मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
नृसिंह्सरस्वती प्रयाण

श्रीदत्त भजन गाथा - नृसिंह्सरस्वती प्रयाण

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १३-२-१९३०
लोकसंग्रह की झालासे बहुत । सम्मर्द लोटत जन लोकांचा ॥१॥
वाढलीसे कीर्ति गाजला महिमा । पावताती कामा भक्त जन ॥२॥
जे जे शरण येती पूर्ण काम होती । अपरंपार ख्याती जाहलीसे ॥३॥
सुजन दुर्जन भाविक अभाविक । दर्शना अनेक येती जन ॥४॥
धरुनी कामना लोटती स्थानासी । लेशही भक्तीसी धरिती ना ॥५॥
नाही भक्तिभाव शुद्ध अंतरंग । विषयांत दंग जे का सदा ॥६॥
भोग-प्राप्तीसाठी ऐसे येती जन । कदा नोहे मन शुद्ध त्यांचे ॥७॥
म्हणोनि मनांत विचार आणिला । करुं प्रयाणाला येथोनीयां ॥८॥
बहुदिन येथे घडलासे वास । लाविले मार्गास बहु जन ॥९॥
भजनपूजनासी लावियेले लोक । आतां आवश्यक आम्हां जाणे ॥१०॥
पाचारिती तेव्हा स्वामी ग्रामस्थांसी । कर्दली वनासी जाणे आम्हां ॥११॥
पुष्पांचे आसन करोनि आणावे । आम्ही आतां जावे शैल यात्रे ॥१२॥
ऐकतां हे मात जन भयभीत । स्वामिसी प्रार्थित नका जाऊं ॥१३॥
शैलयात्रा मिसे येथोनी जाणार । अदृश्य होणार निश्चय हा ॥१४॥
जाऊं नका स्वामी चरण धरीतो । चरणी लोटतो दीन हीन ॥१५॥
जाऊं नका स्वामी आम्हांसी टाकोनी । संसार गहनी ठेवोनिया ॥१६॥
जाऊं नका स्वामी वासरां गाऊली । लेकरां माऊली तुम्ही आम्हां ॥१७॥
जाऊं नका स्वामी आमुचे कृपाछत्र । इहही परत्र तुम्हीच की ॥१८॥
जाऊं नका स्वामी आम्हांसी टाकोनी । अनाथ करोनी जाऊं नका ॥१९॥
जाऊं नका स्वामी येतो काकुळती । द्रव तुम्हांप्र्ति येवो नाथा ॥२०॥
जाऊं नका स्वामी आई बाप धनी । तुम्हीं त्रिभुवनी आम्हां लागी ॥२१॥
जाऊं नका स्वामी भाऊ बहिण तुम्ही । कोणाकडे आम्ही पाहूं सागा ॥२२॥
जाऊं नका स्वामी तुम्ही पंचप्राण । उरले न त्राण तुम्हाविणे ॥२३॥
जाऊं नका स्वामी चैतन्य देहींचे । तुम्ही आम्हां सांचे जाऊं नका ॥२४॥
जाऊं नका स्वामी तुम्ही अन्नपाणी । नेत्री येत पाणी आमुचीया ॥२५॥
जाऊं नका स्वामी आम्हांसी प्रकाश । तुम्ही असो ईश जाणावे की ॥२६॥
जाऊं नका स्वामी आमुचा जिव्हाळा । तुम्हीच स्नेहाळा जगती या ॥२७॥
जाऊं नका स्वामी शरीरांत रक्त । तैसे तुम्ही युक्त उपमाया ॥२८॥
जाऊं नका स्वामी खचित सांगतो । धरणे धरतो तुम्हांपाशी ॥२९॥
जाऊं नका नका पदर धरीतो । आडवे पडतो मार्गावरी ॥३०॥
गाणगापूरवासी जन प्रार्थिताती । नृसिंहसरस्वती जाऊं नका ॥३१॥
भक्तानुकंपी देव तुमचे महिमान । सदा भक्ताधीन ऐशा कीर्ति ॥३२॥
ऐसे परोपरी विनवितां त्यांसी । देव निश्चयासी सांगताती ॥३३॥
आम्ही येथे असो सदा तुम्हांपाशी । लौकिक मतासी जातो आम्ही ॥३४॥
कलिकाळास्तव अदृश्य राहणे । आम्हां असे जाणे शैलयात्रे ॥३५॥
तुम्हां याची साक्ष निश्चये येईल । तुम्ही अनुभवाल माझी कृपा ॥३६॥
जो का कोणी माझे चरित्र गाईल । प्रबंध रचिल कवित्वाचे ॥३७॥
जाणोनियां ताल राग जो गाईल । यश माझे वदेल जो का जाणा ॥३८॥
त्याचेपाशी आहे सदा, हेच भाक । तुम्हां जन लोक देत असे ॥३९॥
ऐसे म्हणोनियां आसन घातले । पुष्पासन भले गंगेवरी ॥४०॥
बैसोनियां जातां जन दु:खी होती । नावेकरी येती सांगताती ॥४१॥
स्वामिची आम्हां डोळा देखियेली मूर्ति । तुम्हांवरी प्रीति सांगितली ॥४२॥
तंव प्रसाद्पुष्पे पावली तीरासी । परम भावेसी घेती जन ॥४३॥
परतोनि जातां मठांत देखती । दंडधारी यति स्वामिराज ॥४४॥
आम्ही येथे असो दु:ख नका करुं । धरा हा निर्धारु सांगताती ॥४५॥
असित पक्षमाघमास प्रतिपदा । गमन वरदा घडले की ॥४६॥
तोच पुण्य दिन स्मरणाचा । वंदे माझी वाचा महिमान ॥४७॥
विनायक म्हणे माझेपाशी देव । सदा त्याचा भाव आहे जाणा ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP