले हे पीठ । आम्हां जे का श्रेष्ठ परमची ॥१२॥
वंद्य आम्हांलागी भाविका जनासी । पद सेवकांसी दत्तनाथा ॥१३॥
तेच हलवाया आम्हां आज्ञा द्यावी । थोर कृपा व्हावी आम्हांलागी ॥१४॥
चारुवेष तुम्हां प्रस्थानकालोचित । घालाया अवधूत आज्ञा द्यावी ॥१५॥
विनायक म्हणे आम्हां अनुग्रह । आतां नि:संदेह करावा की ॥१६॥
==
प्रस्थानकाळी आज्ञामागणी

निघण्याची आतां सिद्धता जाहली । श्रीगुरुमाउली तुमच्या कृपे ॥१॥
तरी आतां द्यावी आज्ञा आम्हांलागी । सिद्ध करायालागी वाहनाते ॥२॥
लोकोपकारासाठी तुमचे हे निघणे । सर्व शीण घेणे जगदुद्धारा ॥३॥
उपासनाधर्म वाढावयासाठी । तुम्ही जगजेठी निघालीत ॥४॥
आम्हां भाविकाचेसाठी निघालांत । श्रीगुरु अवधूत दयानिधे ॥५॥
म्हणोनी करितो प्रार्थना तुम्हांसी । आम्हां आशीर्वादासी द्यावे आतां ॥६॥
साष्टांग नमन आम्ही करितसो । श्रीफ़ळ ठेवितसो तुम्हांपुढे ॥७॥।
आम्हां आशीर्वाद द्यावा मंगलाचा । आम्हां विजयाचा आशीर्वाद ॥८॥
==
प्रस्थानकाळी आज्ञा मागणी

चला चला महाराज । तुम्ही आपुलीये काज ॥१॥
सिद्धता सर्व झाली असे । मंगलवेला वर्ततसे ॥२॥
शुभ लग्न शुभ वेळ । शुभ ग्रह हे सकळ ॥३॥
शुभ मुहूर्त वर्ततो । जय शब्द आतां होतो ॥४॥
मंगलार्थ आतां निघणे । सकळ मंगल करणे ॥५॥
जयध्वनी हा उठत । जयजयकार सुचवित ॥६॥
ध्वनि असे विजयाचा । वायु असे प्रसादाचा ॥७॥
भाव असे मंगलाचा । हेतु तरी विजयाचा ॥८॥
तरी आतां स्वामी उठणे । वाहनांत आरोहणे ॥९॥
वाहनापाशी न्यावयासी । तेथे तुम्हां स्थापायासी ॥१०॥
तरी आतां आज्ञा व्हावी । कृपादृष्टी आम्हां असावी ॥११॥
विनायक नमी चरण । करणे यासी आज्ञापन ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP