मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
गंगावतरण

श्रीदत्त भजन गाथा - गंगावतरण

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २९-५-१९३०

भागीरथी माता जगाते ताराया । दुरित शोधाया जगताचे ॥१॥
विष्णुपदापासोनी अवतीर्ण झाली । शिवाने धरिली जटेमाजी ॥२॥
स्वर्गांतून ठाव काढित पातली । त्रिपथगा भली कीर्ति तीची ॥३॥
माय जैशी धांवे लेकुराचे काज । पुरवाया चोज वात्सल्याने ॥४॥
उडी घेत आली तैशी महीवरी । प्रेमाते अंतरी धरोनिया ॥५॥
घोर मृत्युलोक उग्र कर्म-भूमि । जन आपद्धर्मी युक्त सदा ॥६॥
तयांच्या  कैवारे माउली हे आली । बहुत पोळली जन-दु:खे ॥७॥
पावन कराया अघ प्रक्षाळाया । जीवांचे चुकवाया जनि-मरण ॥८॥
ताप शमवाया श्रम परिहराया । अर्थ पुरवाया जगताचे ॥९॥
जननी हे जाणा सर्व जीवमात्रां । गति इहपरत्रा मूर्तिमंत ॥१०॥
स्मरणेंच तारी पातकी उद्धरी । कूर्म-दृष्टी परी करीतसे ॥११॥
स्पर्शने दर्शने मुक्त करी स्नाने । उच्चार मात्राने तारित्से ॥१२॥
गंगे गंगे ऐशा तारी संबोधने । काय महिमाने बोलूं तिची ॥१३॥
विनायक म्हणे मातेच्या स्मरणे । भवाते तरणे सोपा मार्ग ॥१४॥
==
पाहुनीयां ताप सकल जगाचा । उद्रेक प्रेमाचा होवोनियां ॥१॥
वत्सल ती माता उडी घेऊं पाहे । कोण वेग साहे धाक जगा ॥२॥
प्रार्थित शंकरा भयभीत विश्व । साधा आतां शिव जगताचे ॥३॥
पितृत्वाचे नाते आहे तुम्हापाशी । जग रक्षायासी सहाय व्हा ॥४॥
प्रेमे वेडावली माता उडी घाली । पाहिजे धरिली मध्यंतरी ॥५॥
वात्सल्य गंगेचे पाहोनी तोषले । सदाशिव भले कौतुकाने ॥६॥
अनुपमेय मातृ-प्रेमाते पाहोनी । शिर तुकावोनी सन्मानित ॥७॥
अर्धनारी नटेश्वर उमापति । निज शिराप्रति पुढे करी ॥८॥
उत्तमांगी तिज आसन दिधले । जटेत ठेविले आदराने ॥९॥
लोकहितासाठी जो का उडी घेतो । संकटी पाडितो आपणासी ॥१०॥
तया जगत्प्रभु ऐसा सन्मानीतो । भरोनियां येतो गहिवरे ॥११॥
ज्यासी देव पूजी त्याचा अधिकार । करणे विचार निजबुद्धि ॥१२॥
विनायक म्हणे मातेचा गौरव । प्रकाशावा भाव इंगितज्ञी ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP