मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना

श्रीदत्त भजन गाथा - ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तळमळ माझी कोणबा हरील । उडी बा घेईल कोण आतां ॥१॥
तरी आतां देवा धांव झडकरी । लाज माझी तरी राख आतां ॥२॥
ग्वाही केली आहे तुझ्या वैभवाची  । कितीतरी साची आजवरी ॥३॥
किती तरी तुझे सामर्थ्य गाईले । लोकां सांगितले तुझे वर्म ॥४॥
उपदेश केला आहे आजवरी । तुझ्या नामे तरी जगदीशा ॥५॥
विश्वास ठेवितां दृढ देवावरी । मग तो न मारी कदाकाळी ॥६॥
रोग भोग दु:ख सकळ निवारी । निजांगे मुरारी सांगितले ॥७॥
दृष्टांत कथिले आण भाक केली । तुझ्या नामे भली जगन्नाथा ॥८॥
विश्वासोनी दृढ नाथा तुझ्या ठायी । बोलिलों उपायी तुझे यश ॥९॥
सांगितले यश भक्ती बोधियेली । कांस धरा भली ईश्वराची ॥१०॥
म्हणोनि कथन केले मी लोकांत । तेणे कीर्ति ख्यात तुझी नाथा ॥११॥
बट्टा नको लावूं माझीया बोलासी । वाणी असत्यासी आणूं नको ॥१२॥
माझी नोहे वाणी वाणी ही तुझीच । बोलली तुझेच यश देवा ॥१३॥
तरी सत्य करी संकल्प आपुला । मजला दयाळा रक्षी रक्षी ॥१४॥
भाबडा मी बहु बोलोनियां गेला । तुझे पाय़ी आलो आतां देवा ॥१५॥
सत्य करी माझे वचन गुरुनाथा । पायी मी समर्था शरण आहे ॥१६॥
मिठी मारीतसे तुझे कमरेसी । वांचवी दीनासी जगत्प्रभु ॥१७॥
महासंकट हे पातले दारुण । आतां नारायण वांचवावे ॥१८॥
फ़जिती होईल माझी या जगांते । जाईल नाथा पत माझी आतां ॥१९॥
फ़जितखोर नको करुं मजलागी । तुझे यश जगीं विस्तरी तूं ॥२०॥
फ़ोल नको करुं देवा माझे बोल । आतां तूं दयाळ उडी घाली ॥२१॥
घाबरलो बहु उरला न आसरा । आतां न दुसरा कोण त्राता ॥२२॥
भये तुझ्या पाठी रिघालो मी नाथा । तरी तूं समर्था कृपा करी ॥२३॥
चुकलो मी जरी आतां तूं सांभाळ । दीनाचा दयाळ म्हणती तूज ॥२४॥
तुझ्या नामे केली बहु मी गर्जना । दिधले वचना तुझ्या नामे ॥२५॥
तुझी पत देवा लाविली पणासी । वांचवि दीनासी दत्तात्रेया ॥२६॥
अनुपम आहे संकट हे नाथा । श्रीगुरु समर्था वांचवावे ॥२७॥
लाज राख माझी राख अभिमान । आतां कृपाघन गुरुराया ॥२८॥
गडबडां तुझे पायांसी लोळतो । सुखासी पाहतो केविलवाणे ॥२९॥
द्रवो हे ह्र्दय जैसे नवनीत । मृदुल असे ख्यात जगत्रयी ॥३०॥
विनायक झाला दीन हा दुबळा । आतां तूं स्नेहाळा वांचावी या ॥३१॥
==
ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना
लाज राख या स्थानाची । तैशी तुझ्या उपासनेची ॥१॥
राख राख निजकीर्ति । निजयश जगत्पति ॥२॥
संकट महा ओढवले । मन माझे घाबरले ॥३॥
तुजठीण मज ठाव । कोठं नाही वासुदेव ॥४॥
मज पाठीसी घातले । तुवां असे देवा भले ॥५॥
तरी आतां राख लाज । वाढवावे माझे चोज ॥६॥
तुझ्या पाठीसी रिघालो । भयभीत असे झालो ॥७॥
गळला माझा अहंकार । झालो असे निरहंकार ॥८॥
तरी आतां वाचवावे । मजसाठी धाबूनि यावे ॥९॥
उडी घाल स्थानासाठी । उडी घाल भक्तांसाठी ॥१०॥
उडी घाल यशासाठी । उडी घाल कीर्तिसाठी ॥११॥
उडी घाल ब्रीदासाठी । उडी घाल वचनासाठी ॥१२॥
उडी घाल धर्मासाठी । तैशी तुझ्या उपासनेसाठी ॥१३॥
उडी घाल भजनासाठी । उडी घाल प्रेमासाठी ॥१४॥
वात्सल्याचे साठी देवा । उडी घाल वासुदेवा ॥१५॥
सत्यासाठी उडी घाल । पुण्यासाठी उडी घाल ॥१६॥
भक्तीसाठी उडी घाल । मजसाठी उडी घाल ॥१७॥
घाबरा मी बहु झालो । तुज शरण असे आलो ॥१८॥
तरी आतां कृपा करणे । मजसाठी नाथ धांवणे ॥१९॥
माझ्या विश्वासाचे तारुं । तूंच एक जगद्गुरु ॥२०॥
माझे ह्रदयीचा आधार । तूंच एक अवनीवर ॥२१॥
तरी आतां धांव घेई । मजसाठी गुरुमाई ॥२२॥
धांव आतां लवलाही । माझ्यासाठी माझे आई ॥२३॥
करी आतां साक्षात्कार । दावी येथे चमत्कार ॥२४॥
विनायक उताविळ । याचा करावा सांभाळ ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP