श्रीदत्त भजन गाथा - "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे"
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २१-८-१९३०
अवतार होतो जगाच्या कारण । धर्म संरक्षण करायास ॥१॥
अधर्माचा जेव्हा उदय घडतो । तेव्हा प्रभु घेतो अवतार्म ॥२॥
धर्माचा हा वाली सज्जनांचा त्राता । भक्तां सुखदाता जगत्प्रभु ॥३॥
आपुल्यासी सुख द्यावया कारण । दुष्ट निर्दाळण करावया ॥४॥
भूभार हराया दु:खी सोडवाया । जगाते ताराया येतो देव ॥५॥
बहुरुपी देव नानारुपी धरी । नाना लीलावतारी देव जाणा ॥६॥
पशुपक्षी योनी त्यांतही हा येतो । अवतार घेतो जनार्दन ॥७॥
होतो मनुज हा होतो कधी देव । योग्य जो भाव आदरीतो ॥८॥
उपेंद्रवामन देवामध्ये झाला । रामकृष्ण भला मनुष्यांत ॥९॥
मत्स्य कूर्मादिक जे का अवतार । झाले अवनीवर देवाजीचे ॥१०॥
नाना योनीमध्ये प्रगटीतो भाव । देव वासुदेव लीलाकर्ता ॥११॥
विनायक नमी तया वासुदेवा । धरुनी प्रेमभावा त्याचे ठायी ॥१२॥
==
देवा सेवूं भजूं । जगीं प्रेमाचीया काजू ॥१॥
देवनाम प्रेमे घेऊं । देवालागी चित्ती ध्याऊं ॥२।
गुण गाऊं देवाजीचे । प्रेमभरे निजवाचे ॥३॥
कथा ऐकूंया श्रवणी । प्रेम लोटे अंत:करणी ॥४॥
पाहूं देवाजीचे मुख । अनुपम तो हरिख ॥५॥
भरुं मूर्ति ह्रदयांत । सुख राहूं अनुभवीत ॥६॥
विनायक म्हणे योग । जोडूं वाहुनि अंतरंग ॥७॥
==
धांवा
तुजविण कोण तारील मजसी । सांग या दीनासी कृपासिंधू ॥१॥
विश्वासाने तुझे धरिले मी पाय । हाच सदुपाय माझ्या मते ॥२॥
तुजवीण माझा कोणी नसे वाली । दया येवो भली दत्तनाथा ॥३॥
करुणेचा सिंधू प्रेमाचा सागर । धांव तूं सत्वर दयावंता ॥४॥
उडी घाल आतां देवा माझ्यासाठी । स्वामि जगजेठी कृपावंता ॥५॥
तुजवीण कोणा माझी दया येईल । धांवत येईल कोण सांग ॥६॥
विनायक तुझा झालासे घाबरा । तरी करी त्वरा वासुदेवा ॥७॥
==
धांवा
तुझीये पाडसासी पडतां जड भारी । कोण गे सत्वरी उडी घाली ॥१॥
माउलीचेवीण कोणा कळवळा । लेकूराचा लळा कोणालागी ॥२॥
लेकूराने वाट पहावी कोणाची । माऊलीवीण साची सांग दत्ता ॥३॥
तुजकडे नाते असे माऊलीचे । आम्हां पाडसाचे असे माये ॥४॥
तरी तूं आतां धांव संकट पडले । निवारील भले कोण सांग ॥५॥
विनायक तुझ्या चरणीचा दास । पुरवी याची आस गुरुमाये ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP