मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
सह्यवनश्री व देवांचा विलास

श्रीदत्त भजन गाथा - सह्यवनश्री व देवांचा विलास

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार त. २८/११/१९२९
सह्यगिरीवास तुजलागी रुचे । महात्म्य तेथीचें अत्यद्भुत ॥१॥
रम्य उपवनी रम्य वृक्षशोभा । तुज पद्मनाभा आवडत ॥२॥
घेवोनी तुषार संगे वायुदेव । निज सेवा भाव प्रगटीत ॥३॥
वन्य पुष्पें जी का परम सुवासाची । परम आमोदाची गिरीवरी ॥४॥
तयांचा सुगंध घेवोनियां संग । तुजला बिलगे शांतवायु ॥५॥
झुळझुळ वाहे तोष तुज द्याया । औदुंबर छाया तुजवरी ॥६॥
सकळ सांडोनी थोर थोर वृक्ष । तुझे बहु लक्ष औदुंवरी ॥७॥
औदुंबार रुचे कधी न सोडीसी । तेथेच वससी दयाळा तूं ॥८॥
स्फ़टिक शिळा रम्य कल्पिसी आसन । समाधि लावून बैससी तेथे ॥९॥
तुझे शिरावरी शेष फ़णा करी । रत्न त्याच्या शिरी प्रकाशत ॥१०॥
हजार मुखांचा हजार नेत्रांचा । सहस्त्र रत्नांचा अनंत तो ॥११॥
सहस्त्र फ़णा धरी तुझे शिरावरी । अलौकिक तरी शोभा येत ॥१२॥
वनदेवता ही तुजला सेवाया । श्रीसद्गुरुराया सिद्ध असती ॥१३॥
कण्ठी वनमाळा तुझ्या त्या घालिती । पुष्पांनी पूजिती तुजलागी ॥१४॥
गंधर्व किन्नर होवोनी शकुनि । तुजला गायनी रिझविती ॥१५॥
कूजन पक्ष्यांचे अति रमणीय । देखावा तो होय रम्य किती ॥१६॥
लता कुंजामाजी बैससी आवडी । वनश्रीची गोडी तुज बहु ॥१७॥
तुजसाठी थाटे वनश्री परम । जगीं अनुपम सौंदर्याची ॥१८॥
लता कुसुमरेणु तुजवरी वर्षती । मकरंद ओतिती अंगावरी ॥१९॥
हाच पुष्पगंध उटी तुज होत । वास दरवळत सर्वांगाला ॥२०॥
कल्पतरुची जे साल सुमृदुल । तेच तूं वल्कल सेवीतोसी ॥२१॥
नानारुपधारी तुजला ओळखिती । तुजला सेविती मुनिवर ॥२२॥
शुकसनकादिक ब्रह्मानिष्ठ थोर । होती पक्षीवर तव स्थानी ॥२३॥
लक्ष्मी नटे दासी बैसे अंकावरी । तुझीया श्रीहरी दत्तनाथा ॥२४॥
पुष्ट तुझी तनु दृष्टी सामर्थ्याची । जवानमर्द साची मूर्ती तुझी ॥२५॥
तरुण बाविसाचा गाभा सौदर्याचा । जैसा मदनाचा अवतार ॥२६॥
भूषणे पुष्पांची शोभती तनुवरी । तुळसींचे हारी शोभे वक्ष ॥२७॥
पिवळा पीतांबर विजुचा नेसला । आयुधे शोभला सर्वेश्वर ॥२८॥
शंखचक्र माळा डमरु कमंडलु । धरी करीं शूलु भक्तांसाठी ॥२९॥
पीवर बाहु असती जाणा भगवंताचे । काय पुष्टतेचे करुं वर्णन ॥३०॥
तुष्ट पुष्ट देव सुरापान करी । अंकाची ते नारी पीत मधु ॥३१॥
अशन मांसाचे पान मदिरेचे । करिताती साचे दोघेजण ॥३२॥
नानाफ़ळे अर्पी वनश्री देवासी । पार आनंदासी नाही मुळी ॥३३॥
सह्यगिरीवरचा राणा हा सुभट । काय त्याचा थाट वानावा की ॥३४॥
विनायक म्हणे ऐसा देव घ्यावा । परम विसावा तेणे मना ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP